आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयात येऊन पदभार स्वीकारला. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्यांच्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. या वेळी त्यांच्यासाेबत आमदार मुलगा आदित्य ठाकरे, नवीन मंत्री व शिवसेनेचे इतर नेते उपस्थित हाेतेे. तेथून ते मंत्रालयात आले. तिथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. नव्या मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी व त्यांच्यासाेबत फाेटाे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी माेठी गर्दी केली हाेती.
फडणवीस यांच्या सरकारने घेतलेला 'आरे'त कारशेड उभारणीचा वादग्रस्त प्रकल्प उभारणीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा धाडसी निर्णयही ठाकरेंनी पहिल्याच दिवशी घेतला. भाजपकडून त्यावर टीका झाली, तर काँग्रेस-राष्ट्रवादी व पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले.
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे दालन आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ते सजवण्यात आले हाेते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांनी औक्षण करून ठाकरेंचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसण्यापूर्वी ठाकरेंनी डोळे मिटून आणि हात जोडून कुलदैवत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व विभागांच्या सचिवांबरोबर बैठक घेऊन अाेळख करून घेतली. कामकाजाची माहितीही घेतली. या वेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली व त्या आरे कारशेडला स्थगितीचा महत्त्वाचा निर्णय घेतला. सायंकाळी सहा वाजता पत्रकार कक्षात येऊन संवाद साधला, पुन्हा बैठकीसाठी गेले. सायंकाळी साडेसहा वाजता ते मंत्रालयातून बाहेर पडले. नंतर ब्रीच कॅँडी रुग्णालयात जाऊन तिथे उपचार घेत असलेल्या लता मंगेशकर यांचीही भेट घेतली.
सचिवांना केले आश्वस्त; विम्याची अचूक माहिती
सचिवांच्या बैठकीस उपस्थित एका अधिकाऱ्याने सांगितले, 'कोणतेही अधिकारी बदलले जाणार नाहीत. आपण एकच आहोत अशा आश्वासक वक्तव्याने ठाकरेंनी चर्चेला सुरुवात केली. ते खूपच मृदू स्वभावाचे आहेत. त्यांनी आम्हा सर्व सचिवांचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले. काही शंकाही उपस्थित केल्या. परंतु पीक विम्याच्या विषयावर त्यांनी जेव्हा आकडेवारी दिली तेव्हा आम्हीही थक्क झालो. ते अभ्यास करून आल्याचे जाणवले. ते नवीन असले तरी लवकरच कामकाजात पारंगत होतील, अशी आशा आहे.'
'माताेश्री'बाहेरही शेतकरी
ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'माताेश्री' बंगल्याबाहेर शुक्रवारी नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी हाेती. राज्यभरातून आलेले काही शेतकरी व कार्यकर्ते नूतन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तिथे जमले हाेते. शेतकऱ्यांचे प्रश्न ठाकरेंनी प्राधान्याने दूर करावेत, अशी मागणी या शेतकऱ्यांनी यावेळी केली.
संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन करून नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कामाला सुुरुवात केली.
जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना
'जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आणि महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे लक्ष द्या,' अशा सूचना ठाकरेंनी अधिकाऱ्यांना दिल्या. जनतेने दिलेल्या करातून विकासकामांसाठी निधी प्राप्त होत असतो. त्याचा याेग्य विनियोग करून विकासाला गती देणे आवश्यक आहे. सेवाभावनेने कामे केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल. 'सरकार माझे आहे' अशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे,' असेही त्यांनी सांगितले. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.