आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत फटाके उडवताना काळजी घ्या, लहान मुलांकडे बारकाईने लक्ष द्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक -   दिवाळीत फटके उडवताना लहान मुलांना इजा होणार नाही, दिवाळी दुर्घटनामुक्त व्हावी, यासाठी सेफ किड्स फाउंडेशन इंडियाच्या वतीने (एसकेएफआय) पुढाकार घेऊन फटाक्यांच्या वापराबाबत जनजागृती सुरू केली आहे. त्यासाठी सध्या पुणे अाणि पिंपरी चिंचवडमधील शाळा, महाविद्यालये, वसाहतींत या संस्थेतर्फे अग्निसुरक्षेबाबत माहिती दिली जात असून लवकरच नाशिकमधेही हा उपक्रम सुरू करण्यात येणार अाहे. दिवाळीत फटाक्यांच्या अागीमुळे अपघात होण्याचा धोका जास्त असतो. या अागीत भाजून जखम झाल्यास काेणते प्रतिबंधात्मक उपाय याेजावेत याबाबत सेफ किड्स या संस्थेचे स्वयंसेवक मुलांना आणि त्यांच्या पालकांना महत्त्व पटवून देण्याचे काम ही संस्था मागील तीन वर्षांपासून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात करत अाहे.  या कार्यक्रमांतर्गत आग लागल्यास काय करावे व भाजण्यास प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजना तसेच आगीच्या अपघातावेळी सुरक्षितता याबाबत शाळा, महाविद्यालयांप्रमाणेच वस्त्या व सोसायट्यांमध्ये जनजागृती उपक्रम राबवले जातात.

 

शहरांमध्ये रॅली, रोड शो, प्रदर्शने, वॉकेथॉन, किड्स कार्निव्हल, पोस्टर मेकिंग स्पर्धा यांसारखे उपक्रमही राबवले जातात.  मागील तीन वर्षांत या संस्थेमार्फत १,०९४ शाळांमधून ४,५५,००० विद्यार्थी व २४४ वस्त्यांमधून ३,७५,००० पालकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यात आली आहे.  अधिक माहितीसाठी ८६६९९०१५०४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अावाहन संस्थेतर्फे करण्यात अाले.  

 

संपूर्ण राज्यभर उपक्रम राबवण्याचा आमचा मानस  
सुरक्षित अाणि अानंदी दिवाळी साजरी करण्यासाठी अामचे प्रयत्न अाहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर काम करण्याचा अामचा मनाेदय असून पहिल्या टप्प्यात पुणे अाणि पिंपरी चिंचवडमध्ये यशस्वी उपक्रम राबवण्यात अाले अाहेत. यंदा नाशिकमध्ये उपक्रम राबवण्यात येतील. 
मिलिंद गुडदे, सेफ किड्स फाउंडेशन

 

फटाके वाजवताना अशी घ्यावी काळजी  
- माेठ्या व्यक्तींच्या देखरेखीखाली अाणि घरापासून दूर माेकळ्या जागेत फटाके उडवावेत   
- पहिल्या वेळेला न पेटलेला फटाका पुन्हा पेटवणे सुरक्षेच्या दृष्टीने याेग्य नाही  
- फटाके सुरक्षित अंतरावर पेटवा. हातामध्ये फटाका पेटवणे धाेक्याचे   
- फटाके उडवताना चटकन पेट घेणार नाहीत असे घट्ट सुती कपडे घालावेत   
- फटाके उडवताना जवळच पाण्याची किंवा वाळूची बादली भरून ठेवावी.    

 

माेठ्या लाेकांसाठी सूचना  
- तेलाचे दिवे मुलांचे हात पाेहोचू नये अशा आणि लाकडी सामान, पडदे व इतर ज्वलनशील वस्तू असणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावेत   
- झाेपायच्या अाधी दिवे विझवण्याचे लक्षात ठेवा   
- नेहमी मेणबत्ती स्टँडचा वापर करा. मेणबत्ती बाटलीवर किंवा पुस्तकावर ठेवू नका.  

बातम्या आणखी आहेत...