आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्त्री जन्माचे स्वागत करणारा जिल्हा ही बीडची ओळख' : खासदार प्रीतम मुंडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरातांना पुरस्कार प्रदान करताना खा.प्रीतम मुंडे व मान्यवर. - Divya Marathi
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरातांना पुरस्कार प्रदान करताना खा.प्रीतम मुंडे व मान्यवर.
  • स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानच्या कीर्तन महाेत्सवात उपक्रम
  • डॉ. थोरातांचा सेवा गौरव पुरस्काराचे एक लाख दिले रुग्णसेवेसाठी

बीड : कधीकाळी मुलींना गर्भात मारणारा जिल्हा अशी बीडची ओळख होती, स्त्री भ्रूणहत्या, मुलींचा खालावलेला जन्मदर यामुळे बीडची प्रतिमा कलंकित झाली होती. परंतु, शासन, प्रशासन, सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून झालेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून स्त्री जन्मदर हजार मुलांमागे साडेनऊशे इतका झाला. त्यात खटोड प्रतिष्ठानकडून तीन वर्षांपासून करण्यात येत असलेल्या मुलींच्या सामुदायिक नामकरण सोहळ्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात असल्याने स्त्री भ्रूणहत्येचा कलंक पुसून स्त्री जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून बीडची आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख झाल्याचे प्रतिपादन खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनी केले.

येथील स्व. झुंबरलाल खटाेड प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. ५) सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीत जन्मलेल्या जिल्ह्यातील ८३६ मुलींचे एकत्रित नामकरण केले. या सोहळ्याची वंडर बुक आॅफ रेकॉर्ड‌्स व गोल्डन बुक ऑफ रेकाॅर्ड‌्समध्ये नोंद झाली. व्यासपीठावर 'वंडर बुक रेकॉर्ड'च्या हैदराबाद येथील समन्वयक डॉ. स्वर्ण श्री गुराम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. प्रतिभा थोरात, आसाराम खटोड, संपत मुनोत, पारस बोरा, योगेश बोरा, कमलबाई संचेती, राजेंद्र मस्के यांची उपस्थिती होती. मान्यवरांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सुशील खटोड, भरतबुवा रामदासी महाराज, शुभम खटोड, सुशील खटोड, प्रेमचंद गादिया यांच्या हस्ते तर खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचा अनिता खटोड, प्रज्ञा रामदासी, निर्मला खटोड, मधुबाला बोरा, उज्ज्वला मुनोत, दीपा कोटोचा, पल्लवी खटोड, नम्रता खटोड, श्रद्धा बोरा, कोमल मुनोत यांच्या हस्ते सत्कार केला. खा. मुंडे म्हणाल्या, ३०१ मुलींपासून आता ८३६ मुलींचे सामुदायिक नामकरण खटोड प्रतिष्ठानने करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

गोल्डन बुक व वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद : कीर्तन महोत्सवातील या सामूहिक नामकरण सोहळ्याची 'वंडर बुक ऑफ रेकॉर्ड' या लंडन स्थित आंतरराष्ट्रीय संस्थेसह गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने नोंद घेतली. 'वंडर बुक रेकॉर्ड'चे भारतातील हैदराबाद येथील समन्वयक डॉ. स्वर्ण श्री गुराम यांनी या नामकरण सोहळ्याचे निरीक्षण केले. आशिया खंडात असा उपक्रम राबवणाऱ्या स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानची यंदा तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय विक्रमात नोंद झाली. गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरातांना संत तरुणसागर सेवा गौरव पुरस्कार : कीर्तन महोत्सवात मुलींच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी खासदार प्रीतम मुंडेंच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचा संत तरुण सागरजी महाराज यांच्या नावाने 'सेवा गौरव' पुरस्कार देऊन सन्मान केला. शाल, सन्मानचिन्ह, १ लाख रुपये व स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दरम्यान, पुरस्काराची १ लाख रुपयांची ही रक्कम जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरिता समर्पित करत असल्याची घोषणा पुरस्कार स्वीकारल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केली.

मातांचा फेटे बाधून सत्कार, तर मुलींना दिली अनोखी भेट

मुलींच्या मातांना फेटा बांधून साडी-चोळीची भेट देत हळदी-कुंकू लावून सत्कार केला. तर मुलींना पाळणा, डेस, ड्रायफ्रूट, घुगऱ्या, खेळणी, टेडी भेट स्वरूपात दिली. हजारोंंच्या उपस्थितीत आपल्या मुलीचा अनोखा नामकरण सोहळा पार पडत असताना मुलींच्या आईच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. या सोहळ्यास मुलींचे कुटुंबीय व नातेवाइकही उपस्थित होते. अनघा संदीप काळे व गौरव पवार यांनी 'मेरे घर आयी एक नन्ही परी', 'मोगरा फुलला' 'छोटी सी नन्ही सी प्यारी सी आयी परी' हे आणि बारशाचे गीते सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
 

बातम्या आणखी आहेत...