आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थापाड्या मित्रासोबतची खरेदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागवत पांचाळ

दिवाळीचे कपडे मित्र भेट देणार असं ठरलं. कुटुंबाची खरेदी आटोपलेले मित्र मग स्वत:साठीच्या खरेदीकरता घराबाहेर पडले. दुकानात कपड्यांची पसंती झाली. बिलही तयार झालं. मात्र जो मित्र दिवाळी भेट म्हणून कपडे घेऊन देणार होता त्याचं क्रेडिट कार्ड अजून बँकेतच होतं...
 
कौटुंबिक खरेदीनंतर माझी कपड्यांची खरेदी राहिली होती. मित्रांना फोनाफोनी केली तर त्यांचीही खरेदी राहिली होती. मग एका मित्राने एक सरप्राइझ दिलं. या वेळी कपडे त्याच्याकडून दिवाळी भेट. आम्ही खूप खुश झालो. वेळ ठरवून दुपारच्या वेळी खरेदीला निघालो. दुकानांमध्ये खरेदीसाठी लोकांची गर्दी होती. दुकानदारांची वस्तू विक्रीसाठी धांदल उडाली होती. आम्ही पाच-सहा मित्र कपडे खरेदी करण्यासाठी औरंगाबाद शहरातील कपड्यांच्या प्रसिद्ध दुकानात फिरत होतो. आमच्या मित्रांपैकी एक मित्र ‘अरुण’ याला ब्रँडेड कपडे खरेदी करण्याची आवड. त्याने आम्हाला सांगितलं, तुम्हाला पण मी तिथूनच कपडे दिवाळी भेट म्हणून देतो. तो आमचं न ऐकता एका मोठ्या ब्रँडेड कपड्यांच्या दुकानात घेऊन गेला. त्यापाठोपाठ आम्हीही त्याच्याबरोबर त्या दुकानात गेलो.दुकानदारमालकाला नमस्कार करून त्याने आम्हाला ब्रँडेड कपडे दाखवण्याची विनंती केली. त्यानुसार दुकानमालकाने तेथील कर्मचाऱ्यास ब्रँडेड कपडे दाखवण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने आम्हाला एकापेक्षा एक ब्रँडेड कपडे दाखवले. दुपारपासून संध्याकाळपर्यंत आम्ही प्रत्येक जण आपल्या आवडीचे कपडे पाहण्यास सुरुवात केली. सर्व कपड्यांचे पैसे अरुणच देणार होता. त्यामुळे आम्ही किमतीची चिंता केली नाही. सर्वजण आपल्याला जे आवडेल ते कपडे पॅक करण्यास सांगितले. हुश्श! झाली एकदाची खरेदी म्हणत आम्ही तेथे ठेवलेल्या थंड पाण्याच्या जारमधील पाणी पिऊन दुकानमालकाकडे बिल भरण्यासाठी गेलो. बिलिंगची ही भली मोठी रांग होती. बिल  देण्यास आमचा अरुणच पुढे. कारण तोच सर्व बिल देणार असल्यामुळे आम्ही सर्वजण त्याच्या पाठीमागेच कपड्यांच्या पिशव्या हातात धरून उभे होतो. तेवढ्यात अरुणने दुकानमालकाला विचारले की, आपल्याकडे क्रेडिट कार्ड स्वाइप मशीन आहे का? त्यावर दुकानदाराचे उत्तर आले की, नाही. परंतु दुकानमालकाने सांगितले की, काही हरकत नाही, मी शेजारील दुकानातून स्वाइप मशीन आणतो व त्याद्वारे आपण बिल अदा करू शकता. त्यावर अरुण म्हणाला, क्रेडिट कार्ड आता माझ्याजवळ नाही, तो अजून बँकेकडून एका महिन्यानंतर येणार आहे, त्या वेळेस आम्ही खरेदी करू. हे उत्तर ऐकून मी आणि मित्रांनी पाठीमागूनच कपड्यांची पिशवी दुकानात ठेवून तेथून पळ काढला. अशा प्रकारे दिवाळीची खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर आम्हा मित्रांची फजिती झाली होती. 

लेखकाचा संपर्क : ९४२१४३३९४३