आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लेखक’ पुरुषोत्तम बोरकर!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखक मरून जातो, त्यानंतर वाचकाने लेखकाला कुठे भेटायचं असतं? परवा प्रवीण बांदेकर मला म्हणाले, ‘पंजाबराव विसरता येणार नाही सहजी. तो आपल्यातही मिसळून गेला आहे.’ बांदेकरांचं म्हणणं अगदीच खरं आहे. आपण पंजाबरावला भेटतो तेव्हा बोरकरांना भेटतच असतो. ‘पंजाबराव साहेबराव पाटील गरसोळीकर’ आपल्या आत मिसळून गेलेला असेल तर बोरकरही आपल्या आत आहेतच.

 

खरं तर हल्लीचं एकूणच वातावरण असं आहे की एखादा माणूस कवी किंवा लेखक आहे, असं म्हटलं की ऐकणारे लोक मनाशीच कुत्सितपणे हसतात. या पार्श्वभूमीवर बोरकर स्वत:चा उल्लेख ‘लेखक बोरकर’ असा करत यावरूनच ‘लेखक असणं’ त्यांना किती अभिमानास्पद वाटत असेल याची कल्पना करता येईल.

 

“बालाजीभाऊ, लेखक पुरुषोत्तम बोरकर बोलतोय..” 


एखाद्या भल्या सकाळी फोनची घंटा वाजे आणि पलीकडून पहिलं वाक्य येई ते असं! ‘लेखक पुरुषोत्तम बोरकर बोलतोय..’. त्यांचा नंबर माझ्याकडे सेव्ह केलेला होताच अर्थात. ते बोरकरांना माहीतही असणार. पण तरीही फोन उचलला की ते स्वत:चा परिचय देत. आधी मला गंमत वाटायची. नंतर लक्षात आलं की ‘आपण ‘लेखक’ आहोत’ याचा या माणसाला अतिशय सार्थ आणि बुलंद असा अभिमान आहे. खरं तर हल्लीचं एकूणच वातावरण असं आहे की एखादा माणूस कवी किंवा लेखक आहे, असं म्हटलं की ऐकणारे लोक मनाशीच कुत्सितपणे हसतात. या पार्श्वभूमीवर बोरकर स्वत:चा उल्लेख ‘लेखक बोरकर’ असा करत यावरूनच ‘लेखक असणं’ त्यांना किती अभिमानास्पद वाटत असेल याची कल्पना करता येईल.


इतक्या सकाळी फोन करून बोरकर काय बोलत असत? बहुतेक वेळा आधीच्या रात्री बोरकरांनी काही तरी जोरकस वाचलेलं असे. किंवा सकाळी वृत्तपत्राच्या पुरवण्यांमधून त्यांनी काही महत्त्वाचं वाचलेलं असे. ते जे महत्त्वाचं आणि आवडलेलं असे, त्याबद्दल ते भरभरून बोलत. इतरांनीही ते आवर्जून वाचायला हवं, असं त्यांना वाटे आणि मग वेळ न घालवता ते लगोलग असा फोन करत. त्यांच्या बोलण्यात नव्याजुन्या लेखकांच्या लिहिण्याचे भराभर संदर्भ येत. 


आपलं म्हणणं नेमक्या शब्दांत सांगणारे हिंदी-उर्दू शेरही त्यांना फार नेमक्या वेळी आठवायचे. शायरीवर त्यांचं प्रचंड प्रेम असावंसं वाटे. गालिबपासून सुरेश भटांपासून अगदी अर्वाचीन शायरांपर्यंतची शायरी त्यांच्या जिव्हेवर अधिकाराने वस्ती करून असे. बोरकरांचं हे असं बोलणं ऐकणं हा एक ‘अनुभव’ असे माझ्यासाठी. इतरही अनेकांशी ते असंच भरभरून बोलत असतील, याची मला खात्री आहे. वऱ्हाडी बोलीतला आणि वऱ्हाडी माणसांच्या स्वभावातला दिलखुलास गोडवा त्यांच्या भाषेत असे. त्याशिवाय आणखीही एक गोष्ट त्यांच्या बोलण्यातून जाणवे – त्यांच्या बोलण्यात अदब आणि बेफिकिरी यांचं एक गमतीदार दुर्मिळ मिश्रण असे. ‘अमुक अंकात छापलेल्या तुझ्या चार कवितांमधली एकही कविता मला आवडली नाही’ हे त्यांनी अशाच गोड बेफिकीर स्वरात एकदा मला सुनावलं होतं.


