आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामान्य माणसाचा काव्यात्मक कबुलीजबाब 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान निळे  

‘मीच माझा मोर’ या काव्यसंग्रहाने मराठी कवितेच्या प्रांतात आपला वेगळा आणि सच्चा ठसा उमटविणाऱ्या कवी प्रशांत असनारे यांचा ‘वन्स मोर’ हा नवा कोरा संग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे. 
 


कविता ही माणसाला अधिक संवेदनशील आणि सुसंस्कृत बनवीत असते. आंतरिक करुणेचा गंध जेव्हा कवितेतून दरवळतो तेव्हा त्याचा परिमळ वातावरणात पसरून काव्यरसिकाला काही काळ तरी आपले दुःख विसरायला भाग पाडतो. अशाच प्रकारची अनुभूती कवी प्रशांत असनारे यांच्या कविता वाचून, अनुभवून वाचकाला येते. "मीच माझा मोर' या काव्यसंग्रहाने मराठी कवितेच्या प्रांतात आपला वेगळा आणि सच्चा ठसा उमटविणाऱ्या असनारे यांचा "वन्स मोर' हा नवा कोरा संग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे. काव्याग्रह प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेल्या या देखण्या संग्रहात एकूण ६० कविता असून त्या यापूर्वी दर्जेदार आणि अभिरुचिसंपन्न मासिके,  नियतकालिके व  दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. या सर्व कविता एकसंघ एकत्रित वाचताना त्यातील सौंदर्यात्मक संवेदनशीलता अधिक ठळक होऊन मनात स्वतःचे घर बनवितात.

अत्यंक्त साध्या, सोप्या, रसाळ भाषेत अलंकारिक अथवा चमत्कारकृती वाक्यांना फाटा देऊन संयमाने लिहिलेल्या या कविता आहेत. जगण्याचे विविधांगी कांगोरे धुंडाळत कवी आपल्या ओल्या भावना कवितेतून व्यक्त करतो तेव्हा वाचकाला ती आपलीच अभिव्यक्ती वाटते हे असनारे यांच्या कवितेचे मोठेपण आहे. आपला साधासुधा परंतु सच्चा अनुभव कवी आपल्या कवितेतून मांडतो तेव्हा त्यातला वैश्विक भावार्थ चटकन जाणवतो. तो थेट काळजाला जाऊन बिलगतो. या संग्रहात विषयाचे, आशयाचे वैविध्य असून कवी विविधरंगी जीवनाच्या बहुतांश अंगाला स्पर्श करतो. मानवी भावना हा या कवितेचा आत्मा आणि केंद्रबिंदू आहे. तरलता, गहनता, आणि अनुभूतीची मात्रा संग्रहात सर्वत्र ठासून भरलेली आहे. कवीने सर्वमान्य समान भावनेचे भिन्न भिन्न कोनातून केलेले परीक्षण सतत जाणवत राहते.

या संग्रहात बायको, मुलगी, बाबा, चिमण्या, मोर यांच्याविषयीच्या कवितांसोबतच कवितेच्या संदर्भातील कविता आणि सामाजिक भानाच्या वास्तववादी कविताही आहेत. असे असूनही कोणत्याही कवितेत आदर्शवादाचे स्तोम माजविलेले नाही. अथवा, कवितेतून प्रवचन सांगण्याचा अट्टहासही केलेला नाही.
"गोष्ट' या कवितेत कवी मुलांना राजाराणीची कथा सांगताना शेवटी म्हणतो की, 
त्यांच्या प्रजेची असो किंवा तुम्हाआम्हा माणसाच्या आयुष्याची... ती रंगतच नाही : दुःखाचं टोकदार शिंग असलेल्या राक्षसाच्या एन्ट्रीशिवाय!

ही वैश्विक सत्यता अत्यंक्त सोप्या शब्दात मांडल्याने ती जास्त ठळक आणि परिणामकारक होते. तर, चिमण्यांच्या संदर्भातील एका तुकड्यात नुकतेच उडू लागलेले चिमणीचे पिल्लू मंदिराच्या कळसावर बसते. घंटानाद होताच ते दचकते आणि उडून जाते. मग ते मशिदीच्या घुमटावर बसते. बांग होताच ते दचकते आणि उडून जाते. असे सांगून कवी शेवटी म्हणतो, 

आता रोज झाडावरच बसतं जाऊन:
ते ढुंकूनसुद्धा बघत नाही 
देवळाच्या सोनेरी कळसाकडं 
किंवा मशिदीच्या गुळगुळीत घुमटाकडे!

