आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानबाबांच्या मूर्तीचे नुकसान; पाटोद्यात बंद, परळीत आंदोलन...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 बीड - नगर जिल्ह्यातील  भाळवणीत राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीच्या   नुकसान प्रकरणाचे  पडसाद सोमवारी  बीड जिल्ह्यातील पाटोदा, परळी व बीड शहरात उमटले. पाटोदा येथे नागरिकांनी घटनेचा  निषेध नोंदवत  दिवसभर कडकडीत बंद पाळून समाजकंटकाच्या अटकेची मागणी केली, तर   आरोपीला अटक करण्यात आली नाही तर  दोन दिवसांत भगवान सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड  यांनी दिला. परळी शहरातील शिवाजी चौकात  समाजकंटकाचा प्रतीकात्मक पुतळाही जाळण्यात आला. बीड शहरात  जय भगवान टायगर ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन घटनेचा तीव्र निषेध  नोंदवण्यात आला, तर धारूरमध्ये तरुणांनी निषेध नोंदवत पोलिसांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली.    


पाटाेदा येथे   पोलिस निरीक्षक  व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मूर्तीचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकावर  कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.  पाटोदा शहरात  जमावाने शहरात मोर्चा काढून बंदचे आवाहन केले. यात महिला व पुरुष सहभागी झाले होते.  येथील नायब तहसीलदार गणेश जाधव यांना निवेदन देण्यात आले.    


बीड शहरात भगवान टायगर ग्रुपच्या वतीने निषेध    : संत भगवानबाबा यांच्या पुतळ्याची नुकसान करणारा  समाजकंटक स्वप्निल शिंदे याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला  अटक करावी या मागणीसाठी बीड शहरात सोमवारी  जय भगवान टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीपक हांगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र निषेध केला.     


पांगरीत रास्ता रोको आंदोलन    
परळी : संत भगवानबाबांच्या पुतळा विटंबनेच्या घटनेचा निषेध नोंदवत  पांगरी येथे रास्ता राेको आंदोलन करण्यात आले.  शहरातील शिवाजी चौकात माथेफिरूचा  प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. या वेळी भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात भाजपचे योगेश मेनकुदळे, गणेश होळंबे, नितीन ढाकणे, गोविंद मुंडे, संभाजी मुंडे, सुशील मुंडे, कल्पेश गर्जे आदी सहभागी झाले होते.  आरोपीस अटक केली नाही तर येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा फुलचंद कराड यांनी दिला.   


धारूर येथे निषेध नोंदवत पोलिसांना दिले निवेदन    
धारूर : मूर्तीचे नुकसान करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी संत  भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने धारूर पोलिसांना निवेदन देण्यात आले. या  निवेदनावर प्रदीप नेहरकर, दत्ता मुंडे, शेषराव मुंडे, हनुमंत तिडके, सचिन मैंद, समाधान तिडके, सतीश कराड यासह असंख्य समाजबांधवांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...