बोरकरांनी तीन कादंबऱ्या लिहिल्या. ‘मेड इन इंडिया’, "१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ आणि ‘आमदार निवास खोली नंबर १७६०’. पैकी पहिली कादंबरी इतकी गाजली की ‘मेड इन इंडियाकार’ हे बिरुद त्यांना कायमचं लगटून राहिलं. पुढच्या दोन्ही कादंबऱ्याही उत्तमच असल्या तरी मेड इन इंडियाच्या वलयापुढे त्या झाकोळल्याच राहिल्या. संपूर्णपणे वऱ्हाडी बोलीत लिहिलेली ही छोटेखानी कादंबरी, कदाचित बोलीभाषेत लिहिलेली असल्यामुळे, सर्वदूर वाचकांमध्ये तितकीशी पोहोचलेली नसली तरी, विचक्षण वाचकांच्या-समीक्षकांच्या मनात आणि एकूणच मराठी साहित्यात ती स्वत:चा ‘अक्षर’ असा ठसा उमटवून गेली आहे. ‘अक्षर’ या विशेषणावरून आठवलं, स्वत:च्या साहित्यिक मित्रांचाही उल्लेख बोरकर ‘अक्षरस्नेही’ असाच करत.  

 

अक्षरांवर, भाषेवर, आणि त्यातून निर्माण झालेल्या सकस साहित्यकृतींवर त्यांचा जीव असे. आणि पुढच्या पिढीत लिहित्या झालेल्या तरुण लेखकांच्या लेखनावर लक्षही. जयंत पवार, आसाराम लोमटे, किरण गुरव यांच्या कथांविषयी मन:पूर्वक बोलताना मी त्यांना ऐकलं आहे.


‘मेड इन इंडिया’ मी अनेक वर्षांपूर्वी आणि अनेकदा वाचलेली असली तरी बोरकरांचा आणि माझा प्रत्यक्ष परिचय फक्त पाच-सहा वर्षांआधीचा. मराठी कादंबरीच्या संदर्भाने मी फेसबुकवर काही तरी पोस्ट लिहिली होती, तीत मेड इन इंडियाचा उल्लेख होता. ती पोस्ट वाचून माझे ज्येष्ठ मित्र शाहीर सुरेशकुमार वैराळकरांनी मला मुद्दाम फोन करून सांगितलं की, बोरकर त्यांचे अगदी एकेरीतले मित्र आहे. वैराळकरांनी मला लगेचच बोरकरांचा नंबरही दिला. नेमकं तेव्हाच त्यांच्या पत्नींचे गंभीर आजारपण चालू होते. नंतर काहीच महिन्यांत त्यांचं निधनही झालं. त्या आजारपणाच्या दरम्यान आम्ही अनेकदा बोलत राहिलो. नंतरही, अगदी परवापर्यंत. आमच्या बोलण्याचा शेवट अनेक वेळा कधीतरी भेटण्याच्या वायद्याने होई. एकदोन वेळा विदर्भात जाऊनही प्रत्यक्ष भेटीचा योग मात्र आला नाही. काही ना काही कारणांनी दरवेळी भेट हुकत राहिली.


परवा सतरा जुलैला संध्याकाळी त्यांच्या मुलाचा - केदार बोरकरांचा - फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ‘मघाशी बाबांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि लगेचच काही वेळानंतर हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं’. ते ऐकताना झालेल्या दु:खाच्या जाणीवेसोबतच माझ्या मनात पटकन येऊन गेलं की आता बोरकरांशी भेट होणे नाही. त्यांच्या निधनाआधी दहा दिवस म्हणजे सहा जुलैला आम्ही बराच वेळ बोललो होतो. त्या बोलण्याचा शेवटही ‘आता भेटूयात की कधीतरी..’ असाच झाला होता. इतक्या वर्षांत त्यांची भेट घडली नाही आणि आता बोरकर या जगातूनच गेले आहेत.


लेखक मरून जातो, त्यानंतर वाचकाने लेखकाला कुठे भेटायचं असतं?
परवा प्रवीण बांदेकर मला म्हणाले, ‘पंजाबराव विसरता येणार नाही सहजी. तो आपल्यातही मिसळून गेला आहे.’ बांदेकरांचं म्हणणं अगदीच खरं आहे. आपण पंजाबरावला भेटतो तेव्हा बोरकरांना भेटतच असतो. ‘पंजाबराव साहेबराव पाटील गरसोळीकर’ आपल्या आत मिसळून गेलेला असेल तर बोरकरही आपल्या आत आहेतच. मागच्या जानेवारीत माझा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला, त्यानंतर त्या संग्रहाच्या निर्मिती प्रक्रियेशी संबंधित नसलेल्या केवळ चार लोकांना मी स्वत:हून एकेक प्रत भेट म्हणून पाठवली. त्या चारांपैकी दोन लेखक असे की ज्यांना मी आजवर कधीही भेटलेलो नाही, पण ज्यांच्या अक्षरांचं माझ्यावर ऋण आहे असं मला मनोमन वाटतं- एक भालचंद्र नेमाडे आणि दुसरे पुरुषोत्तम बोरकर. माझ्यापुरते, मराठी कादंबरीत न विसरता येणारे दोनच नायक आहेत. एक नेमाडेंचा पांडुरंग सांगवीकर, दुसरा बोरकरांचा पंजाबराव.     


