आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रानभाज्यांची मेजवानी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी संस्कृती ही निसर्गाच्या जवळची आहे. त्यांची जीवनशैली अन् खाद्यसंस्कृतीही तशी निराळी असते. आदिवासी खाद्यसंस्कृतीत भात हा महत्त्वाचा अन्नपदार्थ असतो. त्यासोबत जंगलात सापडणाऱ्या भाज्या हा त्यांच्या आहारातील मुख्य घटक असतो. तुमच्या आजूबाजूला या भाज्या उपलब्ध असतीलच असं नाही, पण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या खाद्यसंस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने मधुरिमाच्या वाचकांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील खास पाककृती...  

वास्तेची भाजी

साहित्य- वास्ते म्हणजे बांबूच्या झाडांचे कोंब. हे कोंब पावसाळ्यात जंगलात सापडतात. याची भाजी खूप चवदार तसेच पौष्टिकही असते. जंगलात जाऊन वास्ते तोडण्याला ‘काळे छिलके’ काढणे म्हणतात. सोबत फोडणीसाठी तेल, जिरे,मोहरी, चार ते पाच लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ.   

कृती- बांबूच्या कोंबांचे छिलके काढून घेणे. त्यानंतर चुलीवर पाणी गरम करून त्यात त्याला चांगले उकळून घेणे. त्यानंतर एका कढईत थोडं तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, लसूण टाकून फोडणी तयार करावी व पाण्यात उकळलेल्या कोंबांना तडका द्यावा. यात चवीनुसार मीठ आणि तिखटासाठी हिरवी मिरची वापरू शकता. ही भाजी भातासोबत खाल्ली जाते. भाजीतले पाणी व्यवस्थित आटवून ड्राय करून घेतली तर ही भाजी एक ते दोन दिवस टिकते. 
 
 

कुडाच्या फुलांची भाजी

साहित्य- कुडाच्या झाडाला पांढरी फुलं लागतात. या फुलांची भाजी ही थंडीच्या दिवसांत अधिक खाल्ली जाते.  एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा, एक चमचा लाल तिखट, कोथिंबीर, दोन ते तीन चमचे तेल, चिरलेला टोमॅटो अर्धी छोटी वाटी. 

कृती- प्रथम कुडाच्या झाडाची ८ ते १० फुलं घ्या. ती स्वच्छ पाण्यात धुऊन घ्या. एका कढईत तेल गरम करा. त्यात कांदा टाकून चांगला परतून घ्या. त्यानंतर चिरलेले टोमॅटो, लाल तिखट घालून परता. नंतर कुडाच्या झाडाची फुलं त्यात टाकून परता. चवीनुसार मीठ टाकून भातासोबत खाऊ शकता.
 

वरंबीची भाजी

साहित्य- मशरूमला आदिवासी भागात वरंबी म्हणतात. वरंबी स्वच्छ धुऊन घ्यावी. त्याच्या दांड्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. चिरलेला कांदा दोन वाटी, कोथिंबीर, दोन चमचे तेल, लाल तिखट, दोन चमचे आलं,लसूण पेस्ट, फोडणीसाठी जिरे, मोहरी, मीठ.

कृती- प्रथम तेल गरम करून त्यात कांदा चांगला परतून घ्या. त्यात जिरे, मोहरी, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट टाका. परतून घ्या. त्यात बारीक चिरलेली वरंबी व चिरलेले दांडे टाकून परतून घ्या. वरून कोथिंबीर बारीक चिरून टाका. त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी टाका व पातळ रस्सा बनवा. 
 

मोहाची पोळी

साहित्य- रोवणी, कापणी, मोह आणि तेंदूपत्ता असे चार हंगाम आदिवासींमध्ये मानले जातात. मोहाचा हंगाम हा मार्च-एप्रिलमध्ये असतो. मोहाचे खूप पदार्थ बनवले जातात. मोहाच्या पोळीसाठी मोहाची फळं, साखर किंवा गूळ,तेल. 

कृती- मोहाच्या फळांना एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. त्यामुळे त्या फळांना पाण्यात भिजत ठेवतात. त्यानंतर ती फळं वाटून घ्यावीत.त्या वाटणात गूळ किंवा साखर टाकावी. मिश्रण एकत्रित करून घ्यावे. त्यानंतर गव्हाचे पीठ मळून घ्यावे. त्यात पुरणाच्या पोळीत ज्या प्रमाणात पुरण भरतो त्याप्रमाणे मोहाचे बनवलेले सारण भरून पोळ्या लाटाव्यात व तेल लावून शेकून घ्याव्यात. या पोळ्या जास्त दिवस टिकतात.

बातम्या आणखी आहेत...