आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तो’ आला... सावध राहा!

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • इतर राज्यांनी निवांत राहण्यापेक्षा कोरोनाचा सामना करण्यास आतापासूनच तयार राहायला हवे

‘कोरोना’ विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर दोन महिन्यांनी तो भारतात अवतरला. चीनपाठोपाठ दक्षिण कोरिया, इराण, इटली, जपानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्याचबरोबर अमेरिका, इटली, जर्मनी या अतिश्रीमंत देशांतल्या काही भागातही कोरोनाने हजेरी लावली. भारतात २८ रुग्ण आढळल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यातला एक वगळता बाकी सारे रुग्ण प्रवासाशी संबंधित आहेत. त्यामध्ये राजस्थान, दिल्ली, आग्रा, तेलंगणा, केरळचे रुग्ण आहेत.  भारतामध्ये अजून महाराष्ट्र व अन्य राज्यांत तपासणीअंती नक्की झालेले रुग्ण आढळलेले नाहीत. आमच्याकडे रुग्ण किंवा संशयित नाहीत म्हणून अन्य राज्यांनी निवांत राहण्यापेक्षा कोरोनाचा सामना करण्यास आतापासूनच तयार राहायला हवे. तो श्वासाद्वारे पसरणारा विषाणू आहे. वेगाने पसरतो. हे लक्षात घेऊन कोरोनाची लागण झाल्यावर पळापळ करण्यापेक्षा केंद्राच्या व राज्यातल्या आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहायला हवे. साथीच्या रोगांच्या संसर्गाचा प्रतिबंध वा त्यावर नियंत्रण करण्याच्या उपायांच्या बाबतीत आपली आरोग्य व्यवस्था व आपण गंभीर नाहीत. रोग आला की पळापळ सुरू होते. सार्स, इबोला, स्वाइन फ्लू, निपाह या विषाणूंमुळे पसरणाऱ्या रोगांच्या साथीच्या वेळी तोच अनुभव आला. भारताची एकूणच आरोग्य दक्षता व्यवस्था ही अतिशय नाजूक अवस्थेत असते. कारण त्यामधली सरकारी गुंतवणूक वरचेवर कमी होते आहे. खासगी क्षेत्रातील यंत्रणेवरचे अवलंबित्व वाढते आहे. त्यामुळेच भारतातली वैद्यकीय सेवा ही वरचेवर महाग होते आहे. कितीही नवीन योजना निघाल्या तरी प्रशासनातल्या बाबूगिरीमुळे त्या गरिबांपासून दूर जात आहेत. कोरोनाची लागण पसरण्याचा धोका आहेच, पण त्याचबरोबर सरकार व खासगी क्षेत्राची क्षमता कसोटीस लागण्याचा हा काळ आहे. वैद्यकीय यंत्रणांनी व भारतीयांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनावर अजूनही खात्रीचा उपाय व प्रतिबंधात्मक लस याचा शोध लागलेला नाही. जगभर याविषयी शाेधकार्य सुरू आहे. पण तोपर्यंत तज्ञ सांगतात ती काळजी जरूर घेतली पाहिजे.  नवनवीन साथीच्या रोगाच्या अाव्हानांंमुळे केंद्र सरकारसमोर अारोग्य व्यवस्थेतला दर्जा, व्यापकता सुधारण्याचे मोठे आव्हान आहे. कोरोनासारख्या विषाणूंची लागण तपासणारी भारतातली एकमेव प्रयोगशाळा ‘एनआयव्ही’ पुण्यामध्ये आहे. देशात कुठेही संशयित रुग्ण आढळला तर नमुने तपासणीसाठी पुण्यातच पाठवावे लागतात. काेरोनाच्या तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा सुरू केल्याच्या व आणखी १९ सुरू करणार असल्याचे प्रकाश जावडेकर सांगतात. पण त्या निष्कर्षांवर पुण्याच्या एनआयव्हीलाच शिक्कामोर्तब करावे लागते. स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षांत आपण आणखी एक एनआयव्ही का उभी केली नाही हे एक कोडेच आहे. तसेच सोशल मीडियामुळे जी काही अर्धी-कच्ची माहिती बाहेर येते त्यामुळे लोकांमध्ये भीती खूप आहे. कोरोनाबाबतची माहिती देशाला देताना केंद्र सरकारने पारदर्शकता व वस्तुस्थितीबद्दल प्रामाणिकता राखलीच पाहिजे, अन्यथा सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवांमुळे लोकांची घाबरगुंडी उडू शकते.

बातम्या आणखी आहेत...