आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणातून निवृत्तीनंतर पुन्हा राजकारणात सक्रिय; काही काळ पत्रकार, प्राध्यापकही होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूजमेकर - कारण, राज्यपाल या नात्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राजकीय हेतूने असल्याचा आराेप


७७ वर्षीय भगतसिंह कोश्यारी दोन महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. उत्तराखंडमधील रहिवासी असलेल्या कोश्यारींना लोकसभा निवडणूक लढवायची होती, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. या लोकसभा निवडणुकीत भाजपने ७५ पेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला होता. परिस्थितीचा अंदाज घेत, कोश्यारी यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन, समाजकार्य सुरू ठेवण्याचे मत व्यक्त केले होते. भगतसिंह कोश्यारी २००१ मध्ये उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री झाले. याव्यतिरिक्त त्यांनी राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्षपदही भूषवले आहे. उत्तराखंडमधील पालनाधुरा चेताबगडमध्ये जन्मलेल्या कोश्यारींचे शिक्षण अल्मोडामध्ये झाले. शालेय जीवनातच त्यांनी रामकृष्ण मिशन आश्रमात जायला सुरुवात केली होती. त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक नेते सोवंतसिंह आणि गोविंदसिंह विष्ट यांच्या संपर्कात आले. 

गोविंदसिंह हे १९५७ मध्ये अल्मोडामधून जनसंघाचे आमदार होते. त्यानंतर कोश्यारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत कायमस्वरूपी जोडले गेले. हळूहळू त्यांचे राजकारणातील स्वारस्य वाढत गेले. यादरम्यान त्यांनी पर्वत पीयूष हे साप्ताहिक सुरू केले होते. राजकारणात पाऊल टाकण्यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशमधील राजा इंटर महाविद्यालयामध्ये काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले. १९६१-१९६२ मध्ये अल्मोडा महाविद्यालयात विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत त्यांची महासचिवपदी निवड झाली. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात कोश्यारी दोन वर्षे तुरुंगात होते. कोश्यारींनी पहिली निवडणूक १९८९ मध्ये कपकोट मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढवली, मात्र त्यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली व ते कुमाऊं-गढवालच्या यात्रेला निघून गेले. मात्र त्यानंतर ते राजकारणात पुन्हा सक्रिय झाले. उत्तराखंडच्या निर्मितीमध्ये कोश्यारींची विशेष भूमिका होती. परंतु उत्तराखंड वेगळे राज्य झाल्यानंतर स्वामी नित्यानंद यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. २००१ मध्ये एक वर्षासाठी त्यांची उत्तराखंडच्या काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी निवड झाली. २००२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर ते २००७ पर्यंत विरोधी पक्षनेते होते. 

२००२ मध्ये ते राज्यसभेचे खासदार झाले तर २०१४ मध्ये ते नैनितालमधून लोकसभेवर निवडून गेले. २००७ मध्ये कोश्यारींची मुख्यमंत्रिपदी निवड न झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यांना संघाचा आणि आमदारांचा पाठिंबाही मिळाला होता. कोश्यारींच्या प्रशासकीय योग्यतेवर, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संशय आहे, अशी चर्चा त्या वेळी सुरू होती. राजकारणात मुरब्बी म्हणून ओळखले जाणारे कोश्यारी अविवाहित असून त्यांच्या कारकीर्दीवर कोणताही डाग लागलेला नाही. परंतु आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे ते दोन ते तीन वेळा चर्चेत आले आहेत.

जन्म- १७ जून १९४२
शिक्षण- एमए इंग्रजी, अल्मोडा महाविद्यालय
पुस्तके- 'उत्तरांचल प्रदेश क्यों?', 'उत्तरांचल संघर्ष एवं समाधान'

बातम्या आणखी आहेत...