आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्यादीआधीच गाडी हजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरातीमागून घोडे असा पोलिस खात्याबद्दलचा अनुभव आहे, पण मला पोलिसाबाबत वेगळाच अनुभव आला. जानेवारी 2006 मधील घटना आहे. पंचायत समिती कार्यालयात सर्व शिक्षा अभियानात नव्यानेच रुजू झालो असल्याने दररोज टाकळीहून मोटारसायकलवरून येत असे. एकदा पंचायत समिती ऑफिसच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत गाडी उभी करून ऑफिसच्या कामात होतो. साधारण दुपारी 12 च्या सुमारास काही कामामुळे बाहेर आलो असता, माझी मोटारसायकल जागेवर नव्हती. याबाबत इतरांना बोललो तर दुस-या कोणीतरी नजरचुकीने नेली असावी, अशी समजूत काढली. आम्ही पारनेरमधील हॉटेल, गॅरेज, सार्वजनिक ठिकाणी गाडीचा शोध घेतला, पण ती हाती लागली नाही. दुस-या दिवशी माझ्या एका नातेवाइकासह पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेलो. संबंधित पोलिसांस सर्व हकीगत सांगितली. त्यावर त्यांनी खिशातून चिठ्ठी काढून एक नंबर दाखवला. ते म्हणाले, हाच गाडीनंबर आहे का? आम्ही चाटच पडलो. काय होतंय आम्हाला कळेचना. मी म्हणालो, होय, नंबर तर माझ्याच गाडीचा आहे. लगेच तो म्हणाला, गाडी सुरक्षित आहे. काळजी करू नका. आम्हाला हा दुसरा धक्का होता. त्याने खुलासा केला, त्याचे असे झाले... तुमची गाडी आम्ही निघोज गावात पकडली. निघोज स्टँडवर दोन मुले पारनेरकडून मोटारसायकल घेऊन हर्षोन्मादात चालले होते.

बसस्टँडवर उभे असलेल्या पोलिसांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. त्यांनी शंका आल्याबरोबर शिटी वाजवून थांबण्याचा इशारा केला, पण पोलिसांना पाहून त्यांनी गाडीचा वेग वाढवला आणि पळून गेले. पोलिसांनी पाठलाग सुरू करताच गाडी तेथेच टाकून ते पळून गेले, परंतु त्यांना पकडलेच. त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी गाडी पोलिस स्टेशनला जमा करून खबर दिली. हा तर चमत्कारच झाला. तक्रार द्यायच्या आधीच पोलिसांनी गाडी पकडली होती. चित्रपटात शोभून दिसेल असा प्रसंग घडला.