आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांसमोर वाद घालून चक्क लखपती होण्याची संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - पोलिस आणि वाद हे समीकरणच! वाद अन् तेही पोलिसांसमोर घातल्यावर शिक्षा मिळणारच परंतु, आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांसमोर वाद घालून चक्क लखपती होण्याची संधी मिळणार आहे. दचकण्याची आवश्यकता नाही पोलिसांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यस्तरावर विजेता ठरणाऱ्या विद्यार्थ्याला १ लाख रुपयांचे पारितोषिक राज्य पोलिस दलाच्या वतीने देण्यात येणार आहे. पोलिस विभागाच्या वतीने यंदा ११ वी, १२ वी या वर्गातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उपविभाग, जिल्हा, परिक्षेत्र आणि राज्यस्तरावर ही स्पर्धा होणार असून प्रत्येक टप्प्यात विद्यार्थ्याला पारितोषिक मिळणार आहेच शिवाय, राज्यस्तरावर विजेत्याला एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. सध्या पोलिस दलाकडून याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांसाठी महिला अत्याचाराबाबत विषय देण्यात येणार असून प्रत्येक उपविभागातून विषयाच्या अनुकूल आणि प्रतिकूल बाजू मांडण्यासाठी दोन संघ जिल्हास्तरावर बोलावण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पोलिस दलाचे बीड, केज , माजलगाव, अंबाजोगाई, आष्टी, गेवराई असे सहा उपविभाग आहेत. या प्रत्येक उपविभागातून दोन या प्रमाणे १२ संघांना जिल्हास्तरावर निमंत्रित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विजेता संघ परिक्षेत्रीय स्पर्धांसाठी पात्र ठरणार अाहे. औरंगाबाद परिक्षेत्रातील जिल्ह्यांमधून आलेल्या संघांमध्ये औरंगाबादेत अथवा परिक्षेत्रीय कार्यालय ठरवेल त्या ठिकाणी या स्पर्धा होतील. याचे विजेते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील. राज्यातील सर्व परिक्षेत्रांमधील विजेत्यांची राज्यस्तरीय स्पर्धा होईल. या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना वेेगवेगळे विषय दिले जाणार आहेत. विजेता होणार ‘लखपती’
 
जिल्हा, परिक्षेत्र या टप्प्यावर विविध प्रकारची पारितोषिके विजेत्या संघाला दिली जाणार आहेत.  राज्यस्तरावर विजेत्या विद्यार्थ्याला तब्बल १ लाख रुपयांचे पारितोषिक तर द्वितीय  विजेत्यास ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. साधरणत: पोलिसांसमोर वाद महागात पडतो पण हा वाद मात्र विद्यार्थ्यांना फायद्यात पडणार आहे.लवकरच आयोजन 
 
दरम्यान, बीड पोलिस दलाच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी या स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत सध्या हालचाली सुरू आहेत. अद्याप स्पर्धेच्या नियोजन पूर्ण झाले नसले तरी लवकरच या स्पर्धा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...