• Home
  • National
  • Beat the BJP in the elections; Opposition's Elgar in a Delhi rally

निवडणुकीत भाजपला पराभूत / निवडणुकीत भाजपला पराभूत करा; दिल्लीतील सभेत विरोधकांचा एल्गार 

Feb 14,2019 10:22:00 AM IST

नवी दिल्ली- भाजपमुळे लोकशाहीला धोका असून आगामी लोकसभा निवडणुकीत या पक्षाला पराभूत करायलाच हवे, असे आवाहन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी केले. आम आदमी पक्षातर्फे (आप) आयोजित या सभेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. ममता बॅनर्जी यांनी १९ जानेवारीला विरोधकांची एकजूट दर्शवण्यासाठी कोलकाता येथे जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर तीन आठवड्यांनी विरोधकांनी आपच्या या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकजुटीचे दर्शन घडवले.

जंतरमंतर येथे झालेल्या या सभेत भाकपचे नेते डी. राजा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्यघटना धोक्यात आली आहे. संसदेचे महत्त्व कमी केले जात आहे. जर्मनीत हिटलरने संसदेच्या अधिकारांवर अतिक्रमण केले होते. आपल्याला तशीच परिस्थिती येथे येऊ द्यायची आहे का? भाजपचे सत्तेत राहणे हे राज्यघटना आणि लोकशाही यांना धोका आहे. त्यामुळे त्या पक्षाचा पराभव करणे गरजेचे आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर घटनात्मक मूल्यांवर हल्ले झाले आहेत. जेव्हा फॅसिस्ट शक्ती सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या सर्वात आधी लोकशाही संस्था नष्ट करतात. भावा-भावांमध्ये भांडणे करून भाजप 'दु:शासनाच्या' राजकारणाला बळ देत आहे, असा आरोप माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी केला. ते म्हणाले, 'समर्थ भारत बनवायचा असेल तर मोदी सरकार हटवण्याची गरज आहे. देशाला वाचवायचे असेल तर चौकीदार बदलणे गरजेचे आहे. भाजप हा कौरव सेनेसारखा आहे, पण पांडव (विरोेधी पक्ष) त्या पक्षाला हरवतील आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही.

ममता बॅनर्जी यांच्या आगमनापूर्वी डाव्या पक्षांच्या नेत्यांनी काढला पाय
ममता सभास्थळी येण्याआधीच डाव्या पक्षांच्या नेत्यांचा काढता पाय तृणमूल काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. डाव्यांचा पराभव करूनच ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या आहेत. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी बोलावलेल्या या सभेला या पक्षांचे नेते हजर होते. पण ममता बॅनर्जी यांचे सभास्थळी आगमन होण्याआधीच माकपचे सीताराम येचुरी आणि भाकपचे डी. राजा यांनी तेथून काढता पाय घेतला.

शरद पवार यांच्या घरी बैठक
आपच्या महासभेनंतर विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते बुधवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी जमले होते. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू,नॅकाँचे प्रमुख फारूक अब्दुल्ला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हजर होते. बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले की, बैठक चांगली झाली. भाजपविरोधात लढा देण्यावर आमची सहमती झाली.

X