आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभार्थ्यांना लिहून द्यावी लागेल आता पाणीपट्टीची वैयक्तिक हमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आजघडीला राज्यातील बहुतांश पाणी पुरवठा योजना डबघाईला आलेल्या आहेत. लाभार्थ्यांनी पाणीपट्टी न भरणे हे यातील प्रमुख कारण आहे. थकीत पाणीपट्टीमुळे अनेक योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडतात. हे प्रकार टाळण्यासाठी यापुढे राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या लाभार्थ्यांना पाणीपट्टी भरण्याची वैयक्तिक हमी लिहून द्यावी लागेल. तसे परिपत्रकच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने जारी केले आहे. यामुळे पाणीपट्टी वसुलीत हयगय करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे धाबे दणाणले आहे. 


राज्याच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता खात्यातर्फे अनेक योजना आखण्यात येतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे योजना पूर्ण करून त्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना हस्तांतरित करण्यात येतात. त्या नंतर योजनेची देखभाल दुरुस्ती व पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची राहत असे. योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यापूर्वी योजनेची मागणी, पाणीपट्टी भरण्यास तयार असल्याबाबत संबंधित ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव घेण्यात येतो. परंतु बहुतांश वेळा लाभार्थ्यांना योजनेची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे नंतर ग्रामस्थांकडून नळ व मीटर जोडणी घेण्यास नकार दिला जातो. वा घेतल्यास पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे योजनेवरील खर्च वाया जात असल्याचे लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. २,८९८ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी थकबाकी ग्रामीण भागातच नाहीतर शहरांतही आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे राज्यातील मनपा, नगर पालिकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. प्रकल्प क्षेत्राबाहेरील महापालिका आणि पालिकांकडे देखभाल-दुरुस्तीचे १४७ कोटी ६९ लाख, लोकवर्गणीचे ११ कोटी ३१ लाख, पूर्ण ठेव योजनेचे ६४ कोटी ०१ लाख आणि योजनेसाठी काढलेल्या विविध कर्जांचे १५०८ कोटी ७२ लाख असे एकूण २८४६ कोटी ७६ लाख रूपये येणे आहे. प्रकल्प क्षेत्रातील महापालिका, पालिकांकडे योजनेसाठी काढलेल्या विविध कर्जांचे २ कोटी ६२ लाख रूपये धरून ५१ कोटी ४७ लाख अशी एकूण २८९८ कोटी २३ लाखांची थकबाकी आहे. 


...तरच सुरू होईल योजनेचे काम 
या निर्णयानुसार पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत ग्रामस्थांचा सहभाग असावा म्हणून यापुढे अंमलबजावणी पूर्वी गावातील घर मालकांकडून पाणीपट्टी व मीटर जोडणीबाबत वैयक्तिक हमीपत्र घेणार आहे. या हमीपत्राची एक लॅमिनेटेड प्रत प्रत्येक कुटुंबाकडे देण्यात येईल. किमान ८० टक्के घरमालकांकडून हमीपत्र मिळाल्यावरच योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. तसेच सद्यःस्थितीत बांधकाम सुरू असलेल्या योजनेच्या लाभार्थ्यांकडूनही वैयक्तिक हमीपत्र घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे. 

बातम्या आणखी आहेत...