आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलबच्चन ते अबोलबच्चन...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बच्चनच्या उदयाचा काळ मोठ्या बजबजपुरीने व्यापलेला काळ होता. नेहरूंचं आदर्शवादी स्वप्नाळू युग संपलं होतं आणि पाव शतकाआधी स्वराज्य मिळालेलं असलं तरी ‘सुराज्य’ अजून कित्येक योजने दूर होतं. देशातले लहानमोठे राजकीय पुढारी ‘काळे इंग्रज’ होऊन बसले होते. जातीयता-विषमता होती, गरीब-श्रीमंतीच्या मधली दरी भयावह रुंदावलेली होती. औद्योगिकरणाने मालक आणि कामगार यांच्यात वर्गसंघर्षाने टोकदार रूप धारण केलेले होते. रोजच्या भाकरीच्या झगड्यातच जायबंदी होणाऱ्या लोकांमध्ये सरकारशी, धनिकांशी, मालकांशी, गुंडांशी झगडण्याची ताकदच उरलेली नसताना एक माणूस या सगळ्यांना एकाच वेळी शिंगावर घेण्याची धमक दाखवायला लागला होता.

 

शाहरुख खानची एक मुलाखत पाहत होतो. त्यात तो म्हणाला, मुझे कभी भी नही लगा था की मै स्टार बन जाउंगा. मुझे लगता था की मेरी सूरत हीरो जैसी नही है. लेकीन मै खुशकिस्मत था के जब मै फिल्मो मे आया तो जमाना बदल रहा था और बदलते जमाने की मांग शाहरुख खान थी. ‘देखणा चेहरा’ हेच एकेकाळी चित्रपटात हीरोगिरी करण्यासाठीचं महत्वाचं भांडवल मानलं जाई. शाहरुखकडे ते नव्हतं. तरीही तो मागच्या पंचवीस वर्षांतला सर्वात मोठा यशस्वी स्टार झाला.हे स्टारपद त्याला मिळण्यामागचं महत्वाचं कारण होतं –बदलत असलेला काळ.


‘शक्तीमान नेता आणि सुपरस्टार अभिनेता हे काळाचं अपत्य असतं’ असं एक सर्वमान्य विधान आहे. प्रत्येक  बदलत्या काळाचं स्वत:चं असं एक ‘स्टेटमेंट’ असतं. हे ‘स्टेटमेंट’ ज्यांना सशक्तपणे करता येतं, ती माणसे पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी किंवा अमिताभ बच्चन होतात. हिंदी चित्रपटाच्या क्षेत्रात असं ‘सोशिओ-पोलिटिकल स्टेटमेंट’ सर्वाधिक प्रभावीपणे करून दाखवणारं कदाचित एकच नाव असू शकेल - अमिताभ बच्चन!


शहेनशहा. स्टार ऑफ द मिलेनिअम. 


जगातलं कुठलंही ‘सुपरलेटिव्ह’ बिरूद आणा. अमिताभ बच्चनला ते सार्थपणेच शोभून दिसतं.    
हिंदी चित्रपटांत प्रवेश करण्यासाठी अमिताभ मुंबईत आला, तो काळ राजेश खन्नासारख्या स्टायलिश गोंडस आणि धर्मेंद्रसारख्या रांगड्या मर्दानी नायकांचा होता. अमिताभकडे यातलं काहीच नव्हतं. ना रूढार्थाने देखणा चेहरा, ना फार धडधाकट देहसंपदा. फक्त एक भरदार आवाज होता पण तोही ऑल इंडिया रेडिओने नाकारलेला होता. सुरुवातीच्या धडपडीच्या आणि निराशेच्या काळात जे चित्रपट मिळाले, त्यात अमिताभला स्वत:चा सूर सापडला नव्हता. त्याला त्याचा खरा चेहरा सापडला तो प्रकाश मेहराच्या ‘जंजीर’मधून. आधी हा चित्रपट राजकुमारला देण्याचा प्रकाश मेहराचा प्रयत्न होता. त्याने राजकुमारला कथा ऐकवली. ती ऐकल्यावर स्वत:च्या चमत्कारिक स्वभावाशी इमान राखत राजकुमार प्रकाश मेहराला म्हणाला, कथा चांगलीच आहे खूप, पण मी हा सिनेमा करणार नाही. इसलिए की तुमने बालों मे जो तेल लगाया है उसकी बू हमे पसंद नही है. मेहरा परत आला आणि त्याने अमिताभला गाठले. नंतर घडला तो इतिहास होता. ‘जंजीर’मधून तो सुप्रसिध्द ‘अँग्री यंग मॅन’ जन्माला आला. ज्याने चेतवलेली आग पुढचं पाव शतक रुपेरी पडद्यावर कायम धगधगत राहिली.

