आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘असंभव’ मालिकेतला ‘इन्स्पेक्टर वझलवार’, ‘गुंतता हृदय हे’मधला ‘डिटेक्टिव्ह’, ‘कोडमंत्र’मधले ‘कर्नल प्रतापराव निंबाळकर’, ‘फर्जंद’मधला ‘मोत्याजी मामा’ या भूमिका साकारणारे अजय पुरकर हे उत्तम गायक आहेत, त्याचबरोबर त्यांनी ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी लॉयर’ म्हणूनही काम केलंय.
सुप्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर यांचा जन्म पुण्यातला. शाळेची सुरुवातीची काही वर्षं त्यांनी मुंबईत अंधेरीला पूर्ण केली. त्यांचे आई-वडील बँकेत नोकरीला होते. आईच्या आजारपणामुळे त्यांना पुण्याला जावं लागलं. त्यामुळे पुढचं शिक्षण पुण्यात घेतलं. सुरुवातीला अजय यांनी गरवारे कॉलेजमधून बीकॉम केलं. त्यानंतर ‘सीएस’ म्हणजे ‘कंपनी सेक्रेटरी’चं शिक्षण घेत असतानाच त्यांनी कायदेशास्त्राच्या शिक्षणासाठी पुण्याच्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कायदेशास्त्राच्या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला असताना त्यांचं लग्न ठरलं. त्यानंतर कंपनी सेक्रेटरी कोर्सची अंतिम परीक्षा त्यांना देता आली नाही. पण तेव्हाच एल.एल.एमसाठी पुणे विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला आणि एकीकडे सिम्बायोसिस कॉलेजमध्ये अतिथी व्याख्याता म्हणून शिकवू लागले. त्याबरोबरच ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी लॉयर’ म्हणून मुंबईत ‘ट्रेडमार्क’ आणि ‘कॉपीराइट्स’ या संदर्भातली कॉर्पोरेट कायद्याची प्रॅक्टिससुद्धा त्यांनी सुरू केली.
तुमचं कायदेशास्त्राचं क्षेत्र कसं होतं? कुठली आव्हानं असायची? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “अशिलाने त्याचं काम आपल्याकडे देण्याएवढी विश्वासार्हता प्राप्त करणं हे प्रत्येक खटल्याच्या वेळचं आव्हान असतं. अशील जितका मोठा तितकं जास्त जग त्याने पाहिलेलं असतं. हार्ले डेव्हिडसनचे १५० ट्रेडमार्क्स आमच्याकडे होते. त्यानंतर त्यांना पटवून देणं खूप महत्त्वाचं होतं. मला नेहमीच स्वच्छ, प्रामाणिक काम करायचं होतं. तुम्ही उत्तम काम केलं, तर अशील काय किंवा रसिक काय तुम्हांला पोचपावती देतात. आता मी कायद्याचा व्यवसाय सोडला असला तरी माझ्या व्यवसायादरम्यान जोडले गेलेले अशील अमुक एका गोष्टीसाठी कोणाचा सल्ला घेऊ, हे अजूनही विचारतात. तसंच माझी एखादी भूमिका आवडली की आवर्जून कळवतात, ही माझ्या दोन्ही कामांची पोचपावती आहे.”
कायदेशास्त्राच्या कामामधल्या अनुभवाचा अभिनय क्षेत्रात कसा फायदा झाला, याबाबत सांगताना ते म्हणाले, “मी कॉर्पोरेट क्षेत्रात आणि एक उत्तम व्यावसायिक म्हणून काम केलं आहे, ती गोष्ट अभिनय आणि गायन क्षेत्रात काम करतानाही पाळली जाते. उशिरा या क्षेत्रामध्ये आल्याने नव्या लोकांची दिशाभूल व्हायची किंवा केली जाण्याची शक्यता असते ती गोष्ट माझ्या बाबतीत झाली नाही. कारण मी कायद्याचा व्यवसाय करत असताना हार्ले डेव्हिडसन, किर्लोस्कर, पु. ना. गाडगीळ यांच्यासारखे खूप मोठे ग्राहक हाताळले आहेत. त्यामुळे व्यवसाय कसा चालतो, तुम्ही स्वतःला कसं नीटनेटकं राहिलं पाहिजे, या गोष्टी मला माहित होत्या. आता हिंदी काय किंवा मराठी काय मनोरंजन क्षेत्रा कॉर्पोरेट कल्चर आलंय. त्यामुळे कलाकारांनीही आपल्या कामाबाबत व्यावसायिक राहावं, अशी त्यांची अपेक्षा असते. व्यावसायिक पद्धतीने केलल्या कामाचं फळही चांगलं मिळतं. एका व्यवसायाचा दुसऱ्या व्यवसायाला फायदा कसा करून घ्यायचा, हे आपण ठरवायचं असतं. जितका इमानदार मी माझ्या आधीच्या व्यवसायाशी होतो, तितकाच इमानदार मी याही व्यवसायाशी राहतोय आणि राहीन. प्रामाणिकपणे केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचतंच आणि ते लोकांच्या लक्षात राहतं. दुसरी एक गंमत म्हणजे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘बंदीशाला’ या फिल्मद्वारे पहिल्यांदाच मी पडद्यावर एका वकिलाची भूमिका साकारतोय. मला न्यायालयात वावरण्याची सवय असल्यामुळे फार कमी वेळात ते चित्रीकरण पूर्ण झालं. कारण ती न्यायालयातली भाषा, वावर, नियम, न्यायाधीशांना काय संबोधायचं, साक्षीदाराची उलटतपासणी कशी घ्यायची, हे मला अंगभूत असल्यामुळे, त्या भूमिकेसाठी म्हणून अभिनयाचे वेगळे प्रयत्न करावे लागले नाहीत. त्यामुळे खरंतर ही दृश्यं करणं म्हणजे माझ्यासाठी एक भूतकाळात एक चक्कर मारल्यासारखं होतं.”
