आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार चारित्र्यवान होते; दमलेल्या कार्यकर्त्यांना बांधून घेतलेल्या भाकरी, कच्च्या चिवड्यानेही मिळायची ऊर्जा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलभीमराव पाटील - Divya Marathi
बलभीमराव पाटील

अंबादास जाधव 

उमरगा - तेव्हाचे उमेदवार चारित्र्यवान होते. इंग्रज त्यानंतर निझाम राजवटीत त्यांनी भोगलेल्या अत्याचारामुळे राष्ट्रप्रेमी होते. निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून कोणतीही अपेक्षा नव्हती. प्रचारासाठी गावोगावी फिरल्यावर दमलेल्या कार्यकर्त्यांना सोबत बांधून घेतलेल्या भाकरी, कच्च्या चिवड्यानेही मोठी ऊर्जा मिळायची, अशा हृद्य स्मरणामध्ये रमलेले ज्येष्ठ नागरिक तथा भूविकास बॅँकेचे माजी अध्यक्ष बलभीमराव पाटील यांनी जुन्या काळातील निवडणुकांच्या आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले की, आता डझनभर पक्ष निवडणुकीत दिसून येत आहेत. एकेका पक्षाचे पुन्हा अनेक अधिकृत अनधिकृत उमेदवार रिंगणात उतरतात. पूर्वी स्वातंत्र्यानंतर मात्र दोनच पक्षात निवडणुका व्हायच्या. त्यातही कॉँग्रेसचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून यायचे. तेव्हाचे उमेदवारही चारित्र्यवान होते. इंग्रज व निझाम राजवटीत त्यांनी भोगलेल्या अत्याचारामुळे राष्ट्रप्रेमी होते. अशा शब्दात बलभीम पाटील यांनी जुन्या काळातील निवडणुकांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पहिल्या काही निवडणुकांमध्ये स्वातंत्र्य टिकले पाहिजे ही भावना उमेदवारांबरोबरच  कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यावेळचे उमेदवार स्वातंत्र्यलढ्यासाठी योगदान दिलेले असल्याने त्यांच्यात ही भावना असायची. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात दारू, पैसा याला थाराच नव्हता. दमलेल्या कार्यकर्त्यांना सोबत बांधून घेतलेल्या भाकरी, कच्च्या चिवड्यानेही मोठी ऊर्जा मिळायची. 

तेव्हा घरातील ज्येष्ठ मंडळी लष्कराच्या भाकरी खाऊन नोकरी करू नये, असे राजकारणात येणाऱ्यांना म्हणायचे. आज, अगदी चित्र उलट आहे. राजकारणातून मिळणारी प्रतिष्ठा, सवलत, संपत्ती यामुळे जुन्या काळी असलेले निवडणुकीचे पावित्र्य खऱ्या अर्थाने हरवले आहे. तेव्हाचा प्रचारही आज सारखा नव्हता. 

उमेदवार घरोघरी जाऊन, प्रत्यक्ष मतदाराला भेटून आपण निवडणुकीत का उभे आहोत, याबद्दल सांगायचा. काँग्रेस पक्षाचे चिन्ह बैलजोडी होते. त्यामुळे प्रचाराचे साधनही बैलगाडी असायचे. या शिवाय गावोगावी सोंगाडे, विविध प्रकारचे कलावंत उमेदवाराचा प्रचार करायचे. गावातील एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते गावातून प्रचार करायचे. मतदानाच्या एक दिवसापूर्वी कोतवालाकडून गावात दवंडी दिली जायची, त्याकाळी आचारसंहिता नसली तरी, शिस्त होती, भीती होती. तहसीलदार आणि ठाणेदारांचा दरारा होता. निवडणुकीत जातीपातीचे राजकारणच नव्हते. उमेदवारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती होती. आज संपूर्ण चित्र बदललेले दिसते.  आज एकाच पक्षात अनेक उमेदवार तयार होत असल्याने विचार, तत्वांऐवजी आपली जागा, पद टिकविण्यासाठी वाटेल ते करण्याकडे कल वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...