आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात नव्या आघाडीच्या राजकीय पर्वाची सुरुवात... 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली, मुंबईमध्ये जेवढ्या वेगवान घडामोडी आज घडल्या, तेवढ्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधी घडल्या नाहीत. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याने विश्वासदर्शक ठरावासाठी वेळ निश्चितीने त्याची सुरुवात झाली. पुढे वेगवान घडामोडीनंतर फडणवीस, पवारांचे राजीनामे आणि आघाडीच्या नेतेपदी, मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून उद्धव ठाकरेंच्या घोषणेने गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली अनिश्चितता संपुष्टात येते आहे. त्याचबरोबर 'मुख्यमंत्री' नावाचा जो वग महाराष्ट्र व देशातील जनता पाहत होती, त्याचाही शेवट दृष्टिपथात आला. दोघांच्या राजीनाम्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवाड्यात काय सांगितले? त्या मुद्द्यांना फारसे महत्त्व राहिले नाही. मात्र, त्यातली एक गोष्ट महत्त्वाची होती. ज्या राज्यांच्या 'फ्लोअर टेस्ट'चा संदर्भ निकालपत्रात आहे, त्यातल्या बहुतांश राज्यांतल्या राजकीय गोंधळाशी भाजपने केलेला ३५६ कलमाच्या गैरवापराचा संदर्भ आहे. ते सारे निवाडे भाजपच्या विरोधात गेलेले आहेत. महाराष्ट्रातही तेच झाले. ते भाजपला महागात पडले. यातून त्यांना मिळाले काहीच नाही. पण, सहानुभूती गमावली. प्रतिष्ठा मलिन झाली. सत्तेसाठी चारही प्रमुख पक्षांनी मर्यादा ओलांडल्या. रात्रीच्या अंधारात सत्तेचा गैरवापर करत भाजपने शपथविधी उरकून घेतला. याअगोदर ३० वर्षे एकमेकांना अखंड शिव्याशाप देणारेे तिन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले. 'तुझ्या गळा माझ्या गळा' करत एकमेकांचे गुणगान गाऊ लागले. महिनाभरापासून रंगलेला हा फड पाहताना सुरुवातीला लोकांना गंमत वाटायची. नंतर मात्र त्याची चीड व स्वत:ची चेष्टा वाटू लागली. पळून जाऊ नये म्हणून कोंबड्यांना जसे खुराड्यात ठेवतात, तसे आमदारांना ठेवावे लागले. निवडणूक आणि त्यानंतरच्या काळात अजित पवारांचे दोन्ही राजीनामे गाजले. 'ईडी'चा विषय व रडून दिलेल्या आमदारकीच्या राजीनाम्याने चार दिवस माध्यमांतली खूप मोठी जागा व वेळ त्यांना मिळाली होती. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला? नोकरदार बाबू रजेचा अर्ज 'वैयक्तिक' कारणास्तव करतो, तशाच कारणासाठी राजीनामा दिल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. कुटुंबातल्या लोकांकडून आलेला दबाव व राष्ट्रवादीतल्या श्रेष्ठींचा आग्रह, हे त्यामागचे कारण असल्याचे सांगितले जाते. पण, राजीनाम्यामुळे विधानसभेत मतदानाची वेळ आली असती, तर अजित पवार आणि शरद पवार या काका- पुतण्यातील शक्तिपरीक्षण अटळ होते. आता ते झाकल्या मुठीत राहिले. महाराष्ट्रातल्या राजकारणावर शरद पवारांची पकड या घडामोडींमुळे पुन्हा पक्की झाली. शिवसेनेला पाठिंबा देण्यास सोनिया गांधींचे मन वळवण्यासाठी केलेल्या खटपटीनंतर पुतण्याच्या गोंधळामुळे तेच अडचणीत आले होते. त्यांचा दिल्ली, मुंबईतला राजकीय विश्वास व प्रतिष्ठा पणास लागली होती. आजच्या सांगतेने ती सांभाळली गेली. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी व विश्वासदर्शक ठराव, ही औपचारिकताच बनली आहे. मात्र, यामुळे महाराष्ट्रात एका नव्या आघाडीच्या राजकीय पर्वाची सुरुवात झाली, हे नक्की.  

बातम्या आणखी आहेत...