आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांततेच्या मार्गाने अाज 'जिल्हा बंद' चे केले आवाहन; शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठानांचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- आरक्षणासह इतरही मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे गुरुवार, ९ ऑगस्ट रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात अाल्याची घाेषणा बुधवारी संध्याकाळी करण्यात अाली. बंद दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात येणार अाहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येणार असून, शाळा-महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली आहे. 


मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हिंसक आंदोलन करू नये आणि कोणीही आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये ,असे आवाहन केले होते. याला सकल मराठा समाजाने सकारात्मक प्रतिसाद देत न्यायालयाचा मान राखत शांततेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पूर्व नियोजनाप्रमाणे क्रांतीदिनी बंदचे आवाहन केल्याप्रमाणे महाराष्ट्रात शांततेत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्यामुळे आता अकोला जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बंददरम्यान जाळपोळ करणे, रास्ता रोको करणे यासारखे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून दुचाकी रॅली निघणार अाहे. तसेच तालुकास्तरावरही तहसील कार्यालयासमोर शांततेने समाजबांधव बसणार आहेत. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या २० वीरांना सामूहिक श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. 


अशी अाहे अाचारसंहिता...

बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सकल मराठा समाज बांधवांकरिता आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. यात बंद शांततेने पुकारणे, सार्वजनिक, खासगी, शासकीय मालमत्तेचे नुकसान करु नये, पाेिलसांना सहकार्य करावे, लढाई जिंकली-तहात हरणं मान्य नाही अादींचा समावेश अाहे. बंदला बाजार समितीमधील व्यापारी व अडत्यांनीही पाठिंबा दिला अाहे. 


'जिल्हा बंद'मुळे पोलिस बंदोबस्त तैनात
सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या गुरुवारच्या बंदसाठी पोलिस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे. हजारावर पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सशस्त्र पोलिस दलाच्या व शीघ्र कृती दलाच्या तुकड्यासह साध्या वेशातील पोलिस कर्मचारी आंदोलनावर लक्ष ठेवून असतील. 


दरम्यान, पोलिस दलाच्या वतीने पुर्वतयारीचा भाग म्हणून बुधवारी विविध स्तरावर बैठका घेण्याबरोबर बंदोबस्त व साहित्याच्या वापराची रंगीत तालीम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहरात घेण्यात आली. पोलिस ठाणेस्तरावरही मनुष्यबळ व वाहनासह रूट मार्च घेण्यात आला. पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर व उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


आज शाळा बंदचा निर्णय 
मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्टला असल्याने अनुचित प्रकार होवू नये याची दक्षता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. 


संयम बाळगावा 
मराठा बांधवांनी शांततेचा मार्ग अवलंबवावा. कायदा हातात घेऊ नये. नागरिकांना त्रास होणार नाही. तसेच अत्यावश्यक सेवा बाधित होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

- उमेश माने पाटील, एसडीपीआे. 

बातम्या आणखी आहेत...