आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्याला मिळणार आठवा आमदार; काँग्रेसचे दौंड उमेदवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेवर काँग्रेसचा उमेदवार
  • धनंजय मुंडे यांना विजयी करण्याचे बक्षीस

दिनेश लिंबेकर  बीड - राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु किंवा मित्र नसतो असे म्हटले जाते. बीड जिल्ह्यातही अशीच उदाहरणे पहावयास मिळत आहेत.  परळीच्या राजकारणात मागील ३५ वर्षांपासून दौंड आणी मुंडे कुटुंबात राजकीय शत्रुत्व कायम होते. परंतु परळी विधानसभा निवडणुकीत दौंड पिता-पुत्रांनी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात कुठलेही बंड न करता धनंजय मुंडे यांचा प्रचार करत विजयश्री खेचून आणला. निवडणुकीपूर्वी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय दौंड यांना दिलेला आमदारकीचा दिलेला शब्द पाळला आहे.  विधान परिषदेच्या पोट  निवडणुकीसाठी संजय दौंड यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जागा सोडली असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या रूपाने बीड जिल्ह्याला आठवा आमदार मिळत आहे .  पूर्वीच्या रेणापूर मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव दौंड यांनी १९८५ मध्ये दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा २६०० मतांनी पराभव केला होता.  आमदार दौंड  तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रीमंडळात  ग्रामविकास मंत्री झाले होते. त्यानंतरच्या १९९० विधानसभा  निवडणुकीत मात्र पक्षातील लोकांनीच काम न केल्याने पंडितराव दौंड यांना पराभवाला सामोरे जावे  लागले होते. परंतु आमदार व मंत्रिपदाच्या काळात पंडितराव दौंड यांनी राजीव गांधी यांच्यासह सोनिया गांधी, मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शरद पवार, शिवराज पाटील चाकुरकर, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, माजी खासदार रजनीताई पाटील यांच्याबरोबर सलोख्याचे संबध राहिलेले आहेत. परळी आणि अंबाजोगाई या दोन तालुक्यांसह रेणापूर मतदार संघातील राजकारणावर  दौंड यांचा आजही प्रभाव आहे. वडिलांच्या पराभवानंतर पुढे पुत्र संजय दौंड हे बीड जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले. १९९२ मध्ये अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर, १९९७ मध्ये धर्मापुरी गटातून, पट्टीवडगाव जिल्हा परिषद गटातून धनंजय मुंडे यांनी संजय दौंड यांचा दोन वेळा पराभव केला तर एक वेळा संजय दौंड यांनी पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांचा पराभव  केला आहे. २०१९ च्या परळी विधानसभा निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडेंविरुद्ध विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे असे लढतीचे चित्र होते. परंतु काँग्रेसचे नेते संजय दौंड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंड करण्याची शक्यता होती. अपक्ष किंवा वंचित आघाडीकडून लढण्याची त्यांची तयारी हाेती.  ही बंडाची परिस्थिती शरद पवार यांना कळताच त्यांनी दौंड पिता- पुत्रांना भेटण्यास बोलवत परळीत धनंजय मुंडे यांच्या पाठीशी रहा त्यांना विजयी करा मी तुम्हाला विधान परिषदेचा आमदार करतो, असा शब्द दिला. पवार साहेबांच्या शब्दाखातर दौंड पिता पुत्रांनी मुंडे यांच्या विजयासाठी जिवाचे रान करून विजयश्री खेचून आणला. मुंडे हे विजयी होऊन सामाजीक न्याय मंत्री झाले. दरम्यान शरद पवार यांनीही दिलेला शब्द पाळला. बीड जिल्ह्याला आठवा आमदार तर  धनंजय मुंडे यांना नवा सहकारी मिळणार आहे. बीड जिल्हा परिषदेत संजय दौंड यांच्या पत्नी आशाताई दौंड या २००२ ते २००७ दरम्यान धर्मापुरी गणात पंचायत समिती गणाच्या सदस्या होत्या. तर २००७ ते २०१२  पट्टीवडगाव गटात जि. प. सदस्य राहिलेल्या असून २०१२ ते २०१७ या काळात अडीच वर्षे आशाताई दौंड या जि.प. उपाध्यक्षा राहिल्या. 

बीड जिल्ह्याला मिळणार आठवा आमदार 
बीड जिल्ह्यात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (परळी)  यांच्यासह संदीप क्षीरसागर- बीड, बाळासाहेब आजबे -आष्टी, प्रकाश साेळंके  -माजलगाव , असे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर  भाजपचे लक्ष्मण पवार - गेवराई, नमिता मुंदडा - केज  हे सहा विधानसभेचे आमदार आहेत. तर  शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे हे सातवे आमदार आहेत. आता विधान परिषदेचे संजय दौंड हे  बीड जिल्ह्यातील आठवे आमदार ठरणार आहेत.संजय दौंड यांच्या विजयाचा मार्ग सोपा 

धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेवर संजय दौंड यांचे नाव खुद्द शरद पवार यांनी पुढे केले आहे. भाजपकडून राजन तेलींना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली जागा काँग्रेसचे संजय दौंड यांच्यासाठी सोडली असून प्रथमच राष्ट्रवादीच्या जागी काँग्रेसच्या नेत्यास विधान परिषदेत पाठवले जात आहे. या निवडणुकीसाठी विधानसभेचे एकूण २८८ आमदार मतदान करणार असून सध्या भाजपकडे सुमारे १२० तर महाविकास आघाडीकडे १७० आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे दौंड यांचा विजय निश्चित मानला जात अाहे. किंबहुना ही निवडणूकच बिनविरोध होण्याची शक्यता आहे.  १५ जानेवारी रोजी छाननी, १७ रोजी अर्ज मागे घेणे व २४  रोजी मतदान  होणार आहे.  माजी मंत्री पंडितराव दौंड यांच्या कुटुंबात या निमित्ताने तब्बल ३० वर्षांनी आमदारकी येणार आहे.