आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'हे राज्य व्हावे ही बाळासाहेबांची इच्छा', बाळासाहेबांना वंदन करुन उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंधाराचे राज्य गेले, उजळ माथ्याने वाजत-गाजत नवे सरकार आले
  • नुकसानीची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मदतीचे लवकर निर्णय
  • कर्जमाफी, एक रुपयांत आरोग्य चाचणी, 10 रुपयांत जेवण

मुुंबई : महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुवारी शपथ घेतली. शिवाजी पार्कवर झालेल्या या एेतिहासिक साेहळ्यात ठाकरेंपाठाेपाठ सुभाष देसाई, एकनाथ शिंदे (शिवसेना), जयंत पाटील, छगन भुजबळ (राष्ट्रवादी) अाणि बाळासाहेब थाेरात, नितीन राऊत (काँग्रेस) या सहा मंत्र्यांनाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अनेक दिग्गज नेते उपस्थित हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदींनी टि‌्वटरवरून व काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांनी पत्राद्वारे ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.

- विधानसभा किंवा विधान परिषदेचे आमदार नसताना मुख्यमंत्री बनलेले उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे सहावेच मुख्यमंत्री आहेत.


- स्वप्नपूर्ती : बाळासाहेबांना वंदन करून उद्धव यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ


- आश्वासन : नुकसानीची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा लवकरच निर्णय


तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी २ मंत्र्यांनी घेतली शपथ 
मी शपथ घेतो क
ी...

- एकनाथ शिंदे : मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करून, आई- वडिलांच्या पुण्याईने, मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने ईश्वरसाक्ष शपथ घेतो…
- नितीन राऊत : मी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम वंदन करतो. आदरणीय सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या आशीर्वादाने आणि तथागत भगवान बुद्धसाक्ष शपथ घेतो की…
- सुभाष देसाई : छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...
- बाळासाहेब थोरात : आदरणीय सोनिया गांधी यांच्या आशीर्वादाने, ईश्वरसाक्ष शपथ घेतो...
- जयंत पाटील : आदरणीय शरद पवार यांना वंदन करून ईश्वर साक्ष शपथ घेतो की...
- छगन भुजबळ : 'जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर सावित्रीमाता फुले यांना वंदन करतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करतो. आदरणीय शरद पवार यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी शपथ घेतो. मी गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की…

 

कमलनाथ, स्टॅलिन, टी. अार. बालू प्रमुख पाहुणे


सायंकाळी ६.४० वाजता शिवाजी पार्कवर दिमाखदार साेहळा झाला. राज्याच्या कानाकाेपऱ्यातून तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित हाेते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खरगे, अभिषेक मनू सिंघवी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी आदी मंडळी उपस्थित होती.महाराष्ट्राच्या सहा माजी मुख्यमंत्र्यांचा उपस्थित मान्यवरांमध्ये समावेश हाेता. पंतप्रधान नरेंद्र माेदी, काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मात्र उपस्थित राहू शकल्या नाहीत.

पहिली कॅबिनेट : रायगडासाठी २० कोटी


पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात रायगड किल्ला संवर्धनासाठी २० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी आजवर जे केले, नुकसान झाले त्याची माहिती मुख्य सचिवांकडून मागवली आहे. ती आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 'मंत्रिमंडळ सर्व विभागांचे असते, ते एखाद्या विभागाचे नसते, हे ज्यांनी मुख्यमंत्रिपद अनुभवले आहे त्यांना माहिती आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रम सर्व राज्याचे हित लक्षात घेऊनच तयार केला आहे,' असे उत्तर त्यांनी फडणवीस यांच्या टीकेला दिले.

बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार हाेणार


३ डिसेंबरपर्यंत या सरकारला बहुमत सिद्ध करायचे अाहे. त्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार अाहे. शिवसेना, राष्ट्रवादीला एकूण १५, तर काँग्रेसला १३ मंत्रिपदे मिळणार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, उद्धव ठाकरे शुक्रवारी दुपारी मंत्रालयात पदभार स्वीकारतील.

शपथविधीनंतर ठाकरे परिवार बाप्पाच्या चरणी


शिवाजी पार्कवरील शपथविधी साेहळा संपल्यानंतर उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंबीय श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हाेऊ दे, माझा बळीराजा सुखी राहू, दे, असे साकडे नूतन मुख्यमंत्र्यांनी बाप्पा चरणी घातल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात अाले.

किमान समान कार्यक्रम
 

कर्जमाफी, रुपयात आरोग्य चाचणी, १० रुपयांत थाळी


शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने किमान समान कार्यक्रमात २८ मुद्द्यांचा समावेश केला आहे. यात सेनेच्या वचननाम्यातील १३, आघाडीच्या शपथनाम्यातील १० आणि २ समान मुद्द्यांसह ३ नव्या मुद्द्यांचा समावेश आहे. धर्मनिरपेक्ष शब्दावर भर देत प्रत्येक निर्णय हा भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकात सांगितलेल्या मूल्यांना धरून असेल, असे म्हटले आहे.

दोन समित्या : राज्य मंत्रिमंडळ व आघाडीतील भागीदारांमध्ये समन्वय साधण्यासाठी दोन समन्वय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

टॉप 5 मुद्दे
 
1. अवकाळी पावसामुळे व पुरामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना तत्काळ मदत, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार.


2. राज्य शासनातील सर्व स्तरांवरील रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी. प्रक्रिया सुरू करणार.


3. जवळपास सर्व आरोग्य चाचण्यांसाठी तालुका पातळीवर एक रुपया क्लिनिक, तसेच प्रत्येक नागरिकास आरोग्य विम्याचे कवच.


4. सर्वसामान्यांसाठी स्वस्त आणि सकस जेवणाची थाळी अवघ्या १० रुपयांत देण्याची व्यवस्था.


5. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत ३०० चौ. फुटांऐवजी ५०० चौ. फुटांचे घर.

 

सोहळ्यावरून परतताच देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका
 
शपथविधीला आलेले फडणवीस उद्धव यांना न भेटताच निघून गेले. नंतर त्यांनी ट्विटरवरून टीकाही सुरू केले. ते म्हणाले, 'किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या क्षेत्राचा नामोल्लेखसुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे.
 

बातम्या आणखी आहेत...