 

‘जब तक बैठने को कहा ना जाए, चुपचाप खडे रहो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप घर नही.’ हे ते सलामीचं वाक्य होतं, ज्याने सामान्य प्रेक्षकाच्या दुबळ्या छातीत एक अशी वीज पेरली, जिच्या कडकडाटात आधीची सगळीच राज्ये खालसा झाली आणि ‘बच्चन’ नावाचं एकछत्री साम्राज्य उदयाला आलं. सिंहासनावर तो इतकी पक्की मांड ठोकून बसला की आज अर्धशतकानंतरही ती पकड किंचितही सैल झालेली नाही. अमिताभ बच्चनला हे जमलं याचं कारण त्याने त्याच्या समकालाची गरज असलेलं सोशिओ-पोलिटिकल स्टेटमेंट फार ताकदीने सादर केलं होतं.

 


बच्चनच्या उदयाचा काळ मोठ्या बजबजपुरीने व्यापलेला काळ होता. नेहरूंचं आदर्शवादी स्वप्नाळू युग संपलं होतं आणि पाव शतकाआधी स्वराज्य मिळालेलं असलं तरी ‘सुराज्य’ अजून कित्येक योजने दूर होतं. देशातले लहानमोठे राजकीय पुढारी ‘काळे इंग्रज’ होऊन बसले होते. जातीयता-विषमता होती, गरीब-श्रीमंतीच्या मधली दरी भयावह रुंदावलेली होती. औद्योगिकरणाने मालक आणि कामगार यांच्यात वर्गसंघर्षाने टोकदार रूप धारण केलेले होते. सरकार कायम धनिकांच्याच बाजूने असल्याची भावना सामान्य लोकांच्या मनात खोलवर मूळ धरून रुजलेली होती. रोजच्या भाकरीच्या झगड्यातच जायबंदी होणाऱ्या लोकांमध्ये सरकारशी, धनिकांशी, मालकांशी, गुंडांशी झगडण्याची ताकदच उरलेली नसताना एक माणूस या सगळ्यांना एकाच वेळी शिंगावर घेण्याची धमक दाखवायला लागला होता.


‘आज एक और मजदूर हप्ता देनेसे इन्कार करनेवाला है’ असं छातीठोक सांगत तो गुंडशाहीच्या विरुद्ध नुसता उभाच राहिला नाही, तर स्वत:च गुंडांच्या अड्ड्यावर जाऊन ‘तुम मुझे बाहर ढुंढ रहे थे और मै तुम्हारा यहां इंतजार कर रहा था’ अशा आक्रमक निर्भयपणे त्यानं गुंडांना एकहाती झोडपून काढलं. 


‘आज भी मै फेंके हुये रुपये नही उठाता..’ असं सणकावून पैशाच्या जोरावर माजोर झालेल्या कुणा शेठच्या पुढ्यात त्याने आपल्या पाठीच्या ताठ कण्याचं प्रदर्शन केलं.


‘‘जाओ, पहले ऊस आदमी का साईन लेके आओ, जिसने मेरे हाथ लिखा था की मेरा बाप चोर है..’ असं सुनावत त्याने जगाचे नीतिनियम फाट्यावर मारले. ‘अगर किसीने हिलने कि कोशिश की तो भून के रख दूंगा..’ एवढ्या एका गोळीबंद वाक्याच्या बळावर त्याने गब्बरसिंगसारख्या भयंकर क्रूर डाकूच्या अख्ख्या टोळीला जागच्या जागी ठाणबंद करून टाकलं. ‘हम जहां खडे होते है, लाईन वहींसे शुरू होती है अशा बुलंद शब्दांत त्याने स्वत:साठी खास जागा निर्माण करून घेतली. ‘डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्कों कि पुलिस कर रही है, लेकीन डॉन को पकडना मुश्कीलही नही, नामुमकीन है’ इतक्या आत्मविश्वासाने त्याने जगभरातल्या पोलिसी व्यवस्थेला टिचकीसरशी उडवून लावलं. ‘रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप होते है. नाम है शहेनशाह’ असं सांगत त्याने स्वत:चं चालतं-फिरतं न्यायालय चालू केलं आणि तो गुन्हेगारांना थेट सजा सुनावायला लागला.


