आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीआय मानांकन मिळूनही बीडमध्ये सीताफळासाठी एक्स्पोर्ट झोन नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फळे होतात खराब, दर मिळेना; बेभाव विक्रीची शेतकऱ्यांवर वेळ
  • स्थानिक पुढाऱ्यांनी द्यावे बळ तीन वर्षांपासून कोणत्याच हालचाली नाही

​​​​​​​दिनेश लिंबेकर

बीड : बीड जिल्ह्यात सीताफळाचे आगार म्हणून धारूरचा बालाघाट प्रसिद्ध आहे. येथे नैसर्गिकरीत्या येणाऱ्या बालानगर जातीच्या अतिशय गोड व मधुर सीताफळाला तीन वर्षांपूर्वी केंद्रातर्फे भौगोलिक निर्देशन म्हणजे जीआय मानांकन मिळाले होते. यामुळे या सीताफळांचे भविष्य आता बदलेल असे वाटत होते. परंतु मागील तीन वर्षांत बीड जिल्ह्यात साधा एक्स्पोर्ट झोनसुद्धा तयार होऊ शकला नाही. परिणामी, अवीट गोडीची येथील सीताफळे परराज्यात पोहोचत नसून चांगली प्रतवारी मिळेनासे झाली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांवर बाजारात सीताफळांची बेभाव विक्री करण्याची वेळ आली आहे.
बीड जिल्ह्यात सीताफळाला पोषक असे हवामान आहे. मुख्यत: बीड जिल्ह्यात सीताफळाची 'बालानगरी' जात आढळते. या फळाला जिल्ह्यातील कमी पर्जन्यमान अनुकूल आहे. याला पाणी माफक प्रमाणात लागत असल्याने ते बीडमध्ये पाहिजे तेवढे मिळते. त्यामुळे त्याची गोडी अधिक आहे. येथील फळ शंभर टक्के सेंद्रिय आहे. दरम्यान, सीताफळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत मोठी मागणी आहे. आइस्क्रीमपासून ते जामपर्यंत अनेक गोष्टीत सीताफळाचा वापर होतो. मात्र, हे फळ लवकर खराब होत असल्याने याला योग्य दर मिळत नाही. म्हणूनही एक्स्पोर्ट झोन तातडीने होणे गरजेचे असल्याचे मत शेतऱ्यांचे आहे.

जिल्ह्यात सीताफळाच्या तीन वाणांचे संशोधन

वाणाचे नाव : साखरेचे प्रमाण : घनद्रव्य पदार्थ

१) बालानगर : १९.३७ टक्के : २३.५२ टक्के
२) टी.पी-७ : १८.०७ टक्के : २१.१७ टक्के
३) धारूर-६ : २०.१२ टक्के : २४.४९ टक्के

यंदा एक लाख ६५ हजार रोपांची निर्मिती होणार

जिल्ह्यात अंबाजोगाईतील सीताफळ संशोधन केंद्राकडून १२ हजार हेक्टरांवर लागवड केलेली आहे. प्रत्येक वर्षी ५ टक्क्यांनी वाढ होते. या संशोधन केंद्रात सीताफळांच्या रोपाची निर्मिती करण्यात येत आहे. यंदा एक लाख ६५ हजार रोपांची निर्मिती केली जाणार आहे. मागील वर्षी ७५ हजार रोपांची निर्मिती केली.

जिल्ह्यात २०० हेक्टरांवर सीताफळांची लागवड

बीड जिल्ह्यातील धारूरसह परळी, अंबाजोगाई, आष्टी, तालुक्यामध्ये अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्राने जवळपास २०० हेक्टरांवर सीताफळांची लागवड केलेली आहे. सध्या शासनाकडूनही शेतकऱ्यांना सीताफळ लागवडीसाठी हेक्टराला एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.

जीआय नामांकन मिळाले पण...

कोल्हापूरच्या गुळाला जीआय मानांकनानंतर भाव वाढला. नाशिकच्या द्राक्षालाही जीआय मानांकनानंतर जागतिक बाजारपेठ खुली झाली. ३ वर्षांपूर्वी बीडच्या बालानगर सीताफळाला हेच मानांकन मिळाले. परंतु, परराज्यात जायला तयार नाही. कारण इथे एक्सपोर्ट झोनच तयार झाले नाही.

धारूरच्या सीताफळ वाणाची मोठी मागणी

बालानगर व टीपी -७ यापेक्षाही सरस वाण म्हणून धारूर-६ या सीताफळाचे वाण लोकप्रिय आहे. मुख्य कारण म्हणजे या सीताफळात साखरेचे प्रमाण २०.१२ % आहे. या गुण वैशिष्ट्यामुळे धारूरच्या वाणाची मागणी प्रक्रिया उद्योगाकडून आहे. जी. आर. मुंडे, प्रभारी अधिकारी, सीताफळ संशोधन केंद्र, अंबाजोगाई.