आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापूंनी लावलेल्या पिंपळवृक्षाचा राज्यभर विस्तार करणार; १५०व्या गांधी जयंतीनिमित्त सरकारचा उपक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रपिता महात्मा गांधींनी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात स्वत: पिंपळाचे रोप लावले होते. त्या पिंपळवृक्षाची रोपे राज्यातील सर्व हुतात्मा स्मारके व तालुक्यांच्या ठिकाणी लावली जाणार आहेत. बापूंच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्त राज्य सरकारने त्यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारार्थ भरगच्च उपक्रम आखले असून पिंपळवृक्षाची लागवड त्यातला एक भाग आहे. 


गांधी या आश्रमात १९३६ मध्ये राहायला आले. त्यांच्या कुटीच्या शेजारीच त्यांनी पिंपळाची ३ रोपे लावली होती. त्याचा आता ८२ वर्षांचा डेरेदार पिंपळवृक्ष झाला आहे. या पिंपळवृक्षाची असंख्य रोपे तयार केली जात असून ती स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिकांच्या २०६ स्मारकांच्या व राज्यातील सर्व ३५५ तालुक्यांच्या ठिकाणी लावली जातील. वन विभागाचे अधिकारी आश्रमात आले होते. बापूंनी लावलेल्या पिंपळाच्या बिया ते गोळा करून घेऊन गेले अाहेत, अशी माहिती सेवाग्राम आश्रमाचे व्यवस्थाप भावेश चव्हाण यांनी दिली. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीने बापूंच्या १५० व्या जयंती वर्षातील कार्यक्रमाचा आराखडा बनवला आहे. राज्यांच्या वाट्यास त्यातील २६ कार्यक्रम आले आहेत. पंकजा मुंडे यांच्याकडे असलेला ग्रामविकास विभाग राज्यातील गांधी जयंतीच्या कार्यक्रमाचे संचालन करत आहे. 


४ आॅगस्ट रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात गांधी जयंती वर्षाच्या कार्यक्रमाच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. त्यात २० कार्यक्रम असून ते त्या त्या विभागांनी वर्षभरात राबवायचे आहेत. त्याअंतर्गत राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांत महाखादी महोत्सव भरवले जाणार आहेत. तसेच ज्या शहरात गांधी यांच्या नावे रस्ता आहे, त्या रस्त्यावर वर्षभर आठवड्यातून दोन दिवस खादी व ग्रामोद्योग उत्पादनांची विक्रीसुद्धा केली जाणार आहे. 


राज्याच्या वाट्याला २६ कार्यक्रम, केंद्राचा निधी नाही 
केंद्र सरकारने राष्ट्रपित्याच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त ५६ कार्यक्रम सुचवले आहेत. त्यातील २६ कार्यक्रम राज्याच्या वाट्यास आले आहेत. आश्चर्य म्हणजे या कार्यक्रमासाठी केंद्र सरकार राज्यांना एका रुपया निधी देणार नाही. त्या-त्या विभागांनी वार्षिक तरतुदीमधून खर्च भागवायचा आहे. 


राज्यभरातील गांधीजींच्या पुतळ्यांचा जीर्णोद्धार 
राज्यातील महात्मा गांधी यांच्या सर्व पुतळ्यांचा जीर्णोद्धार केला जाणार असून परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. गांधी यांचे वास्तव्य राहिलेले मुंबईचे मणीभवन, पुण्याचा आगाखान पॅलेस आणि येरवडा जेल या वास्तूंमध्ये पर्यटकांसाठी सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. 'महात्मा गांधी १५०' या नावाने मोबाइल अॅप तयार करण्यात येईल. त्यावर गांधी यांचे साहित्य, शिकवण व विचार यांचा प्रसार केला जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...