आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हुरडा पार्टीला चला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंडीचा महिना आटोक्यात आलेला असतो. अशात फेब्रुवारी महिना उजाडताच सर्वांना हुरड्याची आठवण होते. त्यासाठी शहरातील लोक सुट्टी काढून याचा प्लॅन करतात.

 

हुरडा. कोवळा लुसलुशीत, गुळभेंडीचा, कुचकूचीचा. आपल्या अंगभूत वैशिष्ट्यानं खवय्यांची हौस भागवणारा. नातेसंबंधांचे आणि मैत्रीचे धागे अधिक दृढ करणारा. हा हुरडा म्हणजे महाराष्ट्राच्या कृषी जीवनातलं एक सांस्कृतिक संचितच आहे. 


हुरडा हा शब्द ऐकून नवल वाटलं का? शहरी मंडळींसाठी हा शब्द नवलाचाच आहे. थंडीचा महिना आटोक्यात आल्यानंतर व फेब्रुवारी महिना उजाडताच सर्वांना हुरड्याची आठवण होते. त्यासाठी शहरातील लोक सुट्टी काढून याचा प्लॅन करतात. या वर्षी ज्वारीची वाढ तशी चांगली असल्याने शेतात हुरडा चांगल्या प्रकारे मिळतो आहे.


मी शेतकरी असल्यामुळे माझे मित्र मला हुरड्यासाठी तगादा लावतात. एकदा फोनवरून माझ्या मित्राला कळवलं की, आमच्या शेतात हुरडा आहे. "हुरडा हा शब्द माझ्या मित्राच्या  कानी पडताच, हा हुरडा नेमका काय असतो, असा प्रश्न त्याला पडला. भरलेली पण कोवळी कणसं आगटीत भाजून ती हातावर चोळली किंवा पोत्यावर बदडली तर ज्वारीचे जे दाणे बाहेर येतात त्याला ‘हुरडा’ म्हणतात. हो का, म्हणाला आणि हसायला लागला.


अजूनही ६० टक्के लोकांना हुरडा काय असतो माहिती नाही खरंच. उद्याच्या पिढीला मात्र हुरडा हा शब्दस्वरूपात राहून जाईल कारण दिवसेनदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच गंभीर होत चालली आहे.


अरे माहितीय नं, उद्या आपल्याला हुरडा खायला जायचंय शेतात, असं म्हणत अशाच एका हुरडा पार्टीचा बेत घरच्यांनी आखला. घरातील सगळी नातीगोती एकत्र येतील अन या निमित्तानं एक छानसं ‘गेटटुगेदर’ही होऊन जाईल हा हेतू. या निमित्ताने सुखदु:खाची देवाणघेवाण होते. मदतीचे अनेक हात पुढं येतात आणि आयुष्यभराची सोबत करणारी नवी नातीही यातून निर्माण होतात.


मोहरलेल्या आंब्याच्या सोबतीनं काळ्याशार मातीची ढेकळं तुडवत हुरडा खाण्यासाठी जाताना ज्याला आपण आता ‘निसर्ग पर्यटन’ म्हणतो त्याची किती चांगली तजवीज माणसानं फार पूर्वीपासून करून ठेवली आहे. तसं आमच्या घरी जर गर्दी जास्तच होती. कारणही हुरड्यासाठी आमच्या तीन बहिणी आणि सहकुटुंब परिवार असा आमचा बेत ठरला जायचा. आम्ही सगळे शेतात पोचलो. पोचल्यावर कोवळा कोवळा हुरडा काढायला सुरुवात झाली. मस्तपैकी दोन पोती भरून हुरडा काढला. एक फूट खड्डा केला, थोड्या गोवऱ्या आणून त्या पेटवल्या. जाळ लागल्यावर थोड्या वेळाने कणसं घातली. आणि कणीस भाजल्यावर दोन्ही हाताने घासली. त्या भाजलेल्या कणसातून बिया बाहेर पडतात.


 आऽऽ ह ऽऽआ.....


हुरडा पार्टीमध्ये भरलेलं वांगं, शेंगा चटणी, खोबऱ्याची चटणी, गुळाचा खडा आणि गोवऱ्यांच्या निखाऱ्यावरून काढलेलं कणीस चोळून तळहातावर राख फुकत हातात पडलेला हुरडा याची चव काही खासच असते. शहरी भागातील लोक अस्सल हुरडा खाण्यासाठी खास ग्रामीण भागाकडे येतात.


उत्तम खाणंपिणं यासोबत काय जमतं? संगत, स्नेही, मित्रमैत्रिणी, कुटुंब, थोडक्यात माणसं. अशी कंपनी असली की रोजचं साधं जेवण पण रुचकर लागतं. जेवणच जरा हटके असेल तर मग सगळा माहोल मस्त रंगतदार होऊन जातो. हुरडय़ासाठी जी ज्वारी वापरली जाते त्याला सुरती किंवा कुचकुची 'हुरडा' म्हणतात. 


ज्वारीच्या हुरड्याप्रमाणे याच काळात गव्हाच्या ओंब्या भाजून ‘हुळा’ खाण्याचा तसेच ज्याला मराठवाड्यात ‘टहाळ’ म्हणतात तो हरभरा भाजून खाण्याचा आनंदही खूप वेगळाच.


पिझ्झा बर्गर खाणाऱ्या आजच्या मंडळींना या रानमेव्याचा चविष्ट स्वाद आवर्जून चाखता यावा म्हणून अलिकडच्या काळात या कौटुंबिक हुरडा कार्यक्रमास व्यावसायिक रुपदेखील आलं आहे. अनेक शेतकरी आता आपल्या शेतात ‘हुरडा पार्ट्या’ आयोजित करताना दिसू लागले आहेत. ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे ज्वारीची कणसं विकायची, ती भाजायची आणि सोबतच्या चटण्यांच्या प्रकारासह हुरडा खाण्याचा आनंद खवय्यांना उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम आता एक छान व्यवसायही होऊ लागला आहे. 


ज्वारीचं आहारातील महत्त्व.


ज्वारी तिच्या बाहेरील आवरणासह खाल्ली जाते. ज्वारीमध्ये खूप जास्त तंतूमय पदार्थ असतात. त्यामुळे कोठा साफ राहतो. पोट भरल्यासारखं वाटून भूक कमी लागते आणि आपोआप आहारावर नियंत्रण येतं. याचा वजनावर सकारात्मक परिणाम दिसू लागतो. तंतूमय पदार्थ जास्त असल्यानं कोलेस्टेरोल कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे. 


ज्वारीत मोठ्या प्रमाणावर लोह असतं. हुरड्यावर लिंबू पिळलं की, लिंबातील 'क' जीवनसत्त्वामुळे लोह सहजपणे शरीरात शोषलं जातं. ज्वारीत कर्बोदके जास्त असल्यामुळे ती शक्तिवर्धक असते. ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याची क्षमता जास्त असते. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांना ज्वारी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. 


ज्वारीत मॅग्नेशियम, कॉपर आणि नायसिनदेखील असतं. शिवाय, 'ब' गटातील जीवनसत्त्वंही असतात. ही सर्व पोषक तत्त्वं आणि लोह मिळून शरीराचं चयापचय सुधारण्याचं काम करतात. गव्हाप्रमाणे ज्वारीत ग्लुटेन नसतं. यात अँटी ऑक्सिडंट्स असल्याने त्याचा उपयोग हृदयविकार आणि कर्करोग होऊ नये म्हणूनही करता येतो. 

 

बातम्या आणखी आहेत...