एकाच वयोगटातील आणि अगदीच साम्य असलेल्या ग्रामीण भोवतालातून आलेल्या, ज्यांची कौटुंबिक-सामाजिक परिस्थितीही खूप साम्य असलेली आहे, अशा या दोन्ही नायकांच्या मूलभूत वृत्तीमध्ये मात्र टोकाचा फरक आहे. पांडुरंग सांगवीकरला काहीच नीट भोगता येत नाही. तो कशातच रुजत नाही. पंजाबराव मात्र थेट वेगळा आहे. त्याला सगळ्या गोष्टींमध्ये रस आहे. जितका रसरसून तो स्वत: जगतो, तितक्याच रसरसत्या वृत्तीने तो जगाकडेही पाहतो. समोर येईल त्याच्याकडे पाठ फिरवण्याची सांगवीकरची वृत्ती त्याच्यात नाही. पुढ्यात येईल त्याचा सामना करणं हा पंजाबरावचा स्वभाव आहे. अनेक अर्थांनी पंजाबराव साहेबराव पाटील पांडुरंग सांगवीकरपेक्षा अधिक ‘मानवी’ आहे. त्याची स्वत:ची खास नजर त्याला कादंबरी-साहित्यात अढळपद देऊन गेली आहे.


आणखी एक फरक असा की, सबंध ‘कोसला’भर सांगवीकर त्याची स्वत:ची गोष्ट सांगतो. पंजाबराव मात्र स्वत:पासून सुरुवात करून ‘गरसोळी’ या अख्ख्या गावाशिवाराची गोष्ट सांगतो. ज्या ताकदीने बोरकरांनी हे गाव, गावाचा स्वभाव, तिथल्या सरंजामी राजकारणाची शैली, गावकऱ्यांचं जगणं; मटका, दारू, चित्रपट, क्रिकेटच्या आणि बाजारीकरणाच्या आक्रमणाने विद्रूप झालेलं ‘गावपण’, शेतीची वाताहत, गावातल्या एकूण राजकीय-सामाजिक अवकाशात होणारी संवेदनशील मनाची कोंडी या सगळ्यांचा पट मांडला आहे, ती ताकद, शैली आणि ते मुळापर्यंत खोल उतरणं, त्यासाठी निवडलेली तीव्र उपहास, उपरोध, विनोद ही माध्यमे आणि कमालीचा बोलीभाषिक अविष्कार; या गोष्टींची तुलना श्रीलाल शुक्ल यांच्या ‘राग दरबारी’ या हिंदीत पन्नासेक वर्षांपासून गाजत आलेल्या कादंबरीशी कदाचित करता येईल. अर्थात राग दरबारीचा पट अधिक विशाल आहे, पण त्याच ताकदीचा पट बोरकरांनी या केवळ एकशे बावन्न पृष्ठांच्या लघुकादंबरीमध्ये मांडून दाखवला आहे.  इथे मुद्दाम नमूद करावीशी वाटते आहे ती अशी की, वर आलेले कोसला, राग दरबारीचे उल्लेख केवळ ‘मेड इन इंडिया’च्या सशक्ततेची जाणीव व्हावी यासाठी आले आहेत. बाकी या तिन्ही साहित्यकृती एकमेकांपासून अजिबात वेगळ्या आहेत. त्यांची परस्पर-तुलना करावी असा उद्देश नाही. कुठल्याही अन्य साहित्यकृतीच्या उल्लेखाशिवायही मेड इन इंडियाचं सशक्तपण ठसठशीतपणे उठून दिसणारंच आहे.


नव्या सशक्त आणि रसरशीत भाषेची निर्मिती हे मेड इन इंडियाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. बाजाराच्या, क्रिकेटच्या, चित्रपटाच्या, वृत्तपत्रांच्या, टीव्हीच्या आक्रमणातून सहज जन्मलेली मराठी-हिंदी-इंग्रजीचं जबरदस्त अर्थवाही मिश्रण असलेली नवी आणि अत्यंत खिळवून ठेवणारी भाषा. भाषेच्या अंगाने या कादंबरीने कमाल कामगिरी केलेली आहे. अशी भाषा मराठी कादंबरीत फारच क्वचित आलेली असेल.


