आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक मॅनेजर, फील्ड ऑफिसरने चोरट्यांकडून बँकेत करवून घेतली 12 लाखांची चोरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : अपघाताचा इन्शुरन्स क्लेम नाकारल्यामुळे बोदवड येथील नम्र फायनान्सच्या बँक मॅनेजरने फील्ड ऑफिसरच्या मदतीने पाच चोरट्यांकडून स्वत:च्या बँकेत १२ लाख रुपयांची चोरी करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी बँक मॅनेजर, फील्ड ऑफिसर व पाच चोरट्यांना गुरुवारी अटक केली.


मनोज धर्मराज माळी (रा.बोदवड) असे बँक मॅनेजरचे नाव आहे, तर सुनील कडू इंगळे (३०, रा.निमखेडी, ता.मुक्ताईनगर) हा फील्ड ऑफिसर आहे. या दोघांनी किसन ऊर्फ शेंड्या कैलास सोनवणे (२२), विलास मधुकर पवार (२४), प्रवीण सुखा धुलकर ऊर्फ लहान्या, गणेश सोपान पवार (२५) व प्रदीप किशोर सोनवणे (२०, सर्व रा.भिलवाडा, बोदवड) अशी त्यांची नावे आहेत.


माळी हा नम्र फायनान्सचा व्यवस्थापक आहे. गेल्या वर्षी त्याचा अपघात झाला होता. या वेळी त्याने नम्र फायनान्समध्ये इन्शुरन्स क्लेम केला होता. कंपनीने हा क्लेम नाकारला होता. याचा राग आल्यामुळे माळी याने फील्ड ऑफिसर इंगळे याच्या मदतीने बँकेतच चोरी करण्याची योजना आखली. या दोघांनी गावातीलच भिलवाड्यात राहणाऱ्या पाच जणांना चोरी करण्यासाठी टिप दिली. त्यानुसार १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री पाचही चोरटे तोंडाला रुमाल बांधून बँकेजवळ आले. त्यांनी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नंतर बँकेत प्रवेश केला. बँकेत झोपलेले कर्मचारी अमोल मोरे यांच्याकडून दरवाजा उघडाच राहिल्याने त्यांनी सहज आतमध्ये प्रवेश केला. यानंतर दोन कपाटांमध्ये ठेवलेेली १२ लाख ८ हजार २५२ रुपयांची रोकड लांबवली होती. चोरी केल्यानंतर पाचही चोरटे बोदवड शहरातून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी अमोल मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


बँक मॅनेजर माळी व फील्ड ऑफिसर इंगळे यांनी चोरीची योजना आखली होती. प्रत्यक्ष चोरी झाल्यानंतर सर्व सात जणांनी प्रत्येकी दीड लाख रुपयांप्रमाणे रोकड वाटून घेतली होती.