त्याने केलं नाही, असं काहीही हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर बाकी उरलेलं नाही. त्याकाळी भारतात माजलेल्या सर्वस्तरीय अराजकाला त्याने एकट्याने पडद्यावर आव्हान दिलं. सगळ्या सत्तांच्या समोर तो एकटा बेडरपणे उभा राहिला आणि त्यांना त्याने परास्त करून दाखवलं. कुठल्याही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी इथल्या लोकांनी त्यालाच आपला ‘नायक’ म्हणून निवडलं. त्याच्यासमोर कुणी टिकूच शकत नव्हतं. वेगवेगळ्या भूमिकांतून, त्याच्या जादूभ-या आवाजात तो बोलत राहिला. त्याच्या स्वरात अशक्यही शक्य वाटत असे. 
तो वन मॅन इंडस्ट्री झाला. १९६९ साली त्याचा पहिला चित्रपट आला आणि आज कारकिर्दीचं अर्धशतक पुरं होत असतानाही चित्रपटाच्या जगात त्याने मिळवलेलं अढळपद अबाधित आहे. तो एकमेव आहे.


त्याच्या ऐन बहरातल्या काळात आधुनिक भारताची देशाबाहेरची ओळख ‘महात्मा गांधी, लता मंगेशकर, सुनील गावसकर आणि अमिताभ बच्चनचा देश’ एवढीच होती अशी आख्यायिका सांगितली जाते. ती, अर्थात, विश्वास ठेवण्यालायकच आहे.


आणि तो केवळ एकारलेला राहिला नाही कधीच. त्याने त्वेषाने हाणामाऱ्या केल्या, त्यासोबतच ‘फूल भी हो दरमियां तो फासले हुये..’ हे खरं वाटावंसं विलक्षण तरल प्रेमही केलं. नर्मविनोद ते खदाखदा हसवण्यापर्यंत विनोदाच्या सगळ्या छटा त्याने सहजपणे सादर केल्या. सौदागर, अभिमानसारख्या चित्रपटांतून जगण्यातल्या संवेदनशील दुख-या जागा समर्थपणे चिमटीत पकडल्या. क्वचित तो स्वत:च खलनायकही झाला. सगळ्याच रसांची, रंगांची त्याने पडद्यावर बेभान उधळण केली. बदल्यात लोकांनी त्याच्यावर विलक्षण जीव जडवला. अपघातात त्याच्या जगण्याची खात्री उरली नाही तेव्हा या औरसचौरस देशात मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च असंही एकही धर्मस्थळ नव्हतं, जिथं त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना झाल्या नाहीत. लोकांच्या या विलक्षण प्रेमाच्या बळावरच अमिताभ तेव्हा पुनश्च जिवंत झाला असेल.

 


आणि मग एका कसोटीच्या क्षणी आपल्या जिवाभावाच्या मित्राला साथ देण्यासाठी तो राजकारणात उतरला. आजवर त्याने पडद्यावर खलनायकांशी झुंज दिली होती. राजकारणात मात्र त्यालाच खलनायक ठरवलं गेलं. बोफोर्स नावाच्या एका वादळाने अमिताभ बच्चनच्या पडद्यावरच्या प्रतिमेच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या.
त्याच्या प्रामाणिकतेविषयी संशयाचं गडद धुकं निर्माण झालं आणि त्याचे इतके धिंडवडे निघाले की पडद्यावरचा त्याचा वावर प्रचंड खोटा वाटू लागला. त्याच्या साम्राज्याला बॉक्स ऑफिसवर लागोपाठ हादरे बसायला लागले. ज्याच्या एकट्याच्या आश्रयावर अख्खा चित्रपट उद्योग विश्वासून असे, त्याला एकतरी यश मिळावं म्हणून चक्क डेव्हिड धवनच्या उथळ विनोदी चित्रपटाचा आश्रय घ्यावा लागला. 