मुंबई, मंत्रालय, आमदार निवास आणि त्यातून वावरणाऱ्या माणसांचं, मंत्री-आमदार-पत्रकार यांचं किडलेलं जग दाखवणारी ‘आमदार निवास खोली नंबर..’, आणि स्वातंत्र्योत्तर काळातला एकूणच मूल्य-हास यावर अतिशय तगडे भाष्य करणारी ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ या दोन कादंबऱ्यांतूनही नंतर वाचकांच्या भेटीला आलेले पुरुषोत्तम बोरकर त्यानंतर काही वृत्तपत्रीय सदरलेखन वगळता वाचकांसमोर आलेच नाहीत. ‘लेखक’ असले तरी ते सामान्य माणूसही होते आणि सामान्य माणसांच्या जगण्यातले ताण त्यांच्याही जगण्याला घेरून होते. त्या ताणांनी त्यांच्यातल्या लेखकाला अनेकदा गुदमरून टाकले. आर्थिक गरजांतून मार्ग काढण्यासाठी उत्तरकाळात त्यांनी व्यावसायिक किंवा राजकीय व्यक्तींची चरित्रे लिहिली. त्यासंदर्भाने त्यांच्याबद्दल खाजगीत भलंबुरं बोलणारे साहित्यिक लोकही होते. निव्वळ ‘साहित्य’ लिहून माणसाला आपला चरितार्थ करता येणं ही गोष्ट सांप्रतकाळी निदान मराठीत तरी अशक्य आहे. त्यामुळे अर्थार्जनासाठी काही वेगळं लिहिण्याचा मार्ग बोरकरांनी निवडला असेल, तर नोकरी-धंदा नीट सांभाळून फावल्या वेळेत लेखन करणाऱ्या सुखवस्तू लेखकांनी त्यांच्यावर टीका करणं खरंतर वाईटच. बोरकरांना व्यावसायिक लेखन करावं लागलं त्याचं कारण मेड इन इंडियामध्ये पंजाबरावने सागून ठेवलेलं आहे – ‘हौले हौले मंदमधुर खुळखुळ वाजणारा खिसा हाच या जगाचा खरा धर्म आहे. बाकी सब झूठ. ज्यब ज्येबमे पैसे होते है, उस वक्त ये जर्रा हीरा है, उसवक्त ये शबनम मोती है’.


आता हे असंच असेल तर कुणी पैसे घेऊन व्यावसायिक लेखन करतो म्हणून त्याला हिणवण्याचं काही कारण नसावं. त्यांनी उघड स्मगलरांची, चोराडाकूंची ‘हभप’ शैलीत उदात्तीकरण करणारी चरित्रे लिहिली असती तर गोष्ट वेगळी असती.


‘पैसा हा लैच गुणीज्यन पदार्थ असतो..’ असं पंजाबराव एकेठिकाणी म्हणतो, ते सर्व अर्थाने खरं आहे.
‘लेखक पुरुषोत्तम बोरकर’ या सगळ्या अडचणी, तडजोडी आणि वादा-प्रवादांच्या पलीकडे असतात. त्यांचं मागणं खूप साधं असतं. उदाहरणार्थ हे असं- “.. और अपना तो इस जमींसे एकही ख्वाब है. इस्टमनकलर ख्वाब. अपने गावाके चारोओर, और सिरीफ गावमेही नही तो पूरे हिंदोस्ताभरमे दिखना सबतरफ हराहीहरा. पूरा डीपग्रीन फॉरेस्ट! घने बियाँबाके माफिक लगनेकू होना ये पूरा येरिया. और गावमे ज्यो यस्टीका रोड आता है उसके दोनोओर होना बरगदके उचेआळे पेड. और उन बरगदक्या दाढ्या ऐशा होना की अलम दुनियाके बंदरोमे ये चर्चा हो की भाई सबसे सुपरसुप्रीम झूला कहां झुलना, तो वो गरसोईके रोडपे . और छांव तो ऐशी घनी, ऐशी घनी की जैशी माँकी गोद! और हरेभरे खेतोमे हर यक्करमे होंगे कमसेकम च्यार आमके झ्याळ. नारियल, गुलमोहर, निलगिरी, नीम, चंपा, ज्यामुन, पीपल, मो, गोंदनं, बकाल, शिसम, साग, हिवर, बेर, औदुंबर, चंदन, केले, पपिते, आस्ट्रेलियन बबूल और आंवला हो सबतरफ. ये सब हो अल्लाताला मगर कांग्रेसीघास और बेशरमके पेड न हो कहींभी! और ये सब हो मगर झील के उसपार न हो गुलशन नंदा. नहीतो उसकी सीरीज यहांके कच्चोंको बेवक्त पकायेगी और बेकार बनायेगी..”


‘लेखक पुरुषोत्तम बोरकर’ हे असं ‘पसायदान’ मागणारा असतो.
- आणि तो मरत नसतो. जिवंत वाहता असतो.
भेटत राहूच, ‘लेखक’ पुरुषोत्तम बोरकर!

 

लेखकाचा संपर्क - ९३२५०४७८८३

बातम्या आणखी आहेत...