आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील ओरिएंटल विमा कंपनीसमोर बीडच्या शेतकऱ्यांचे मुक्काम आंदोलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या बीड जिल्ह्यातील सुमारे दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी पुण्यातील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर बुधवारी मुक्काम आंदोलन केले. त्रुटींची पूर्तता करण्यासाठी वारंवार कृषी विभागाच्या कार्यालयात हेलपाटे घातल्यानंतरही मंजूर विमा परतावा मिळत नाही. तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन तत्काळ विमा रक्कम अदा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. अन्यथा विमा कंपनीच्या कार्यालयासमोर मुक्काम करू,  असा इशारा देताच विमा कंपनीने शेतकऱ्यांचे कागदपत्रे हातात घेत विमा परतावा देण्याचे आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले. 
विमा मंजूर होऊनही केवळ कृषी विभाग व विमा कंपन्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे गेल्या वर्षभरापासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा जमा झाला नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने शेतकरी आंदोलनाचे नेतृृत्व केले. २०१८ च्या खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले. खरिपातील विहित मुदतीत पिकांचा विमा उतरवला. अर्जासोबत सर्व कागदपत्रांची रीतसर पूर्तता केली.  अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाल्यावर या शेतकऱ्यांचा विमा मंजूर झाला. मात्र, गेल्या वर्षभरापासून विमा परतावा रक्कम बँक खात्यावर जमा झाली नाही. वेळोवेळी विमा कंपनी व कृषी विभागाकडे पुन्हा कागदपत्रे जमा केली. मात्र, पीक विमा परताव्याची रक्कम जमा होत नसल्याने शेतकऱ्यांना मुंबई-पुणे रस्त्यावरील विमा कंपनीच्या कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन केले. अखेर शेतकऱ्यांनी सोबत आणलेली कागदपत्रे ताब्यात घेऊन विमा परतावा देण्याची कार्यवाही सुरू झाल्यावर मुक्काम आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व सुदाम शिंदे, मुरलीधर नागरगोजे, बाळासाहेब कडभाने,  मुक्तेश्वर कडभाने यांच्यासह इतरांनी केले. 

कृषी विभागाची अनास्था
त्रुटी दूर करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केली. तरी त्यांचे विम्याचे दावे मंजूर झाले नाहीत. यामुळे शेतकरी येथे आला आहे. शासनाचा कृषी विभाग काम करत नाही. खोल्या भरून शेतकऱ्यांचे कागदपत्रे बीड जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज पडून आहेत.   प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचे
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अजित अभ्यंकर यांनी सांगितले. 
 

शेतकऱ्यांना रक्कम देण्यास तयार
२०१८ साली राज्यातील सात जिल्ह्यांतील खरीप पीक विमा आमच्या कंपनीने उतरवला. २०० कोटी विमा हप्ता प्राप्त झाला. त्याच्या बदल्यात २ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना विमा परतावा दिला आहे. बीड जिल्ह्यातील पीक विमा योजनेच्या सांकेतिक स्थळावर भरण्यात आलेली चुकीची माहिती, सीएससी केंद्राच्या चुका आहेत. त्यामुळे सुमारे १ लाख शेतकऱ्यांना विमा परतावा देऊ शकलो नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बँकांना दिलेल्या रकमेपैकी  ४२ कोटी रुपये परत आले. बँकेकडून परत आलेली ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्ही तयार आहोत. -  पी. एस. मूर्ती (उपमहाप्रबंधक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.)
 
 

रक्कम मिळाली नाही
गेल्या वर्षी २ हेक्टरवर सोयाबीनचे नुकसान झाले. सातबारा, विमा पावती, आधार कार्ड, बँक पासबुक, दोनदा दिले. तिसऱ्यांदा कृषी अधिकाऱ्याकडे दिले. मात्र, विमा परतावा रक्कम मंजूर होऊनही आम्हाला मिळत नाही. 
 माणिक शंकरराव देशमुख, आंदोलक शेतकरी ( रा.परळी, जि. बीड)