आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंता अभिनेता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभियांत्रिकी कॉलेजच्या वर्गात ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधला आशू अभ्यास करत बसलाय, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोय, उत्तरांचं स्पष्टीकरण देतोय, ही एखाद्या एपिसोडची तयारी चालली असावी, असं वाटायचं. पण ‘आशू’ अर्थात पुष्कराज चिरपुटकर कॉलेजमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीचा अभ्यास करत असताना हे असं वास्तववादी चित्र बऱ्याचदा असायचं.


अभियांत्रिकी आणि अभिनय यांचं समीकरण कसं आणि कधी जुळलं, याबाबत सांगताना ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधला आशू अर्थात पुष्कराज चिरपुटकर म्हणाला, ‘शाळेत असल्यापासून मला अभिनयाची आवड होती. पण आमची कॉन्व्हेंट शाळा असल्याने तिथे मराठी नाटक करणारे जवळपास कोणीच नव्हते. सातवीमध्ये असताना मला नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाबद्दल कळलं होतं आणि तिथे प्रवेश घेण्याची माझी इच्छा होती. पण दुसऱ्या प्रवेशफेरीनंतर माझी निवड तिथे होऊ शकली नाही. महाविद्यालयात प्रवेश घ्यायच्या आधी मला ‘पुरुषोत्तम करंडक’ या नाट्य स्पर्धेविषयी कळलं होतं. मग मी कुठली महाविद्यालयं या स्पर्धेमध्ये भाग घेतात हे शोधलं. त्यातलं एक होतं फर्ग्युसन महाविद्यालय. 


पुण्याच्या जगप्रसिद्ध ‘वैशाली’मध्ये आम्ही खाण्यापिण्यासाठी नेहमी जमत असू. तेव्हा फर्ग्युसनमध्ये फेरी झाली होती. पहिल्या भेटीतच मी त्या महाविद्यालयाच्या प्रेमात पडलो आणि अकरावी-बारावीसाठी विज्ञान शाखेमध्ये तिकडे प्रवेश घेतला. पण विज्ञान शाखेचा अभ्यास, प्रॅक्टिकल्स यामध्ये मी नाटक काही तेव्हा नीट करू शकलो नाही. मला जीवशास्त्रात खूप रस होता. बारावीनंतर वैद्यकीय शाखेच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास सुरूही केला. पण नंतर विचार करून मी आई-वडिलांना सांगितलं की, मला या विषयाची आवड असली तरी डॉक्टरांचं वेळापत्रक बघता मला पेशा म्हणून ते स्वीकारणं शक्य नाही. मग मी पुण्याच्या पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.’


‘पण इथे लोकांना नाटक म्हणजे काय, रंगमंचावर ते कसं घडतं याबाबत पुसटशीही कल्पना नव्हती. ना मला कुठले खेळ खेळता यायचे, ना गाणं म्हणता यायचं, नृत्याशी तर दूरदूरचा संबंध नाही, त्यामुळे आपलं आपल्याला काही तरी शोधून काढावं लागणार हे कळलं. मग माझा मित्र हृषिकेश गोरे आणि मी आमच्या कॉलेजच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात जायचो. नंतर आम्ही अख्खे वर्गच्या वर्ग गोळा करून न्यायला लागलो. या प्रकारामुळे मला खूप लोकप्रियता मिळाली विद्यार्थ्यांमध्ये. मग मी हळूहळू त्यातल्या काही मुलांना नाटक करण्याबाबत विचारलं. पण महाविद्यालयात नाटकाचं काही वातावरण नसल्याने मुख्याध्यापकांच्या घरी आधीच्या वर्षाच्या स्पर्धांचे फोटो घेऊन जाणे, अर्ज करणे, मुलांना काही स्पर्धांच्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या वातावरणाशी ओळख करून देणे, असे सगळे प्रयत्न सुरू केले आणि शेवटी एक नाटक बसवलं. पहिल्याच वर्षी मला अभिनयाचं उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. माझा मित्र हृषिकेश त्या नाटकाची व्यवस्थापनाची बाजू सांभाळायचा,’ पुष्कराज सांगतो.


महाविद्यालयाच्या नाटकाच्या गटात असणाऱ्यांच्या वाट्याला येणारा एक जागतिक अनुभव म्हणजे परीक्षा आणि नाटकाची स्पर्धा यांच्या लगोलग आलेल्या तारखा! पुष्कराजही या अनुभवातून गेला आहे. शेवटच्या तोंडी परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी नाटकाचा प्रयोग होता. त्याच्या आधीचे सगळे जण ‘आता साॅलिड वाट लागणार’ या आविर्भावात परीक्षा देऊन वर्गाच्या बाहेर येत होते. पुष्कराज आत गेला, कॉलेजच्या परीक्षकांनी बाहेरून आलेल्या परीक्षकांना सांगितलं की, हा नाटकात काम करतो. त्याबरोबर ते बाहेरून आलेले परीक्षक पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडकमध्ये भाग घेतलाय का, तुझं नाटक कधी आहे ते सांग, अशा गप्पाच मारू लागले! या महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळातच पुष्कराजने अभिनयाच्या वेगवेगळ्या कार्यशाळा केल्या. तो म्हणतो, ‘कार्यशाळा करण्याचा फायदा असा होतो की, वेगवेगळ्या माणसांकडून आपल्याला शिकायला मिळतं आणि त्या माणसांशी ओळखी होतात, त्या ओळखींमधून पुढे संधी निर्माण होण्याची शक्यता असते.’


जेव्हा एखादा कलाकार अभिनय क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसणाऱ्या कुटुंबातून पुढे येतो, तेव्हा त्याला संघर्ष करावाच लागतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहासात वर्षं पुष्करकडे मोठं काम नव्हतं. या काळात १० महिने अर्थार्जनासाठी त्याने नोकरीही केली. मग नोकरी सोडली आणि काही मित्रांनी मिळून छोटं प्राॅडक्शन हाऊस सुरू केलं. अशा कठीण काळामध्ये आपल्याकडचं शिक्षण मदतीला धावून येतं का? ‘नक्कीच. मी सगळ्यांना सांगेन की, ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की एका विषयाची पदवी घ्यावी. कारण अभिनय क्षेत्रात अतिशय अनिश्चितता आहे. जेव्हा आपल्याकडे काही काम नसतं आणि आठवडाभर रात्री झोप लागत नाही, तेव्हा ‘काही झालं तरी आपल्याकडे पदवी आहे’ हा विचारच फार मोठं बळ देतो,’ असं तो म्हणाला.


- भक्ती आठवले-भावे 
bhaktiathavalebhave@gmail.com

बातम्या आणखी आहेत...