आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भादली हत्याकांडाची फाइल पुन्हा उघडली; दोन महिलांचे जबाब घेतले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भादली हत्याकांड प्रकरणात ऑगस्ट महिन्यात दोन संशयिताना जामीन झाला आहे. या दोघांनी नऊ दिवसांच्या पोलिस कोठडीत घटनेबद्दलची ठोस माहिती दिली नाही. त्यानंतर भादली हत्याकांड एक 'मर्डर मिस्ट्री' होण्याची शक्यता असतानाही फाइल पुन्हा उघडण्यात आली आहे. बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दोन महिलांचे जबाब नोंदवले आहेत. 

 

भादली गावात राहणारे प्रदीप सुरेश भोळे (वय ४५), त्यांच्या पत्नी संगीता (वय ३०), मुलगी दिव्या (वय ७) व मुलगा चेतन (वय ३) यांचा १९ मार्च २०१७च्या रात्री धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे ख्ून करण्यात आला हाेता. घटनेच्या १४ महिन्यांनंतर म्हणजेच १७ मे २०१८ रोजी नशिराबाद पोलिसांनी रमेश बाबुराव भोळे व प्रदीप उर्फ बाळू भरत खडसे या दोघांना अटक केली होती. ९ दिवसांची पोलिस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या या दोघांना १९ अॉगस्ट २०१८ रोजी जामीन मंजूर झाला आहे. भोळे व खडसे पॉलिग्राफी टेस्टमध्ये माहिती लपवत असल्याचा अहवाल पोलिसांनी सादर केल्यामुळे या दोघांना अटक करण्यात आली हाेती. या हत्याकांडातील महत्त्वाची माहिती दोघांकडे असल्याची शक्यता पोलिसांना होती. 


त्या अनुशंगाने त्यांना अटक करुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांकडून ठोस माहिती मिळू शकली नाही. परिणामी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. भादली हत्याकांड प्रकरणातील भोळे कुटुंबीयांचे मारेकरी सापडणार नाहीत, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. असे असताना पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी भादली हत्याकांडाच्या तपासावर पुन्हा एकदा भर दिला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा सोपवण्यात आला आहे. कुराडे यांनी बुधवारी मृत प्रदीप भोळे यांच्या दोन बहिणींचे लेखी जबाब नोंदवले. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गेल्या दीड वर्षात पोलिसांनी १९८ लोकांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवले. ५०० जणांचे कॉल डिटेल्स तपासले. 

 

पोलिसांच्या तपासात संशयित वाटणाऱ्या अाठ जणांची न्यायालयाच्या परवानगीने पॉलिग्राफ चाचणी घेतली आहे. मात्र, अद्याप हत्याकांडाचे कारण समाेर अालेले नाही. किंबहुना संशयितांना अटक करण्यात आली नाही. आता नव्याने तपास सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा तपासाचे प्रयत्न केले जात आहेत. 


घटनास्थळाची पाहणी, अनेकांचे जबाब होणार 

स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास आल्यानंतर कुराडे यांनी दोन वेळा घटनास्थळाची पाहणी केली. तर आत्तापर्यंत दोन महिलांचे जबाब घेतले आहेत. पूर्वी घेण्यात आलेल्या अनेक लोकांचे पुन्हा जबाब घेण्यात येणार आहेत. जबाबातील तफावत, संशयित हालचाली असलेल्यांवर विशेष लक्ष केंद्रित करुन तपास केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...