आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटामुळे भूमिका मिळाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इ.स. 1957 मधील गोष्ट आहे. मी आमच्या गावी म्हणजे पिंपळनेर (गणपतीचे) येथे होतो. पाचवी इयत्तेत असताना नव्यानेच नियुक्त झालेले मुख्याध्यापक दे. पु. भानप आमच्या शाळेस लाभलेले ते पहिले पदवीधर. त्यांचीही पहिलीच नेमणूक असल्याने शाळेत साहजिकच उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. त्यांचा मराठीचा तास संपूच नये, असे वाटायचे. त्यांनी त्या वेळी शिकवलेली गदिमांची ‘बनगरवाडी’ आजही आठवते. त्या वेळचे त्यांचे सहकारी मो.ना.थिगळे, म.गु. जाधव, ल.रे.पुराणिक, कमलाकरराव हुंडेकर आदींनी आपापल्या ज्ञानदानाच्या कार्यात वाहून घेतलेले होते. सांस्कृतिक कार्यक्रमातही गुरूंचा तन-मन-धनाने सहभाग असायचा. मला त्या नाटकाचे नाव आठवत नाही, पण मितभाषी स्वभाव असल्याने त्या नाटकात माझा सहभाग नव्हता. नाटकाची तयारी पूर्ण झाली होती. रंगभूषा-वेशभूषेचे साहित्य जमा झाले होते. मात्र, त्यात एक लहान कोट कमी पडला. मला असा कोट वडिलांच्या मित्रांनी शिवून दिलेला होता. मी तो कोट आणून दिला, तसे गुरुजींनी ‘आता तर तुला नाटकात काम करावेच लागेल ’ अशी तंबीच दिली. मुख्य म्हणजे त्यात संवाद फारसे नव्हते.

खुर्चीवर बसून ऐकत राहणे आणि मधूनच दोन-तीन वेळा ऑर्डर-ऑर्डर म्हणणे, टेबलावर लाकडी हातोडा आपटणे इतकेच काम होते. शेवटी पाच ते दहा ओळींचा निकाल वाचून दाखवायचा होता. तो मी व्यवस्थित वाचून दाखवला व कशीबशी न्यायाधीशाची भूमिका पार पाडली. विद्यार्थिदशेत असताना न्यायाधीशाची भूमिका करण्यास मिळाली. नाटक छान पार पडले. माझ्या त्या भूमिकेचेही शाळेत सर्वत्र कौतुक झाले. प्रत्यक्ष जीवनातही तसेच असते. माणसाला वेगवेगळ्या भूमिकांत वावरावे लागते. त्या नीट पारही पाडाव्या लागतात. एखादी साधी भूमिकाही अवघड बनते, पण ईश्वरकृपेनेती पार पडते.