Home | Maharashtra | Vidarva | Akola | Bank wise number of crop insurance holders

पीक विमा धारकांची बँकनिहाय संख्या सांगण्यास यंत्रणेने केले अाता हात वर

प्रतिनिधी | Update - Aug 03, 2018, 12:16 PM IST

'सर्व्हर डाऊन'चा खोडा आल्याचे कारण पुढे करून जिल्ह्यातील पीक विमा धारकांची बँकनिहाय संख्या सांगण्यास यंत्रणेने हात वर के

 • Bank wise number of crop insurance holders

  अकोला- 'सर्व्हर डाऊन'चा खोडा आल्याचे कारण पुढे करून जिल्ह्यातील पीक विमा धारकांची बँकनिहाय संख्या सांगण्यास यंत्रणेने हात वर केले आहे. परिणामी प्रत्यक्षात कोणत्या बँकेची कामगिरी चांगली झाली आणि कोणत्या बँकांनी सुमार काम केले, हे अजूनही उघड झाले नाही. कर्ज वितरणात सुमार कामगिरी करणाऱ्या बँकांमधील ठेवी काढून घेण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी केली होती, हे विशेष.


  जिल्ह्याच्या सातही तालुक्यातील पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या १ लाख ८४ हजार ६४६ असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेनीया आणि त्यांना माहिती पुरवणारे आयसीआयसीआय लोम्बार्डचे जिल्हा समन्वयक गौतम पूर्ती या दोघांनीही या आकड्याची री ओढली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने देखील पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या हीच असल्याच्या बाबीला दुजोरा दिला. परंतु बँकनिहाय शेतकऱ्यांची संख्या कुणीही सांगू शकले नाही.


  प्रधानमंत्री पीक विमा या नावाने शेतकऱ्यांना कवच पुरवणारी ही योजना ३१ जुलैच्या मध्यरात्री बंद झाली. तत्पूर्वी १ लाख ८४ हजार ६४६ शेतकऱ्यांनी अर्ज केल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. परंतु हे अर्ज कोणत्या बँकेत किती संख्येने प्राप्त झाले, याची माहिती त्यांच्याजवळ नाही. प्राप्त आकड्यांमध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या १ लाख ४२ हजार ९८३ असून कर्जदार शेतकरी ४१ हजार ६५३ आहेत.


  विशेष असे की कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्यांच्या कर्ज रकमेतून आपोआप वळता केला जातो. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना स्वत:हून बँकेत पैसे जमा करत पिकांचा विमा उतरवावा लागतो.


  कर्जमाफीची प्रक्रिया बराच काळ चालल्याने शेतकरी आधीच त्रस्त होते. त्यातही १.३८ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर १ लाख १७ हजार ३८३ शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली गेली.


  कर्जमाफी झालेले हे सर्व शेतकरी नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरतात. त्या सर्वांनी कर्ज काढले असे गृहीत धरले तरी कर्जदार शेतकऱ्यांची पर्यायाने विमा उतरवणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांची संख्या तेवढी झाली असती परंतु ती ४१ हजार ६६३ वरच थांबली आहे. त्यामुळे पीक विमा उतरवण्यात कोणत्या बँका पुढे गेल्या आणि कोणत्या मागे राहिल्या हे कळू शकले नाही.


  गतवर्षीची संख्या होती १.४७ लाख
  गतवर्षी विहित मुदतीत पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ४७ हजार ५६६ एवढी होती. त्यामध्ये कर्जदार शेतकरी ५३ हजार ६६१ तर बिगर कर्जदार शेतकरी ९३ हजार ९१५ एवढे होते. यावर्षी अनेकांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्यामुळे ही संख्या मोठा प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही.


  बँकनिहाय आकडे अजूनही अप्राप्त
  सर्व बँकांचे पीक विमा संबंधीचे काम ३१ जुलैच्या मध्यरात्री थांबले असले तरी दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत त्यांना आकडेवारी भरण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु त्यानंतर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे बँकनिहाय आकडे कळू शकले नाही.
  - गौतम पूर्ती, जिल्हा समन्वयक, आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनी


  २४ बँकांमार्फत राबवली योजना
  जिल्ह्यातील २४ बँकांमार्फत पीक विमा उतरवण्याचे काम केले गेले. योजना ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सुरु होती. त्या काळात सर्वांनीच शेतकऱ्यांना सहकार्य केले. परंतु कोणत्या बँकेत नेमक्या किती शेतकऱ्यांचा विमा उतरवला गेला, हे अद्याप कळले नाही.
  - आलोक तारेनीया, व्यवस्थापक, अग्रणी बँक, अकोला.

Trending