बाप्पा... मत विकते / बाप्पा... मत विकते का? आज फायदा अन् परिणाम दूरगामी असते ते  

Jan 31,2019 12:29:00 PM IST

नाशिक- बाप्पा... बघता बघता निवडणूक येऊन लागली माय.., मत देते ना..., पन ऐक ओ... मत देताने भैताडपणा करू नको काय... जरा विचार कर... कोनी बी येते अन् काय बी आश्वासनं देते... पण, आपण विचार कायचा असतो. मैत्रिणी एक लक्षात घे. शिक्षण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच मतदानही महत्त्वाचं आहे. आपण शाळेत असतानापासूनच आपल्याला नागरिकशास्त्रातून ही प्रक्रिया शिकवली जाते. राज्य-देश याच्याशी मला काही देणं-घेणं नाही, मला त्यातलं काही कळत नाही असं म्हणणं हे अडाणीपणाचं लक्षण आहे. मतदान करताना खूप खोलवर विचार करणंही गरजेचं नाही. साधारणत: आपल्याला उमेदवारांच्या प्रचारादरम्यान त्यातल्या त्यात कोण उमेदवार चांगला आहे, काम करणारा आहे याचा अंदाज येतो. तो योग्य पद्धतीने निवडणं हे महत्त्वाचं आहे. सध्या त्यातही जात-धर्म याला फारच महत्त्व दिलं जातं.

पक्ष किंवा उमेदवार हा विचार करणारंच. पण, आपण मतदार म्हणून याबाबतीत सजग राहून चांगल्या उमेदवाराला मतदान करायला हवं. या सगळ्यात मला महत्त्वाची बाब वाटते ती म्हणजे आपलं मतदार यादीत नाव आहे का? ते आधी बघणे. बरेचदा आपण मतदान करायला जातो आणि आपलं नावच नसतं. मग जो काही गोंधळ होतो, आरोप-प्रत्यारोप, संताप, मनस्ताप होतो आणि या सगळ्यात आपण आपल्या हक्क बजावायला मुकतो. तर आधीच आपलं नाव मतदार यादीत आहे का? ते बघायलाच हवं. जर मतदान करणं हा आपला अधिकार आहे तसं यादीत नाव आहे की नाही ते बघणं आपलं कर्तव्य आहे. किंबहुना तो या प्रक्रियेचा एक भाग आहे. याद्वारे मला माझ्या मैत्रिणींना एक बाब सांगायला नक्कीच आवडेल की, तसं बघितलं तर महिलांच्या मागण्या या पुरुषांपेक्षा थोड्या जास्त असतात. दैनंदिन अनेक झगड्यांतून त्यांना जावं लागतं. त्यावर थोडी फुंकर घालायची असेल तर योग्य उमेदवार शोधून आपला मतदानाचा हक्क बजावणं महत्त्वाचं ठरतं. पण, हा विचार, हे मत तिच्या आतून तयार झालं पाहिजे. कोण आपल्या दृष्टीने फायद्याचा आहे, त्याचा विचार करून नि:पक्षपातीपणे, जात-धर्म याचा विचार न करता आपल्या मनाचा काैल घेऊनच मतदान केले तर ते समाधान काही वेगळेच असते. मग तो उमेदवार पुढे निवडून येवो अगर नाही. पण, आपण केलेला विचार हा आपल्यालाच बळकटी देऊन जातो असं मला वाटतं. मटणाचं जेवण आणि एक लाल नोट यासाठी विकलेलं मत म्हणजे स्वत:च्याच नजरेतून स्वत: उतरणे असे आहे. किंबहुना तो गुन्हाच आहे. आपण त्या क्षणाचा फायदा बघतो पण, त्याचे परिणाम दूरगामी होतात. तेव्हा मैत्रिणींनो, विचार करा. कारण या देशात महिला शक्ती ही आदिशक्ती आहे.

शब्दांकन : पीयूष नाशिककर, नाशिक

X