आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येकाच्या आयुष्यात ‘जाणे’ हे नक्कीच आहे. त्यात आपल्या अगदी जवळच्याचे अकाली जाणे खूप क्लेशदायक असते; पण कधी कधी एखाद्या अगदी अपरिचित व्यक्तीचे जाणेसुद्धा आपल्याला कधीही न विसरता येणारी आठवण देऊन जाते. काही कारणाने एका दवाखान्याच्या आयसीयूमध्ये पेशंटच्या सोबत काही दिवस थांबण्याचा प्रसंग आला होता. एके दिवशी दुपारी आमच्या समोरच्या बेडवर सात-आठ वर्षांच्या मुलीला आणले होते. अतिशय चुणचुणीत, गोरा रंग, एखाद्या परीसारखी दिसत होती. तिच्यासोबत असलेल्या आई-वडिलांच्या डोळ्यामध्ये अखंड वाहणारे अश्रू पाहून कोणत्याही संवेदनशील माणसाला गलबलून येत होते. त्या छोट्याशा मुलीला कुठला तरी असाध्य आजार झाला असावा याचा अंदाज येत होता. उपचार सुरू झाले होते. ती आजारी असूनही अतिशय गोड आणि स्पष्ट बोलत होती. तिच्या शाळेतल्या गोष्टी, मैत्रिणींसोबत केलेल्या गमतीजमती अशा आणि इतर खूप गप्पा ती मारीत होती. तिला बोलताना थोडा दम लागतोय हे लक्षात येत होते. तिच्या अशा गोड बोलण्याने साहजिकच तिथल्या सगळ्यांचेच लक्ष तिच्याकडे जात होते आणि ती जसजशी बोलत होती तसतसे तिच्या आई-वडिलांचे डोळे जास्तच भरून येत होते. थोड्या वेळानेच तिला भेटणार्यांचे येणे सुरू झाले आणि परतताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याचे दिसून येत होते. कदाचित सगळ्यांनाच तिच्याजवळ असलेल्या थोड्याशाच वेळेची माहिती झाली होती. अचानक संध्याकाळपासून ती थोडी शांत व्हायला लागली. रात्रीची वेळ आणि त्यात त्या मुलीचे इतके सीरियस होणे यामुळे सगळीकडे एक प्रकारची उदासीनता आली होती आणि सगळे त्या मुलीला आराम पडावा, अशी प्रार्थना करीत होते; पण अखेर काळाने वेळ साधली. कोवळ्या वयात तिच्यावर काळाने घाला घातला. असे अनेक प्रसंग आयुष्यात आले; पण त्या मुलीची ‘एक्झिट’ मनाला एक वेगळीच हुरहुर लावून गेली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.