Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Before the Lok Sabha elections result, the disadvantaged Bahujan Aghadi in Vidarbha Khindar

लोकसभा निकालापूर्वीच वंचित बहुजन आघाडीला विदर्भात खिंडार

प्रतिनिधी | Update - May 16, 2019, 09:41 AM IST

आंबेडकरांवर भाजप समर्थनाचे पखालेंचे आरोप

 • Before the Lok Sabha elections result, the disadvantaged Bahujan Aghadi in Vidarbha Khindar

  नागपूर - महाराष्ट्रात भाजपला निवडून आणण्याच्या वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या कारस्थानात आम्ही सहभागी नाही, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांच्यासह अनेक नेत्यांनी बुधवारी वंचित बहुजन आघाडी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आंबेडकर यांच्या अनाकलनीय राजकारणामुळे राज्यात वंचित आघाडीची एकही जागा येणार नसल्याचे पखाले यांनी या वेळी सांगितले.


  पखाले हे गेल्या तीस वर्षांपासून आंबेडकर यांचे निकटचे सहकारी मानले जातात. त्यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते म्हणून जबाबदारी होती. त्यांच्यासह पूर्व विदर्भातील अनेक नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आगामी काळात प्रत्येकच जिल्ह्यातून आघाडीच्या कार्यकर्त्यांची खदखद बाहेर येईल, असेही पखाले यांनी या वेळी सांगितले.


  प्रकाश आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही अनेक आंदोलने केली. मात्र, गेल्या वर्षभरापासूनचे त्यांचे राजकारण कोड्यात टाकणारे ठरत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोठी राजकीय शक्ती निर्माण करण्याचे स्वप्न कार्यकर्त्यांनी पाहिले. मात्र, आंबेडकर यांच्या राजकारणाची दिशा त्याउलट राहिली. आंबेडकरी जनतेची मते फक्त स्वत:च्या हितासाठी कुजवण्याचे कारस्थान गेल्या वर्षभरापासून ते पार पाडत होते. आता निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी आम्हाला नाइलाजाने त्यांची साथ सोडावी लागत असल्याचे पखाले यांनी या वेळी सांगितले.

  अकोल्यात आंबेडकर तिसऱ्या स्थानावर राहतील
  अकोला लोकसभा मतदारसंघात आंबेडकर पुन्हा तिसऱ्या स्थानावर राहतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले. वंचित बहुजन आघाडीशी युती केलेल्या एमआयएमने औरंगाबाद लोकसभेची जागा तेवढी जिंकण्याच्या बाण्याने लढवली, असेही पखाले म्हणाले. आंबेडकरी राजकारणाची राज्यातच नव्हे तर देशातील दिशा बदलवण्याची मोठी संधी स्वार्थापोटी गमावली गेली.

Trending