आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर मोठे संकट; राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजपच्या गळाला ?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकीकडे आघाडी करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत असतानाच अनेक आमदार भाजपच्या गळाला लागणार असल्याने आघाडीचे काय होणार, असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच नेते खासगीत एकमेकांना विचारू लागले आहेत. काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.


लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक आयारामांना पक्षात स्थान दिले आणि त्यामुळेच २०१४ एवढ्याच म्हणजेच ४१ लोकसभेच्या जागा युतीने जिंकल्या. सप्टेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होणार असल्याने आणि पुन्हा राज्यात युतीचे सरकार येईल, अशी आशा नव्हे खात्री असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि पदाधिकारी आमच्या संपर्कात असून तेसुद्धा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती भाजपच्या एका मंत्र्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. भाजपने लोकसभा निवडणुकीत चांगली मुसंडी मारून काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांतही आघाडी घेतलेली आहे. ही आघाडी पाहता भाजप २२५ च्या आसपास जागा जिंकेल, असा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत.


१५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्ता गेल्यापासून खूपच अडचण झालेली आहे. त्यातच राज्यात या वेळी काँग्रेसची पूर्ण वाताहत झाल्याने अनेक आमदार भाजपकडे जाण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचेही विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले अनेक आमदार भाजपच्या गळाला लागले असल्याची माहिती देऊन या मंत्र्याने सांगितले, या आमदारांना तिकीट द्यायचा विचार सुरू असून विधानसभेला आमची शिवसेनेबरोबर युती आहे. आम्ही घटक पक्षांना जागा देऊन उरलेल्या ५०-५० टक्के जागा वाटून घेणार आहोत, असेही मंत्र्यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. 
 

भाजप काही ठिकाणी आमदार बदलणार
जागावाटपाच्या वेळेला काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्यांना उमेदवारी देण्याबाबत विचार केला जाणार आहे. शिवसेना आणि भाजपच्या विद्यमान आमदारांनाच तिकिटे दिली जाणार असली तरी काही ठिकाणी आमदार बदलण्याचा विचार सुरू आहे. ज्या जागांवर आम्ही कमी पडलो, परंतु आमच्याकडे येणारा आमदार मोठ्या फरकाने निवडून आला त्याला उमेदवारी दिली जाईल. हे जागावाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र बसून करणार आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही आम्ही प्रचंड यश मिळवू आणि पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ करू, असेही या मंत्र्याने सांगितले.