 


‘अमिताभ बच्चन संपला’ असं मानून नवी पिढी खानांकडे वळली.  इथेच नेमका तो शाहरुखने सांगितलेला बदलता काळ अस्तित्वात येत होता. जागतिकीकरणोत्तर बाजारयुगाचा काळ. ‘पैसा खुदा नही, पर खुदा कसम, खुदा से कम भी नही.’ हे या बदलत्या काळाचं ब्रीदवाक्य होतं. अत्यंत लोळागोळा अवस्थेत असलेल्या बच्चनला एक संधी हवी होती. ABCL ही कंपनी स्थापन करून त्याने ती संधी घेतली. प्रचंड पैसा लावून बंगलोरमध्ये जागतिक सौंदर्यस्पर्धा घेतली. स्वत:च्या कंपनीच्या वतीने अनेक महत्वाकांक्षी चित्रपटांच्या निर्मितीचा घाट घातला आणि या सगळ्याच उद्योगांतून त्याच्या पदरी पडला फक्त अवाढव्य कर्जाचा डोंगर. इतका, की त्याच्या घरावर बँकेने जप्तीच्या नोटीसा डकवल्या.जगाच्या दृष्टीने अमिताभ बच्चन सर्वार्थाने ‘संपला’ होता. 


बच्चन संपला होता; पण त्याच्यातली उर्जा, झुंजण्याची जिद्द आणि असामान्य प्रतिभा संपली नव्हती, हे लवकरच त्याने सिद्ध करून दाखवलं. ‘आनंद मरा नही करते..’ प्रमाणेच ‘बच्चनही संपत नसतो..’ हे त्याने जगाला दाखवून दिलं.  दरम्यान, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या धीरूभाई अंबानींनी त्याच्यावरचं कर्ज एकरकमी फेडण्याची तयारी दाखवली. विपरीताच्या भोवऱ्यात गरगरणाऱ्या कुणालाही मोह झाला असता; बच्चनला झाला नाही. त्याने अंबानींचे आभार मानून त्यांच्या या देकाराला नकार दिला आणि उतारवयात तो पुनश्च मैदानात उतरला.  विनंती करून त्याने यश चोप्रांचा ‘मोहब्बतें’ मिळवला आणि संपूर्ण बदलेला अमिताभ जगासमोर आला. कायम तरुण दिसत झाडांमागे नाचून विशीतल्या पोरीसोबत प्रेम करण्याचा चित्रपटीय अट्टाहास त्याने सोडला आणि दाढी-मिश्यांतल्या अतिशय करारी आणि ग्रेसफुल अवतारात समोर येऊन त्यावेळी शीर्षस्थानावर असलेल्या शाहरुखसमोर तो भक्कमपणे उभा ठाकला. असाच भक्कमपणा त्याने ‘आनंद’मध्ये राजेश खन्नाच्या आणि ‘शक्ती’मध्ये दिलीपकुमारच्या समोर उभं राहून दाखवला होता.

 
मावळत्या- उगवत्या सुपरस्टारांची अशी जुगलबंदी भारतीय चित्रपटाच्या प्रेक्षकांना नेहमीच आवडत आली आहे आणि या जुगलबंदीत बच्चन कधीच हरलेला नव्हता. ‘आनंदमध्ये अमिताभला घ्यायला आपण संमती दिली ही आपल्या करिअरमधली सर्वात गंभीर चूक होती’ असं खुद्द राजेश खन्नाने नंतर अनेकदा कबूल केलं होतं. राजेश खन्नाचं तकलादू सुपरस्टारपद आनंदमधून अमिताभने एका झटक्यात बरखास्त केलं होतं.  जेवढ्या वेगाने मावळला होता, तेवढ्याच वेगाने ‘मोहब्बतें’नंतर तो पुन्हा भुईतून उगवून जोमाने वर आला. त्याच सुमारास भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात एक नवं पर्व चालू झालं. सेवंटी एमएमच्या पडद्यावर न मावणारी प्रतिमा घेऊन ‘कौन बनेगा करोडपती’च्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून बच्चन पंचवीसतीस इंची टीव्हीच्या चौकटीत आला आणि सदैव जिंकण्याच्याच सवयीनुसार त्याने तिथेही इतिहास घडवला. रामायण, महाभारत या पौराणिक मालिकांच्या वेळी होत, तसे केबीसीच्या वेळीही रस्ते ओस पडू लागले. बाजारयुगाच्या जोरकस आक्रमणात लोकांना रोख पैशाचं महत्व इतकं पटलेलं होतं की ‘केबीसी’ या एका अर्थी जुगारासारख्या कार्यक्रमाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. खुद्द अमिताभने यापुढच्या काळात जाहिराती करताना कसलाही भेदभाव केला नाही. सोन्याच्या दुकानापासून मालिश करण्याच्या तेलापर्यंत कशालाही प्रमोट करताना तो अजिबात कचरला नाही. शत्रुघ्न सिन्हासारख्या त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याच्या पैशांमागे धावण्याच्या वृत्तीवर जाहीरपणे टीका केली. त्या टीकेची कसलीही दखल न घेता जाहिरातींमागून जाहिराती करत आणि पैशाला पैसा जोडत ‘बच्चन’ बाजारात राबत राहिला.


