आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशासाठी वाट्टेल ते!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशासाठी लोक काय करू शकतात यासंबंधात मला आलेले अनुभव सांगतो. साधारणत: चार-पाच महिन्यांपूर्वी सकाळी दहाच्या सुमारास क्रांती चौकाकडून गोपाल कल्चरल हॉलकडे पायी चाललो होतो. समोरून एक माणूस माझ्याजवळ आला. खप्पड चेहरा, अंगात मळके कपडे आणि साधारण 55 ते 60 वर्षे इतके वयोमान असावे. अगदी जुनी ओळख असल्यासारखा माझ्याशी बोलत होता. ‘क्या साब, पहचाने क्या, मैं अय्युब. तुम्हारी भाभी (म्हणजे त्याची बायको) बहोत बीमार है इसलिए उसे दवाखाने लाया. नाश्तापानी के लिए पैसे देख रहा था, तो आप मिले. तीस-चालीस रुपये की मदद करना. आपके पैसे मैं लौटा दूंगा.’ मी त्याला नाव, गाव, पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याची वेगळीच बडबड सुरू होती. मी अंदाज बांधला, हा बदनापूरचा असावा. कारण मला बदनापूर सोडून बरीच वर्षे झाली. मी त्याला ओळखू शकलो नसेन, पण त्याने मला ओळखले असेल, असे समजून मी त्याला वीस रुपये दिले. काही दिवसांनी मी त्याच भागातून सिटीबसमधून जात होतो, हाच माणूस कोणाला तरी असाच गंडवत असावा, असे दिसले. नंतर एकदा मी स्टेशन रोडवरील स्टेट बँक आॅफ हैदराबादजवळ दुचाकी सुरू करत होतो, एक मध्यमवयीन गृहस्थ भेटले. पांढरेशुभ्र धोतर, पांढरा शर्ट, अंगात काळा ढगळ कोट, डोक्यावर काळी टोपी आणि कपाळावर उभा टिळा. अशा वेशातील गृहस्थ मला म्हणाले, ‘परभणीला जाण्यासाठी रेल्वेस्टेशनवर गेलो, पण गर्दीत कोणीतरी माझे पाकीट मारले. सकाळपासून परेशान आहे. मला शंभर रुपये द्या. पुढच्या गाडीने परभणीला जाईन.’ त्यांच्या बोलण्यात अजिजी दिसली, पण अय्युबच्या घटनेनंतर मी सावध झालो होतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करत निघून गेलो. पुढे पंधरा दिवसांनी त्याच बँकेत ते गृहस्थ भेटले. मी त्यांना हटकले,‘का हो, अजून परभणीला गेला नाहीत का?’ ते गृहस्थ वरमले. ‘सभ्य माणसासारखे दिसता आणि भीक मागता!’ असे म्हणताच त्यांनी काढता पाय घेतला.