एटीएम बदलून पैसे / एटीएम बदलून पैसे लांबवणारे भामटे मध्य प्रदेशात

प्रतिनिधी

Nov 06,2018 12:20:00 PM IST

जळगाव - एटीएम केंद्रात शरद खडके यांचे लक्ष विचलित करून त्यांचे एटीएम कार्ड अदलाबदल करून भामट्यांनी नंतर चार दिवसांत वृद्धाच्या खात्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसे काढले. सोने खरेदी केले, गाडीत पेट्रोल भरले. यात वृद्धाची भामट्यांनी चक्क पाच लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या भामट्यांनी अखेरची खरेदी मध्य प्रदेशात केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.


खडके यांचे स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत खाते आहे. ते २८ ऑक्टोबर रोजी बँकेच्या परिसरात असलेल्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आले होते. या वेळी शेजारी उभ्या असलेल्या दोन भामट्यांपैकी एकाने खडके यांना धक्का देऊन त्यांचे लक्ष विचलित केले. तर ही संधी साधून दुसऱ्या भामट्याने खडकेंच्या हातातील एटीएम कार्डची अदलाबदली केली होती. या भामट्यांनी चारच दिवसांत पाच लाख १७ हजार रुपये खर्च केले. दरम्यान, भामट्यांनी २८ ऑक्टोबर रोजी जळगाव शहरातील एका सोन्याच्या दुकानातून सोने खरेदी केले आहे. खडकेंचे एटीएम कार्ड वापरून पैसे दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी नाशिक गाठले. नाशिक येथे काही दुकानांमध्ये खरेदी केली. तिसरा दिवसही नाशिक शहरात घालवला. तर चाैथ्या दिवशी मध्य प्रदेशात जाऊन खरेदी केली. त्यांनी एटीएम कार्ड स्वाइप करून दाेन हजार ६०० रुपयांचे इंधन चारचाकीत भरले आहे. तसेच अखेरची खरेदी मध्य प्रदेशात केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार खडके यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एटीएम कार्ड ब्लॉक केले. पोलिसांनी भामट्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहेत.


मोठी टोळी असल्याचा पाेलिसांना संशय
सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेल्या माहितीनुसार ही एक मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एटीएम कार्ड बदली केल्यानंतर ते वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करतात. काही रक्कम इतर भामट्यांच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करत असतात. चारचाकीने फिरून रात्रीतून शहर, राज्यांतून बाहेर पडत असल्यामुळे त्यांना शोधणे कठीण हाेते.


पोलिसांनी 'त्या' बँकांना दिले पत्र
खडके यांच्या एटीएम कार्डवरून काही रक्कम इतर खात्यांमध्ये वरप्ग केली आहे. त्या संबंधित खातेदारांची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी 'त्या' बँकांना पत्र दिले आहे. नागरिकांनी बँक, एटीएम केंद्र आदी ठिकाणी सतर्क राहावे. अनोळखी व्यक्तीच्या हालचाली संशयित वाटल्यास लागलीच बँक व्यवस्थापक, सुरक्षारक्षक, पोलिसांना माहिती द्यावी

X
COMMENT