International news / रोहिंग्यांच्या छावण्यांतील दोन मदत संस्थांवर बांगलादेशने घातली बंदी

मायदेशी प्रत्यार्पणापासून निर्वासितांना रोखत असल्याचा झाला आरोप

Sep 06,2019 09:51:00 AM IST

कॉक्सबाजार - रोहिंग्या मुस्लिमांच्या छावण्यांतील दोन मदत संस्थांवर बंदी घालण्यात येत आहे, अशी घोषणा बांगलादेशने गुरुवारी केली. या दोन्ही संस्था रोहिंग्यांना मायदेशी प्रत्यार्पणापासून रोखत आहेत, असा आरोप बांगलादेशने केला आहे.


म्यानमारच्या लष्कराने नरसंहार केल्यानंतर जवळपास १० लाख रोहिंग्या मुस्लिमांनी दोन वर्षांपूर्वी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. त्यामुळे बांगलादेशमधील पायाभूत सुविधांवर चांगलाच ताण पडत आहे. गेल्या वर्षभरात बांगलादेशने रोहिंग्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यासाठी प्रयत्न केले होते. दुसरा प्रयत्न दोन आठवड्यांपूर्वी झाला. पण एकही निर्वासित परत जाण्यास तयार नसल्याने बांगलादेशची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे रोहिंग्यांना भडकावणाऱ्या या दोन संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे.


अमेरिकेतील अॅडव्हेन्टिस्ट डेव्हलपमेंट आणि मदत संस्था (एडीआरए) तसेच स्थानिक अल मरकझुल इस्लामी या दोन मदत संस्था मायदेशी परत जाऊ नका, अशी चिथावणी निर्वासितांना देत असल्याचा आरोप बांगलादेश सरकारच्या एनजीओ विभागाने केला आहे. कॉक्सबाजार जिल्ह्यातील निर्वासित छावण्यांचे प्रशासक कमाल हुसेन म्हणाले की, देशभरातील उपक्रम तत्काळ थांबवण्याचे आदेश या दोन्ही एनजीओंना देण्यात आले आहेत. प्रशासन त्यानुसार कारवाई करत आहे. या दोन्ही संस्थांचे बँक व्यवहार थांबवावेत, असे आदेश एनजीओ विभागाने दिले आहेत.

म्यानमार जोपर्यंत सुरक्षिततेची आणि नागरिकत्वाच्या दर्जाची खात्री देत नाही तोपर्यंत आपण मायदेशी परतणार नाही, असे रोहिंग्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्वासितांनी अलीकडेच छावण्यांत नरसंहाराचा दुसरा स्मृतिदिन साजरा केला होता. तेव्हापासून छावण्यांतही तणाव आहे. स्थानिक सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी ओमर फारूक यांच्या हत्येनंतर झालेल्या हिंसाचारात चार निर्वासित ठार झाले आहेत. रोहिंग्यांनीच फारूक यांची हत्या केल्याचा आरोप आहे. हिंसाचार उसळल्यानंतर प्रशासनाने गेल्या सोमवारी छावण्यांतील मोबाइल फोन सेवा बंद करावी, असे आदेश कंपन्यांना दिले होते.

कठोर कारवाईचा परराष्ट्रमंत्र्यांनी दिला होता इशारा
मदत संस्था जर आपल्या मर्यादेचे उल्लंघन करून काही करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी गेल्या आठवड्यात केली होती. कॉक्सबाजार येथील सुमारे ३५ छावण्यांत १० लाख निर्वासित राहतात. तेथे १३० मदत संस्था काम करतात.

X