आम्ही तुमचा अभिनय तर वेगवेगळ्या माध्यमांद्वारे पाहत असतोच. ‘माझी जीवनगाणे’पासून ‘नमक इष्क का’पर्यंत वेगवेगळी गाणी गातानाही आम्ही तुम्हांला ‘सारेगमप’च्या ‘कलाकार पर्वा’मध्ये पाहिलं. या दोन्ही आवडी कशा निर्माण झाल्या? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, “माझी आई संगीत अलंकार आहे आणि आजोबा आईला गाणं शिकवायला येत असत. त्यामुळे लहानपणापासूनच माझ्यावर गाण्याचे संस्कार झाले. सुरुवातीला एका क्लासमध्ये बराच काळ गाणं शिकल्यावर मग मी पुण्यातच पं. राम माटे यांच्याकडे ५ वर्षं तालीम घेतली. मग त्यानंतर गेली १५ वर्षं माझ्या वडिलांचे बँकेतले सहकारी आणि पं. कुमार गंधर्वांचे शिष्य पं. विजय सरदेशमुख यांच्याकडे मी गाणं शिकतोय. आता इतक्या वर्षांनंतर चिंतन, मनन आणि त्यातून मला संगीताविषयी पडणारे प्रश्न अशा प्रकारचं शिक्षण सुरू आहे. आणि अभिनयाबाबत सांगायचं तर इयत्ता आठवीमध्ये असताना माझ्या अभिनयाच्या आवडीला प्रत्यक्ष रूप येऊ लागलं. एकापेक्षा अधिक गोष्टींमध्ये स्वारस्य असणाऱ्या माणसांची पंचाईत होते कारण निर्णय घेणं कठीण जातं, तसं अजय यांच्या बाबतीतही झालं.“दहावी झाल्यानंतर मी अभिनय करू नये, असं घरच्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे अभिनयामध्ये काही वर्षांचा खंड पडला. एकीकडे माझं कॉमर्स, सीएस्, एल.एल.बी. मग एल.एल.एम. हे शिक्षण सुरूच होतं. सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रमही मी करत होतो. पण माझ्या आतला अभिनेता मात्र अस्वस्थ होता. त्यावेळी पुण्यातल्या ‘सुदर्शन रंगमंच’ या संस्थेतर्फे ‘grips’ नावाचा एक नाट्यप्रकार करायचो. पण नंतर काही कारणाने मला ते करता आलं नाही. त्यामुळे करिअर कायद्यामध्ये की कलेमध्ये करायचं, या संभ्रमात मी होतो आणि अचानक २००९ मध्ये ‘असंभव’ या मालिकेसाठी मला बोलावणं आलं. ही मालिका खूप गाजली. ‘इन्स्पेक्टर वझलवार’ या माझ्या भूमिकेसाठी ‘झी मराठी’चा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कारही मला मिळाला. त्या वेळी मी पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. पण दुर्दैवाने आपल्याकडे लोक अभिनेत्यांना एका साच्यात बसवतात. असंभवमधल्या भूमिकेनंतर मला सगळ्या इन्स्पेक्टरच्या रोलसाठीच विचारणा होऊ लागली. पण मी सुरुवातीच्या काळात कुठल्या भूमिकेला मी नाही म्हटलं नाही. २०१३ मध्ये झी मराठीवर ‘सारेगमप’मध्ये कलाकारांच्या पर्वात मी अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो. भारतातल्याच नव्हे, तर भारताबाहेरच्या रसिकांनीही माझ्या गाण्यावर भरभरून प्रेम केलं. ‘सारेगमप’ सुरू असतानाच माझं ‘घाशीराम कोतवाल’ नाटक सुरू होतं. ते माझं पहिलं व्यावसायिक संगीत नाटक. त्यानंतर सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक आदित्य ओक याने ‘संगीत सौभद्र’ या नाटकात अर्जुनाच्या भूमिकेसाठी माझं नाव सुचवलं. त्याचे ७५ प्रयोग मी केले. मग ‘गर्वनिर्वाण’, ‘नांदी’ ही