आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड बायपास होणार सहापदरी; गडकरींची सूचना केंद्राकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम असा १४ किलोमीटरचा बीड बायपास सहापदरी करून देतो. फक्त हा रस्ता राज्य शासनाकडून केंद्राकडे हस्तांतरित करण्याची तांत्रिक बाब पूर्ण करा, अशा सूचना केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सावर्जनिक बांधकाम विभागाला केल्या. रविवारी विभागीय आयुक्तालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. 

 

गत वर्षभरात बीड बायपासवर अनेक अपघात झाले आहेत. ट्रक, चारचाकींच्या धडकेने ११ जणांनी जीव गमावला असून किमान ४० नागरिक जायबंदी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी केलेली ही सूचना औरंगाबादकरांना विशेषत: सातारा-देवळाईवासीयांना दिलासा देणारी ठरणार आहे. बीड बायपास राज्य शासनाच्या अखत्यारीत येतो. बीओटी तत्त्वावरील हा रस्ता संबंधित कंत्राटदाराचे पैसे देऊन केंद्र शासनाकडे सोपवा, असे स्पष्ट निर्देश गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिले. या रस्त्यावरील वाहनांची वारंवारिता मोजून सविस्तर माहिती पाठवा, असेही त्यांनी सांगितले. विविध कामांचा आढावा घेत त्यांनी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
 
मंत्री गडकरी शहरात, पण महापौरांना थांगपत्ताच नाही 
भूसंपादन, अतिक्रणाचा घेतला आढावा :

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत गडकरी यांनी विविध रस्ते, विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी व मराठवाड्यातील महसूल, रस्ते व इतर विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गडकरी यांनी मराठवाड्यासह राज्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांबाबत आढावा घेताना भूसंपादन, उर्वरित राहिलेली कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. चंद्रशेखर यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येत असलेल्या विकासकामांची स्थिती व कार्यवाहीबाबत या वेळी माहिती दिली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ यांनीही रस्त्यांच्या कामांच्या स्थितीबाबत माहिती दिली. बैठक आटोपून गडकरी उद्योजक मुकुंद भोगले यांच्या कन्येच्या विवाहाच्या स्वागत समारंभासाठी हॉटेल रामा येथे आले. त्याठिकाणी गडकरी यांना भेटण्यासाठी उद्योजकांसह, भाजप पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली. 

 

पत्रकारांशी बोलणे टाळले 
गडकरी यांनी विभागीय आयुक्तालयात रस्ते विकास कामांचा आढावा घेतला तेव्हा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र बैठकीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. मी काय बोललो हे आमदार सावे व खासदार खैरे सांगतील. एवढेच बोलून ते विभागीय आयुक्तालयातून निघून गेले. 

 

औट्रम घाटातील बोगद्याची फाइल दिल्लीत मागवली 
जुना पैठण रोड तसाच ठेवून ग्रीन फील्डमधून तयार होणाऱ्या रस्त्याचाही आढावा त्यांनी घेतला. त्या रस्त्याचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांना दिल्या. औट्रम घाटातून जाणाऱ्या १४ किमीच्या (दोन्ही बाजू धरून) बोगद्याची फाइलही त्यांनी दिल्लीत मागवली. या बोगद्याचा डीपीआर ५ हजार कोटींचा असून त्याची निविदा लवकरच निघेल, असेही त्यांनी सांगितले. जालना रोडची १०४ कोटींची निविदा मंजूर झाली असून आधी डांबरीकरण होईल, पुढे जमले तर उड्डाणपुलाचे बघू, असे आश्वासन दिले. 

बातम्या आणखी आहेत...