संघर्ष / 'भागो मोहन प्यारे' फेम मराठी अभिनेत्री सरिता मेहेंदळे म्हणाली - 'आठ वर्षांच्या मेहनतीचे चीज झाले...'  

विनोदी अभिनेत्याला समाजाचे भान असायला हवे - अभिनेता अतुल परचुरे 

Sep 20,2019 05:58:06 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : भागो मोहन प्यारे ही मालिका नुकतीच प्रदर्शित झाली. प्रेक्षकांचा या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतून एक सुंदर चेहरा प्रेक्षकांच्या भेटीस आला. तो चेहरा कुठल्या अभिनेत्रीचा आहे हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात डोकावला. मोहनच्या मागे असलेली हडळ मधुवंती म्हणजेच अभिनेत्री सरिता मेहेंदळे हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सरिताने अभिनय क्षेत्रात अनेक वर्षे स्ट्रगल केले आहे आणि त्यानंतर तिला मधुवंतीची भूमिका मिळाली.


याबद्दल बोलताना सरिता म्हणाली, या वर्षाच्या सुरुवातीला नवऱ्यासोबत नाशिकला काही कामासाठी गेले होते. तिथे गेले असताना 'भागो मोहन प्यारे'चे प्रोड्युसर सुजय हांडे यांचा फोन आला. 'एका भूमिकेसाठी ऑडिशन पाठवून दे. मी तुला स्क्रिप्ट पाठवतो,' असे सांगून त्यांनी फोन ठेवून दिला. कामात असूनही नवऱ्याने मोबाइलवर माझा व्हिडिओ शूट केला आणि त्यांना पाठवून दिला. रोज देतो त्यापैकीच एक ऑडिशन असेल असे समजून मी ते फार गंभीरपणे घेतले नाही. दोन दिवसांनी तुला मधुवंतीच्या मुख्य भूमिकेसाठी निवडले असा फोन आला. ते ऐकून मला आठ वर्षांच्या संघर्षाचे चीज झाल्यासारखे वाटले.


विनोदी अभिनेत्याला समाजाचे भान असायला हवे...

अभिनेता अतुल परचुरेने हिंदी-मराठी सिनेमात, नाटकात अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या. 'भागो मोहन प्यारे' या मालिकेत अतुल मोहनची व्यक्तिरेखा साकारतोय. आपल्या अनोख्या स्टाइलने प्रेक्षकांना हसवणारा अभिनेता अतुल परचुरे या मालिकेतून प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झालाय.


याबद्दल बोलताना अतुल परचुरे म्हणाला, विनोदी अभिनेत्याला समाजाचे भान असायला हवे. कारण त्याशिवाय विनोदाची जाण निर्माण होत नाही. लेखकाने लिहिलेले विनोद अभिनेत्यापर्यंतच पोहाेचले नाही तर प्रेक्षकांपर्यंत तो काय पोहाेचवणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे अभिनेत्याने सजग असायला हवे. बऱ्याचदा चित्रीकरणादरम्यान संहितेच्या पलीकडचे अनेक विनोद ओघाओघाने येऊनही जातात आणि प्रसंगाला अजूनच मजा येत जाते. विनोदी अभिनयाच्या बाबतीत सांगायचे झाले तर इतर अभिनयापेक्षा विनोदी पात्राला असलेले कंगोरे काहीसे वेगळे असतात. कारण हे पात्र कायम सगळ्यांपेक्षा वेगळे असते.

X