आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापू अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ...; नागवडे यांना सुशीलकुमार शिंदे यांची श्रद्धांजली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- बापू हे अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. १९७८ मध्ये अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करूनदेखील बापूंनी काँग्रेस सोडली नाही. बापूंच्या निधनाने जिद्दी, कष्टाळू आणि समाजाशी बांधिलकी असलेला नेता हरपल्याची भावना माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. 


राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी वांगदरी येथे घोडनदी तीरावर पार पडला. बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. या वेळी पांडुरंग महाराज नागवडे यांचे प्रवचन झाले. विलास महाराज जाधव, बबन महाराज सुडगे, निजामभाई शेख, मचाले महाराज आदींनी बापूंना श्रद्धांजली अर्पण केली. 


विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले, बापूंनी हयातभर केलेल्या कष्टामुळे श्रीगोंद्याचा सर्वांगीण विकास झाला. बापू नि:स्वार्थ, निष्कलंक आणि समाजाभिमुख जीवन जगले. आव्हानात्मक परिस्थितीतदेखील बापूंनी सक्षमपणे राज्य साखर संघाचे नेतृत्व केले. 


माजी मंत्री दिलीप वळसे म्हणाले, मी नगर जिल्ह्याचा दहा वर्षे पालकमंत्री होतो, त्या काळात बापूंची कार्यपध्दती जवळून अनुभवण्याची अनेकदा संधी मिळाली. राज्य साखर संघात बापूंच्या अध्यक्षतेखाली संचालक म्हणून काम केले. बापूंच्या निधनाने सहकार चळवळीची मोठी हानी झाली आहे. 


माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, बापू ही व्यक्ती नव्हे, तर एक विचार होता. बापू सदैव समाजासाठी जगले. बापूंच्या निधनाने श्रीगोंदे तालुका तर पोरका झाला आहेच, पण बापूंच्या निधनाने राज्यातील सहकाराचे छत्र हरपले आहे. 


आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, बापूंच्या निधनाने सहकार आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. श्रीगोंदे तालुक्याला घोड, कुकडीचे पाणी मिळवून देण्यासाठी बापूंनी मोलाचे योगदान दिले. कारखानदारीमध्ये बापूंचा केवळ प्रशासनाचाच नव्हे, तर तांत्रिक अभ्यास देखील गाढा होता. बापूंनी राज्याच्या साखर कारखानदारीचे नेतृत्व केले. 


आमदार राहुल जगताप म्हणाले, सहकारी कारखान्यांचे खासगीकरण होत असताना बापूंनी मात्र एका खासगी कारखान्याचे सहकारात रूपांतर करून एक आदर्श सहकार क्षेत्रासमोर ठेवला आहे. बापूंच्या निधनाने माझ्यासह श्रीगोंदे तालुका पोरका झाला. 


माजी मंत्री बबनराव पाचपुते, खासदार दिलीप गांधी, दादा पाटील शेळके, माजी आमदार पोपटराव गावडे, अशोक पवार, प्रदीप कंद, बाबासाहेब भोस, बंडू गायकवाड, मंगलदास बांदल, बिपीन कोल्हे, शशिकांत गाडे, हर्षदा काकडे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. चंद्रशेखर घुले, ज्ञानदेव वाफारे, संपतराव म्हस्के, आशुतोष काळे, देवदत्त निकम, राजेंद्र फाळके, प्रशांत गडाख, संदीप वर्पे, भरत खैरे, राजेंद्र गुंड, किरण पाटील, घनश्याम शेलार, प्रा. तुकाराम दरेकर आदींसह श्रीगोंदे, शिरूर तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. 'नागवडे' कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी उपस्थितांचे ऋण व्यक्त केले. 

बातम्या आणखी आहेत...