संगीत नाटकं केली. मग मी दूरचित्रवाणीवरील मालिकांकडे वळलो. ‘तू तिथे मी’, ‘अस्मिता’, ‘तू माझा सांगाती’ या गाजलेल्या मालिकांमधून मी प्रेक्षकांच्या भेटीला आलो. मग नाट्यनिर्माते दिनू पेडणेकर यांनी मला ‘कोडमंत्र’ या अफलातून गाजलेल्या नाटकात ‘कर्नल प्रतापराव निंबाळकर’ या भूमिकेसाठी विचारणा केली. या नाटकाचे २८५ मॅरेथॉन प्रयोग आम्ही केले. ‘बालगंधर्व’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘फर्जंद’ या मराठी तर बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्या ‘फेरारी की सवारी’, तरुणांचा लाडका दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या ‘अग्ली’ या चित्रपटातही मी काम केलं. लवकरच मी ‘बंदीशाला’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘भाई’ या मराठी, तर आणखी काही हिंदी चित्रपट आणि मराठी नाटकांद्वारे विविध प्रकारच्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकांना माझं काम आवडतंय, वेगवेगळ्या प्रकारची कामं येत आहेत, पुरस्कारांद्वारे त्याची दाखल घेतली जातेय, हे सगळं पाहून आईवडिलांची खात्री पटली आहे की, मी या क्षेत्रात चांगलं काम करतोय. पण सुरुवातीच्या काळात हातचं सोडून पळत्याच्या मागे जाणं कठीण असतं. शिवाय जरी तुमच्याकडे कितीही प्रतिभा असली तरी तुम्ही दुसऱ्या व्यवसायात जाताना तेव्हा आधीच्या क्षेत्रातली तुमची ज्येष्ठता, अनुभव बाजूला ठेवून जात असता. त्यामुळे नवीन ठिकाणी तुम्हाला मिळणारी वागणूक ही नवोदित माणसाला मिळावी तशीच असते आणि ते तसंच असायला पाहिजे. प्रत्येक व्यवसायाला त्याचे त्याचे नियम असतात. त्यामुळे कायदेशास्त्राचं क्षेत्र सोडून अभिनय क्षेत्रात येताना मीही ते नियम मान्य केले. पण त्यामुळे जी आर्थिक ओढाताण होते, त्यात माझ्या आई वडिलांनी मला खूप पाठिंबा दिला होता.” पुन्हा तुमच्या कायद्याच्या व्यवसायाकडे वळण्याचा विचार केला जाईल असं वाटतं का, असं विचारल्यावर ते म्हणाले, “आपले कायदे, तरतुदी या गोष्टी सतत बदलत असतात. त्यामुळे पुन्हा व्यवसाय सुरू करायचा म्हटला तर मला खूप अभ्यास करावा लागेल. एक वेळ तो अभ्यासही होईल, पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की कायद्याचा व्यवसाय हे अर्धवेळ करण्याचं काम नाही. कारण तुमची झोकून देण्याची वृत्ती आणि अभ्यास जितका चांगला, तितकं उत्तम काम तुम्ही करू शकता. मला असं वाटतं की, आता मी त्यापासून दूर आलोय आणि तो माझा विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. त्यामुळे तो विचार इतक्यात तरी नाही. मला अभिनय आणि गाणं या क्षेत्रातच काम करायचं आहे. त्या क्षेत्रातली वेगवेगळी आव्हानं स्वीकारायची आहेत. शेवटी तुम्ही जे करताय त्यात तुम्हाला आनंद आहे की नाही हे महत्त्वाचं. कायद्यापेक्षा अभिनय, गाणं यातल्या कामाचा मी जास्त आनंद घेतो.”
- भक्ती आठवले - भावे, मुंबई
bhaktiathavalebhave@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.