आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाग आल्याने चोरी टळली...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोर आला होता, पण वेळ आली नव्हती, असे म्हणतात ते उगीच नाही. याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला. आपण वृत्तपत्रात, टीव्हीवर चोर पाहतो, चोरीच्या बातम्या पाहतो पण जोपर्यंत स्वत:वर वेळ येत नाही तोवर कळत नाही, असे जे म्हणतात ते काही उगीच नाही. आमचे चार खोल्यांचे राहते घर होते. घराच्या मागच्या बाजूला टॉयलेट आहे. एरवी मला रात्री-अपरात्री कधीही जाग येत नाही, पण त्या रात्री माझी वेळ चांगली असावी. मला त्या रात्री अचानक जाग आली. घराच्या मागच्या बाजूला रस्ता आहे आणि रस्त्यावर ट्यूब लाइट आहे. रात्री दीड ते दोन दरम्यान एका व्यक्तीची सावली भिंतीवर पडलेली मला दिसली. मी सावध झालो. अंगणातील कुदळ हातात घेऊन एक चोर मागच्या अंगणात उतरला होता. दुसरा चोर भिंतीवर उभा होता.

आमच्या घराचे मागील दार तोडून घरात घुसण्याचा त्या दोघांचा बेत असावा. भीतीमुळे मला धड ओरडताही येइना. तरीही काप-या आवाजात चोर, चोर असे ओरडत मी घरातील सगळे लाइट लावले आणि आमच्या शेजारच्या लोकानाही उठवले. तेही लगेच माझ्या मदतीला पळत आले. घरचे व शेजारचे लोक जागे झालेले पाहून चोर पळून गेले. दुस-या दिवशीचे पेपर सकाळी पाहतो तर काय? आमच्या घराच्या आसपास तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे वृत्त मी वाचले आणि आमच्या घरावर आलेल्या, पण टळलेल्या संकटाची जाणीव मला झाली. जाग आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. अशा रात्रीच्या वेळी मदतीलाही कोणी धावून आले असते की नाही, याची कल्पनाही करवत नाही. आमची श्री स्वामी समर्थावर श्रद्धा आहे. त्यांच्या कृपेने चोरीचे मोठे संकट टळले असेच आम्हाला वाटते. चोरांना पाहण्यासाठी मी नंतर पोलिस स्टेशनला गेलो असता चोराने वापरलेली कुदळ मला तेथे दिसली. त्या चोरांनी हातात कुदळ असतानाही काही शारीरिक इजा केली नाही, हे सुदैवच म्हणायचे. तोपर्यंत पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला होता.