कर्जबाजारी असण्याच्या काळात त्याला पैशाचं मोल पुरेपूर उमगलेलं होतं. त्याने स्वत:चं सबंध ‘वस्तूकरण’ करून घेतलं. १९८८ साली विख्यात चित्रपट समीक्षक डेरेक माल्कम यांना लंडनमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत, ‘मी बाजारपेठेतली एक वस्तू आहे.’ अशी स्पष्ट कबुली अमिताभने स्वत:च दिली होती. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात त्याने स्वत:चं हे ‘वस्तूकरण’ अधिक मोठ्या प्रमाणावर केलं. अमिताभ बच्चन हा विलक्षण प्रतिभावंत नट आहे पण पूर्वार्धातल्या त्याच्या सबंध कारकीर्दीमध्ये त्याच्यातल्या ‘नटा’पेक्षा त्याच्यातला ‘स्टार’ अधिक प्रभावी होता आणि उत्तरार्धातल्या कारकीर्दीत त्याच्यातल्या व्यापारी वृत्तीने त्याच्या स्टारपदावर अधिक प्रभाव टाकला. आणखी पन्नास किंवा शंभर वर्षानंतरही अमिताभ बच्चनची ‘लार्जर दॅन लाईफ प्रतिमा’ लोकांना नक्कीच आठवत राहील, पण त्याचा एखादाही चित्रपट त्यावेळच्या लोकांना आठवेल की नाही याबाबत शंका वाटते. त्याच्या अफाट प्रतिभेला न्याय नेणारी एकही भूमिका त्याने अद्याप केलेली नाही. त्याने चित्रपटांत कसलेही नवे प्रयोग केले नाहीत. त्याच्या कारकीर्दीतच धडपडत असलेल्या ‘समांतर’ चित्रपटाच्या चळवळीला त्याने काहीही योगदान दिलं नाही. देशात राजकीय-सामाजिक प्रकारचं काही बरंवाईट घडतं त्यातल्या एकाही प्रसंगी त्याने स्वत:चं मत दिलं नाही. प्रकाश राज हा अभिनेता मध्यंतरी कठुआ बलात्कार प्रकरणाच्या संदर्भाने बोलताना म्हणाला, ‘Mr. Bachchan is being cowardly. He has a wonderful voice. He should speak up. Kathua not about one party’.  बच्चन तरीही बोलला नाही. तो धंद्यापलीकडचं काहीच बोलत नाही, हे फार कटू वाटणारं असलं तरी वास्तव आहे.


झुंजणाऱ्या नायकाचं केवळ एक ‘मिथक’ रूप त्याने पडद्यावर साकार केलं, तेच त्याचं आरंभीच्या काळातलं सोशिओ-पोलिटिकल स्टेटमेंट आहे. ‘बोलबच्चन ते अबोलबच्चन’ अशा प्रवासापलीकडे काहीच अधिक त्याच्या भव्य-दिव्य कारकीर्दीमध्ये सापडत नाही. ‘बच्चन’ हे केवळ एक यशस्वी बिझनेस मॉडेल आहे. बस्स!

 

१५ फेब्रुवारी १९६९...
१५ फेब्रुवारी १९६९ रोजी अमिताभने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या करारपत्रावर स्वाक्षरी केली तो चित्रपट होता “सात हिंदुस्तानी’... अभिनेते-दिग्दर्शक टिनू आनंद यांच्याकडे “सात हिंदुस्तानी’बद्दल सांगण्यासारखं बरंचसं काही आहे. टिनू आनंद म्हणतात, ख्वाजा अहमद अब्बास त्या वेळी “सात हिंदुस्तानी’ची तयारी करत होते. ते त्या वेळी हीरोइन शोधत होते. नीना सिंह नावाची माझी एक मैत्रीण होती आणि अब्बासला ती हीरोइन म्हणून पसंत पडली. नीना माझ्या सतत मागे लागायची की माझा कोलकात्याचा एक मित्र आहे आणि त्याला चित्रपटात काम करायची तीव्र इच्छा आहे. मी फोटो मागवून घेतला, अब्बासला फोटो दाखवला. तो म्हणाला, त्याला सांग त्याच्याच खर्चाने मुंबईला ये... ऑडिशन दे... अखेर बच्चन मुंबईत दाखल झाला. अब्बास म्हणाले, संपूर्ण चित्रपटासाठी मानधन मिळणार फक्त पाच हजार रुपये. मात्र, बच्चन चित्रपटात काम करण्यासाठी इतका अधीर झाला होता की त्याने लगेचच होकार दिला आणि एका मुस्लिम कवीच्या भूमिकेतून अमिताभ बच्चनचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले. 
 

