आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे नेतृत्व करत असताना त्यांचे वारसदार म्हणून पुतणे राज ठाकरे यांच्याकडेच पाहिले जात होते. परंतु बाळासाहेबांनी मुलगा उद्धव ठाकरेंकडे २००६ मध्ये पक्षाची धुरा साेपवली. गेल्या १३ वर्षांत उद्धव यांनी यशाची कमान चढती ठेवत, कधी आलेल्या अपयशाने खचून न जाता विधानसभेवर भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करून अापल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. वक्तृत्व बाळासाहेबांसारखे नसले तरी उद्धव यांनी यशाची गरुडभरारी घेण्याची जिद्द कायम ठेवून ती पूर्ण करून दाखवली, हे या निमित्ताने सिद्ध झाले. अाता ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव पुढे आले आहे. उद्धव ठाकरेंना तसा राजकारणात सुरुवातीपासून रस नव्हता. फाेटाेग्राफीत ते रमायचे. नंतर बाळासाहेबांच्या सूचनेनुसार त्यांनी हळूहळू राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली. २००२ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी सर्वप्रथम पूर्णवेळ प्रचाराची कामगिरी सांभाळली आणि शिवसेनेला चांगले यश मिळवून दिले. याच कामगिरीची बक्षिसी म्हणून बाळासाहेबांनी २००६ मध्ये महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष केले. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनीच हा प्रस्ताव मांडला हाेता. नंतर मात्र राज ठाकरे, नारायण राणे यांसारखे दिग्गज नेते शिवसेना साेडून गेले. त्यामुळे बाळासाहेब दुखावले, मात्र उद्धव तसूभरही मागे सरकले नाहीत. बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेना संपेल, असे अंदाजही तेव्हा वर्तवले जात हाेते. मात्र, अाजघडीला उद्धव ठाकरेंनी ते खाेटे ठरवून दाखवले. १९९५ मध्ये बाळासाहेबांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करून मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदी बसवले आणि आता २०१९ मध्ये स्वतः उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने मुख्यमंत्रिपदी आरूढ होत आहेत. ५५ वर्षीय शिवसेनेला दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या सत्तेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली अाहे. मुख्यमंत्रिपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर बाळासाहेबांंचे अाशीर्वाद घेताना उद्धव ठाकरे.
स्वभाव शांत, संयमी; पण 'सायलेंट किलरही'
बाळासाहेब ठाकरेंचे जहाल वक्तृत्व, बेधडक व्यक्तिमत्त्व. त्याउलट उद्धव हे शांत आणि संयमी. सायलेंट किलर म्हणूनही त्यांची अाेळख आहे. कोणत्याही कटू प्रसंगात ते आपले संतुलन ढळू देत नाहीत आणि आक्रस्ताळेपणाही करत नाहीत. मात्र, अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ते याेग्य वेळी शांतपणे जागा दाखवून देतात. आपल्या नेतृत्वावर आक्षेप घेणाऱ्या मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी सक्तीने राजकारणातून निवृत्ती घ्यायला लावली, हे त्याचेच उदाहरण.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.