आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हर डाऊनच्या नावाखाली लूट; मंडलातील ७/१२ नोंदी रखडल्याने नागरिकांचा संपात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सोलापूर- गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सातबारा नोंदी प्रलंबित आहेत. त्यात शहर मंडल कार्यालयातील आकडा मोठा आहे. यामुळे मिळकतदारांना सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत असून, सर्व्हर डाऊनच्या नावाखाली महसूल कर्मचारी लोकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. त्याचबरोबर शासनाच्या लोकोपयोगी अशा ऑनलाइन सेवेबद्दल नागरिकांत रोष निर्माण करत आहेत. 

 

शासनाने महसूल सेवेतील अनागोंदी, भ्रष्टाचार कमी व्हावा, मिळकतदारांना जलद सेवा मिळावी या करिता संगणकीय प्रणालीचा वापर वाढवला आहे. शासनाने सर्व सातबारा उतारे ऑनलाइन प्रणालीवर घेतले आहेत, जुनी तलाठ्याकडून हस्तलिखित सातबारा पद्धत बंद केली आहे. एखादी मिळकतीची खरेदी-विक्री झाल्यानंतर तिचा नवा फेरफार व सातबारा ऑनलाइन प्रणालीमार्फतच व्हावा अशी प्रणाली कार्यरत आहे. यामुळे एखादी मिळकत खरेदी केल्यावर संबांधित तलाठ्याची भेट घेत दस्ताचे छायांकित संच व 'नजराणा' देऊन नोंद करण्याची पद्धत बंद होईल, अशी भाबडी अशा नागरिकांत निर्माण झाली होती. 

 

सुरुवातीला तलाठी वर्गातही यामुळे अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र हार मानतील ते महसूल कर्मचारी कसले? गेल्या वर्षभरात या ना त्या कारणाने सातबाऱ्यावरील नोंदी प्रलंबित ठेवल्या जात आहेत . या मध्ये तांत्रिक दोषापेक्षा मानवी दोषच कारणीभूत असल्याचे दिसत आहे. मिळकतदारांनी अपल्यापर्यंत यावे या साठीच हा सारा प्रकार चालू आहेत. तांत्रिक बदलामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना किती नोंदी प्रलंबित आहेत याची आकडेवारी पाहता येत नाही. यासाठी त्यांना तलाठी-मंडल अधिकाऱ्यांच्या माहितीवरच अवलंबून राहावे लागते. तलाठी - मंडल अधिकारी देत असलेल्या आकडेवारीची तपासणी केल्यास सत्य माहिती बाहेर येईल. राजकारण्यांची कामे चुटकीशीर कालावधीत होत असल्याने प्रशासनाला दुखावण्यात त्यांना रस नाही. यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना सर्वसामान्यांना लुटण्याचे परमिट मिळलेकी काय अशी परिस्थिती आहे. चालू वर्षात लाचखोरीच्या प्रकरणावरून हे स्पष्ट दिसत आहे. या प्रकाराबाबत आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करणे आवश्यक आहे. नाही तर नोंदीतील भ्रष्टाचाराचा अमरवेल असाच फुलतच राहील. 

 

करमाळ्यात जास्त, मंगळवेढ्यात कमी नोंदी 
सध्या जिल्ह्यात साडेचार हजार नोंदी कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत. करमाळ्यात सर्वात जास्त तर मंगळवेढ्यात सर्वात कमी नोंदी प्रलंबित आहेत. सोलापूर शहर मंडलात ६५० पेक्षा जास्त नोंदी प्रमाणीकरणासाठी वाट पाहत आहेत. नोंदी प्रलंबित राहण्यामागे तलाठी-मंडल अधिकाऱ्याबरोबर खरेदी-विक्री विभागातील डाटा ऑपरेटरचा गलथान कारभार कारणीभूत आहे. खरेदी -विक्री दस्ताची ऑनलाइन माहिती भरताना त्रुटी ठेवतात याचा फटका प्रामाणिक तलाठ्यालाही बसतो. अर्धवट असलेला दस्त प्रमाणित होत नाही. ऑनलाइन सेवेबाबत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रेटा आहे. मात्र दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने निम्न स्तरावर अधिकाऱ्यांचा धाक नाही. 

 

प्रलंबित नोंदींचा अहवाल मागवतो
नोंदी घेण्यास टाळाटाळ होत असेल तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल. किती नोंदी प्रलंबित आहेत याचा अहवाल मागवतो. विनोद रणवरे, तहसीलदार, उत्तर सोलापूर 

 

दिरंगाई केल्यास कारवाई
जाणीवपूर्वक कोणी नोंदी घेण्याबाबत टाळाटाळ करत असेल, दिरंगाई करत असेल तर अशा कर्मचाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल, अडवणूक होत असल्यास माझ्याकडे तक्रार द्या."  संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर  

 

जनतेसाठी प्रणाली 
जनतेच्या सेवेसाठी ही प्रणाली राबवली जाते. यावर स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. प्रणालीमधील त्रुटी काढण्यास आम्ही तत्पर आहोत." रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, राज्य समनव्यक, माहिती व्यवस्थापन प्रणाली 

बातम्या आणखी आहेत...