 

अमिताभच्या काही उल्लेखनीय चित्रपटांच्या दशकवार यादीची ही उजळणी

१९७०-१९८०

सात हिंदुस्तानी, आनंद, अभिमान, बॉम्बे टू गोवा, जंजीर, नमक हराम, रोटी,कपडा और मकान, चुपके चुपके, दीवार, शोले, कभी कभी, हेराफेरी, अमर अकबर अँन्थोनी, कस्मे वादे,गंगा की सौगंध, त्रिशूल,डॉन,मुकद्दर का सिकंदर, मंझील, मिस्टर नटवरलाल, काला पत्थर, सुहाग,दोस्ताना, शान, नसीब, बरसात की एक रात
 

१९८१-१९९०
लावारिस, सिलसिला, कालिया, याराना, सत्तेपे सत्ता, बेमिसाल, नमक हलाल, शक्ती नास्तिक, पुकार, कुली, शराबी, मर्द,आखरी रास्ता, अंधा कानून, जादूगर, अग्नीपथ
 

१९९१-२०००
अजुबा, खुदा गवाह, मृत्युदाता, बडे मियाँ छोटे मियाँ, सूर्यवंशम, मोहोब्बते
 

२००१-२०१०
कभी खुशी गम, बागबान, खाकी, ब्लॅक, बंटी और बबली, सरकार, विरूध्द, कभी अलविदा ना कहना, निःशब्द, चीनी कम, सरकार राज, पा
 

 

२०१०च्या नंतर
आरक्षण, सत्याग्रह, पिकू, पिंक, सरकार-३, रण, तीन पत्ती, वजीर, १०२ नॉट आऊट, ठग ऑफ हिंदुस्तान, बदला.

 

आवाजाची जादू

खर्जातील भारदस्त आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या बच्चन यांनी अनेक सिनेमांचे कथन/निवेदन केले आहे. यात शतरंज के खिलाडी, लगान, बालिका बधू, तेरे मेरे सपने, परिणीता, जोधा अकबर, कहानी, क्रिश ३, कोचड्यान, द गाझी अटॅक अशा अनेक कलाकृतींचा समावेश आहे. त्यांनी फार कमी गाणी गायली; मात्र, त्यातील बहुतांश लोकप्रिय झाली. त्यातील ही काही निवडक गाणी...
 

> कभी कभी मेरे दिल में खयाल आता है (काव्यगायन, कभी कभी १९७६)
> मेरे पास आओ... (मिस्टर नटवरलाल १९७९)
> रंग बरसे भिगे चुनरवाली, नीला आसमाँ... (सिलसिला १९८१)
> तू मैके मत जईयो... (पुकार १९८३)
> मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है... (लावारिस १९८१)
> चोरी चोरी से... सूर्यवंशम १९९९)
> होली खेले, चली चली हवा चली... (बागबान २००३)

 

नागरी पुरस्कार

 १९८४ :     पद्मश्री
 २००१ :    पद्मभूषण
 २०१५ :    पद्मविभूषण
 २००७ : सिनेविश्वातील अमूल्य योगदानाबद्दल फ्रान्सचा ‘नाइट ऑफ लेजिअन ऑफ ऑनर हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानद डॉक्टरेट
 २००४ :     युनिव्हर्सिटी ऑफ झांसी
 २००६ :     युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली
 २००६ :     डे माँटफर्ट युनिव्हर्सिटी, लैस्टेर
 २००७ :     लीड्स मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी इन यॉर्कशायर
 २०११ :     क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी इन ब्रिस्बेन
 २०१३ :     जोधपूर नॅशनल युनिव्हर्सिटी
 २०१५ :     अकॅडेमी ऑफ आर्ट््स 
इन कैरो
{{{

 

बालाजी सुतार 

लेखकाचा संपर्क - ९३२५०४७८८३
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...