जाती, धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कवितेचा जन्म झालेला असतो का? कविता तर जात, धर्म, प्रदेश, प्रांत, देश, काळ यांच्या पल्याड जाऊन समस्त मानव जातीच्या भावनांचे प्रतिनिधित्व करीत असते.  ती समष्टीची भाषा बोलते. दंगलीच्या दहा नोंदीमधूनही कवी असनारे अशीच निधर्मी सामाजिक वास्तवता आणि दांभिकता आपल्या कवितांमधून अधोरेखित करतात. पण हे भीषण वास्तव चितारताना ते कधीच आपल्या कवितांची वकिली करताना दिसत नाहीत. त्यांच्या कोणत्याच कवितेत कुठेही प्रचार केलेला जाणवत नाही. मात्र वाचकाला अंतर्मुख होऊन  विचार करण्यास नक्कीच भाग पाडतात. सामाजिक भावनांच्या कवितेसोबतच तरल मानवी भावनांचे कांगोरे कवी उलगडणाऱ्या अनेक कविता या संग्रहात आहेत. या भावनांना अनुभवाची जोड आहे.

"तो वाट पाहतोय " ही अशीच एक हृदयस्पर्शी कविता आहे.आपल्या वृद्ध आईबद्दल निरपेक्षपणे व्यक्त झालेली भावना हेलावून टाकणारी आहे. कवी म्हणतो -
काल तिनं, त्याचं इवलंसं बोट पकडून त्याला चालायला शिकवलं ... अन् आज तो तिचा थरथरणारा हात धरून , तिला चालवतो आहे... अशी सुरुवात करून कवी शेवटी म्हणतो - आज छातीवर दगड ठेवून, तो वाट पाहतोय : तिचा थरथरणारा हात सुटण्याची, धुक्याची, धुक्यात ती विरघळून जाण्याची.... 
तर एका कवितेत कवी म्हणतो की-
तो येतो / तिच्या कपाळावर कुंकू ठेवतो :/ ती मोहरून जाते/ तो येतो / तिच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोत घालतो/ ती शहारून जाते/ असे सांगून कवी शेवटी म्हणतो की,  
तिला वाटते :/ तो आपल्याला सजवतोय... मढवतोय... / पण त्या बिचारीला काय ठाऊक, / त्यानं जखडून टाकलाय तिचा एकेक अवयव... घट्ट/ अन् तो निघून गेलाय बाजारात / कोठीवरचं गाणं ऐकायला !

आपल्या मनातील मनस्वी मोराला बेभान होऊन नाचण्यासाठी आनंदाचे असो अथवा दुःखाचे दोन थेंब पाणी पुरेसे असते, असे सांगणाऱ्या या कवीकडे कवितेला न्याय देणारी शब्दकळा आहे. त्यामुळे कवी अगदी सहज व्यक्त होतो. अनुभूतीच्या पातळीवर व्यक्तीकडून समष्टीकडे घेऊन जाणाऱ्या या संग्रहातील कविता काळजावरून हळुवारपणे मोरपीस फिरवितात.कवितांचा आस्वाद घेताना वाचकालाही आपणच मोर झाल्यासारखे वाटते ही या संग्रहाची उजवी बाजू आहे. अत्यंक्त देखण्या, सुबक, आकर्षक आणि सुटसुटीत स्वरूपात असलेल्या या संग्रहाचे नयन बाराहाते यांनी चितारलेले मुखपृष्ठ पुस्तकाचा दर्जा आणखी वाढविण्यात नक्कीच हातभार लावते.


वन्स मोर  


कवी : प्रशांत असनारे 


प्रकाशक : काव्याग्रह प्रकाशन 


किंमत : १५० रु.

लेखकाचा संपर्क : ९७०२१४६८८०