आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानकरांचे बारामतीचे तिकीट पक्के, पण भाजपकडून कमळाची अट; जानकर मात्र स्वत:च्या चिन्हावर लढण्यावर ठाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) सर्वेसर्वा व राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना भाजपने पुन्हा एकदा बारामती लाेकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. मात्र, जानकर यांनी या वेळी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अट घातली आहे. दुसरीकडे, जानकर हे कमळ चिन्ह स्वीकारण्यास तयार नाहीत, त्यामुळे बारामतीचा भाजपचा उमेदवार निश्चित होण्यास विलंब होत आहे.  

 


मित्रपक्षांना भाजप एक जागा सोडण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. रिपाइं नेते रामदास आठवले ईशान्य मुंबईतून, तर महादेव जानकर बारामतीमधून जागेची मागणी करत आहेत. जानकर हे माढामधूनही इच्छुक होते. मात्र, राष्ट्रवादीतून भाजपत नुकतेच प्रवेशकर्ते झालेले रणजितसिंह मोहिते पाटील यांना येथून भाजपचे तिकीट मिळणार आहे. त्यामुळे जानकर यांना बारामतीमधून पुन्हा भाजप जागा सोडणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे.  

 


बारामतीमधून ‘रासप’ आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन व आई रंजना यांच्या नावाचाही भाजपकडून विचार चालू होता. मात्र, सध्या जानकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे, अशी माहिती रासपच्या राज्य सचिव डाॅ. उज्ज्वला हाके यांनी दिली. जानकर हे धनगर समाजाचे आहेत. या समाजात अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या मागणीवरून मोठी नाराजी आहे. त्यामुळे जानकर यांना भाजप दुखवू इच्छित नाही. २०१४ मध्ये जानकर यांनी रासपच्या तिकिटावर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याशी लढत दिली हाेती. या निवडणुकीत ते पराभूत झाले असले तरी सुप्रियांनी त्यांनी विजयासाठी चांगलेच झुंजवले हाेते.  २०१४ मध्ये मोदी यांची बारामतीमधील सभा शरद पवार यांच्या आग्रहामुळे रद्द केली होती. ती सभा जर झाली असती तर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे पराभूत झाल्या असत्या, असा दावा खुद्द जानकर यांनी केला होता.

 

पवारांच्या इशाऱ्यावर ठरणार उमेदवार?  
मी बारामतीमधून इच्छुक आहे. मला भाजप नक्की तिकीट देईल. मात्र, मी काहीही झाले तरी कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, असे महादेव जानकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. महादेव जानकर यांना भाजपने दोन वेळा विधान परिषदेवर संधी दिली आहे. दोन्ही वेळा त्यांनी स्वत:च्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. मागच्या परिषदेच्या उमेदवारी वेळी भाजप व रासपने चिन्हाचा मुद्दा ताणला होता. शेवटी अर्ज भरण्याच्या काही तास आधी भाजपने माघार घेत जानकर यांना त्यांच्या चिन्हावर अर्ज दाखल करण्यास संमती दिली होती.  
 

बातम्या आणखी आहेत...