आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिहीनाचे डोळस जगणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दृष्टिहीन लोकांचं आयुष्य अतिशय खडतर आणि परावलंबी असतं. काही जन्मत:च, तर काही कालांतराने दृष्टिहीन होतात. आयुष्यात न मिळालेल्या आणि मिळून गमावलेल्या गोष्टीचं दु:ख सारखंच असतं. एक मात्र पाहण्यात आले : जरी परमेश्वराने या दृष्टिहीनांवर अन्याय केला असला तरी नाउमेद न होता बरेच जण आपले आयुष्य सामान्य लोकांसारखेच जगतात. अशाच एका व्यक्तीचा सहवास आम्हाला बरीच वर्षे लाभला होता. आताच्या हिंगोली जिल्ह्यात असलेल्या वसमतनगर येथे आमच्या घरमालकांचे एक भाऊ होते. त्या रंगनाथकाकांची चौथी किंवा पाचवी वर्गात शिकत असतानाच दृष्टी अचानकच गेली. त्यांचे सायकलच्या स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान होते. सायकलचा अगदी छोट्यात छोटा स्क्रूसुद्धा ते बिनचूकपणे काढून देत. त्यांना सगळ्या पाटर्सच्या किमती तोंडपाठ असत. मुनिमाला पूर्ण दिवसाचा हिशेब अगदी पैशांमध्ये सविस्तर देत आणि यात एका पैशाचीही कधी चूक होत नसे. त्यांच्या तीव्र स्मरणशक्तीची अनेक उदाहरणे विस्मयकारक होती. देवाची अनेक स्तोत्रे त्यांनी पाठांतराने आत्मसात केली होती. गणितातील सर्व पाढे त्यांना तोंडपाठ होते.
त्यांना घरात कुणाचीही मदत लागत नसे. अनेकांनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला; पण ते कधीही फसले गेले नाहीत. आपल्या दृष्टिहीन असण्याचे कधी भांडवल केले नाही किंवा त्याचा विषाद बाळगला नाही. अतिशय शिस्तबद्ध आणि स्वत:वर प्रचंड नियंत्रण असलेल्या त्यांच्या आयुष्यात ते किती तरी वेळा ठेचकाळले असतील, घसरले असतील, पडले असतील, तब्येतीच्या तक्रारी झाल्या असतील; पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. इतकी अचाट सहनशक्ती असलेली व्यक्ती अजून तरी आमच्या पाहण्यात आली नाही. दृष्टिहीन असणा-या या काकांकडून आमच्यासारख्या असंख्य डोळसांनी, डोळसपणे खूप काही शिकण्यासारखे होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर गदिमांच्या ‘देशी डोळे परी निर्मिशी, तयापुढे अंधार, विठ्ठला तू वेडा कुंभार’ या ओळींची सत्यता पटत असे.