आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाण्याचा पहिलवान शेख ठरला विजेता; बाला रफिक महाराष्ट्र केसरी, फायनलमध्ये गत विजेत्या अभिजीतचा केला पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- मूळ करमाळ्याचा पण बुलडाण्याकडून खेळणारा बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. त्याने रविवारी फायनलमध्ये गतविजेत्या अभिजित कटकेला ११-३ने अस्मान दाखवले. मातीच्या आखाड्यात खेळणाऱ्या बालाने मॅटवरील अंतिम फेरीत आपणच बाहुबली असल्याचे सिद्ध केले. बालारफीकला करिअरमध्ये आणि विदर्भाला पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवून दिला. 

 

विदर्भाचा पहिलाच मल्ल महाराष्ट्र केसरीचा मानकरी 
मुळ साेलापूरचा असलेला बालारफीक २ वर्षांपासून बुलढाणाकडून खेळताे. त्याच्या रूपाने विदर्भाच्या मल्लाने ऐतिहासिक यशाला गवसणी घातली. त्याने विदर्भाच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र केसरी हाेण्याचा पराक्रम गाजवला. बुलढाण्याचे प्रतिनिधीत्व करत त्याने माती विभागातून अंतिम फेरी गाठली होती. 

 

८० हजार चाहत्यांची उपस्थिती; मल्लांना पाठबळ 
सोळा वर्षांनंतर होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी जालना शहराच्या पंचक्रोशीतील तमाम कुस्तीप्रेमींनी हजेरी लावली. या प्रसंगी तब्बल ८० हजार चाहत्यांनी दोन तुल्यबळ मल्लांचा फायनल मुकाबला पाहिला. मैदानाबाहेर मोठ्या स्क्रीनच्या ठिकाणी गर्दी केली होती. 

 

दाेन लाख रुपये आणि मानाची चांदीची गदा

बाला रफिकला २ लाख रुपये आणि मानाची चांदीची गदा देऊन गाैरवण्यात आले. मूळ साेलापूरचा असलेला बाला हा मागील दाेन वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या रूपाने विदर्भाला पहिला महाराष्ट्र केसरी मिळाला आहे. विदर्भासाठी हे साेनेरी यश नवसंजीवनी देणारे आहे.


विदर्भासाठी रचला इतिहास 
गत १९६१ पासून विदर्भाचे मल्ल सातत्याने राज्यातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी हाेतात. मात्र, विदर्भाच्या मल्लांना अद्याप साेनेरी यशाचा पल्ला गाठता आला नाही. असाच प्रयत्न दाेन वेळा वर्ध्याच्या माेहनसिंग टायगर यांनी केला. त्यांनी १९६७ आणि १९७२ मध्ये महाराष्ट्र केसरीची फायनल गाठली हाेती. मात्र, त्यांना अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, विदर्भाला दाेन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे किताबाच्या नजीक जाऊन परतावे लागल्याची खंत तमाम विदर्भवीर मल्लांच्या मनात मागील चार दशकांपासून आहे. मात्र, आता हीच खंत दूर करण्याचे काम बालारफिकने आपल्या शैलीदार खेळीच्या माध्यमातून केले. दरम्यान, बालारफिकचे हे उपमहाराष्ट्र केसरीचे घवघवीत यश विदर्भातील कुस्तीसाठी नवसंजीवनी देणारे ठरले आहे. मागील ४६ वर्षांपासून विदर्भातील मल्लांना फायनलचा पल्ला गाठता आला नाही. मात्र, हीच मरगळ दूर सारण्याचा पराक्रम बालारफिकने केला. त्यामुळे या पदकातून विदर्भाच्या मल्लांचा आत्मविश्वास द्विगुणित हाेईल. तसेच येथील आखाड्यालाही चालना मिळण्याचे कार्य सार्थकी लागेल. त्यामुळेच हे पदक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारे मानले जाते. यातूनच आता आखाड्यांना चालना मिळेल. 

 

तब्बल चौदा वर्षांनंतर करमाळ्याला दुसरा महाराष्ट्र केसरी ठरला बालारफिक शेख 
महाराष्ट्र केसरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून पहिल्या तीन पराभवांनंतर चौथ्यांदा गरीब कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलगा बालारफिक शेखने अखेर मैदान मारले. हा अभिमानास्पद विजय करमाळ्यासाठी दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब देणारा ठरला. त्याच्या विजयात मूळ गाव खडकीसह तालुका करमाळा सहभागी झाला. करमाळ्यात ठिकठिकाणी जल्लोष व फटाक्यांची आतषबाजी बघायला मिळाली. त्याचे आजोबा, वडील आणि भाऊ शेतीसह पहिलवानकी करत असत. मुळातच गरीब शेतकरी कुटुंबातील असला तरी बालारफिकचे वडील आझम शेख यांनी घरची परिस्थिती नसताना बालारफिकला कुस्तीचे धडे दिले. वडील आझम यांची इच्छा इतकी प्रबळ होती की, बालारफिकला खुराक पुरवताना अडचणी येत असतानाही इतर भावांचाही खुराक व त्यांनाही पहिलवान करण्याची जिद्द ते बाळगून होते. बालारफिकला व्यायामाची आवड असल्याने त्याला करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या तालमीमध्ये व्यायामशाळेत, त्यानंतर गणपतराव आंदळकर यांच्या कोल्हापूर येथील न्यू मोतीबाग तालमीत पुढचा सराव सुरू झाला. त्याच्या पायाला जखम झाल्याने तो काही काळ कुस्तीपासून दूर राहिला, पण त्याने चिकाटी सोडली नाही. शस्त्रक्रियेनंतरही त्याने जोरदार मेहनत करत महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. 

 

हनुमान आखाड्याचा मल्ल 
कै. वस्ताद गणपतराव आंधळकर यांच्या परिसस्पर्शाने घडलेल्या व सोने झालेल्या बालारफिक शेखने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. बालाच्या वडिलांनी विजयानंतर सर्वप्रथम कै. वस्ताद गणपतराव आंधळकर यांच्या नावाचा जयघोष केला. मुळात पहिलवान कुटुंबात जन्मलेला बालारफिक सध्या पुण्यातील (वडगाव बु.) हनुमान आखाडा येथे वस्ताद गणेश दांगट, गोरख वांजळे, संदीप बुचुडे व मुकेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून alt147दुहेरी पटाची' त्याची खासियत आहे. पहाटे ४ ते संध्या ७.३० असा त्याचा दिनक्रम असून रोज १० किमी धावणे, जोर- बैठक, सपाट्या व लढत असा यामध्ये समावेश आहे. अतिशय आक्रमक खेळी व बुद्धिचातुर्याचा वापर त्याच्या खेळाची शैली आहे. ती सामन्यात पाहायला मिळाली. 
 

बातम्या आणखी आहेत...