Home | Magazine | Madhurima | Bhakti Athavale Bhave writes about singer Neha Rajpal

डॉक्टर गायिका

भक्ती आठवले-भावे | Update - Aug 07, 2018, 07:07 AM IST

एकीकडे भावना समजून त्या आपल्या गाण्यात व्यक्त करणं ही गरज असणारं संगीत क्षेत्र आणि दुसरीकडे भावनांच्या आहारी न जाता तटस्

 • Bhakti Athavale Bhave writes about singer Neha Rajpal

  एकीकडे भावना समजून त्या आपल्या गाण्यात व्यक्त करणं ही गरज असणारं संगीत क्षेत्र आणि दुसरीकडे भावनांच्या आहारी न जाता तटस्थपणे नवनव्या आव्हानांना सामोरं जाण्याची मागणी करणारं वैद्यकीय क्षेत्र, यांचा समतोल सांभाळत दोन्ही कलांवर भरभरून प्रेम करणारी डॉक्टर गायिका नेहा राजपाल हिच्याशी मारलेल्या गप्पा!


  ‘गाणं' आणि ‘मेडिकल'ची सुरुवात कशी झाली?
  माझी आई डॉक्टर असल्यामुळे लहानपणापासून मी तिला काम करताना बघत आले आहे. ‘डॉक्टर' ही देवानंतरची सगळ्यात पॉवरफुल पोझिशन आहे, असं मला वाटतं. त्यामुळे लहानपणापासूनच मला हे क्षेत्र आकर्षित करायचं. माझे बाबा गिटार वाजवतात आणि गातात. मी चार वर्षांची असतानाच त्यांनी मला गिटारवर गाणं शिकवायला सुरुवात केली. मग मी गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेत गेले, बक्षिसं मिळत गेली, दहावीत असताना शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू केलं. याबरोबर एकीकडे माझी दहावी, बारावी झाली. बारावीपासून माझे गाण्याचे व्यावसायिक कार्यक्रमसुद्धा सुरू झाले. मग एमबीबीएसची अॅडमिशन झाली. तेव्हा मी ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले यांच्या मार्गदर्शनाखाली गाणं शिकत होते. त्यामुळे एकीकडे सायन्सचा अभ्यास आणि दुसरीकडे गाणं हे दोन्ही सांभाळताना कॉलेजमध्ये टाइमपास करायला मला वेळच नव्हता. तो सगळा वेळ खूप कन्स्ट्रक्टिव्ह होता. कारण त्या वयात तुम्ही स्वतःला जसं घडवता ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहतं. ज्यांना देवाने संगीताचं वरदान दिलेलं असतं, त्यांना इतरांच्या मैत्रीची तशी फार गरज भासत नाही.


  ‘संगीतशास्त्र' की ‘वैद्यकशास्त्र' ही निवड करताना कठीण नाही का गेलं?
  मला निर्णय घ्यावाच लागला नाही. प्रत्येक टप्प्यावर गाण्याची निवड होत गेली. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला असताना सोनू निगम ज्याचं सूत्रसंचालन करायचा त्या ‘सारेगमप'मध्ये मी सहभागी झाले होते. शेवटच्या वर्षी ‘गायनॅक'ची पोस्ट मिळत असूनही मी ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्या कार्यक्रमांच्या दौऱ्याला प्राधान्य दिलं. इंटर्नशिप करत असताना माझा नवरा - आकाश भेटला आणि तीन महिन्यांत आमचं लग्नसुद्धा झालं. सहा महिने मी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिसही केली. तेव्हाच ‘सारेगमप'मधून पुन्हा बोलावणं आल्याने मी गरोदर असतानाही त्या कार्यक्रमात सहभागी झाले. माझी मुलगी आलिया, तीन ते सहा महिन्यांची होती तेव्हा शंकर महादेवनजींच्या टूरमध्ये मी गायले होते आणि मग मागे वळण्याचा प्रश्नच नव्हता. एकीकडे नवी मुंबईतल्या कोपरखैरणे या शहरात आमचं हॉस्पिटलही तयार होत होतं.


  ‘मेडिकल'च्या वेळच्या काही आठवणी?
  मेडिकलच्या पहिल्या वर्षाला असताना ‘ह्युमन बॉडी डिसेक्शन'चा पहिला अनुभव भयंकर असतो. मी पूर्वी जखमी प्राण्यांची सेवा केलेली असल्यामुळे मला डिसेक्शन करताना किळस अजिबात वाटली नाही, पण त्या वासाची मला अॅलर्जी असल्यामुळे थोडा त्रास झाला. दुसऱ्या वर्षी पोस्टमॉर्टम करणं आणि बघणं हे मात्र भयंकर असतं. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षी स्टेथोस्कोप मिळतो, बाळाचा जन्म पहिल्यांदा बघायचा असतो, या गोष्टी खूप रोचक असतात. त्यानंतर इंटर्नशिपसाठी मला दोन-तीनदा मुंबईच्या बाहेर पाठवणार होते. आमचे डीन खूप कडक होते. पण धाडसाने मी त्यांना सांगितलं होतं की, इतके दिवस मी गाणं शिकणं आणि कार्यक्रम करणं बंद ठेवू शकत नाही, तेव्हा मला पोस्टिंग बदलून द्या. माझ्या कॉलेजने पाठिंबा दिला.


  ‘गायिका नेहा राजपाल' ‘डॉ. नेहा राजपाल'ला मिस करते का?
  मुळात मी सायन्सची विद्यार्थीच आहे, योगायोगाने मी गायिका झाले आहे! आता मी अशा टप्प्यावर आहे की मला माझ्यातल्या डॉक्टरलासुद्धा वेळ द्यावासा वाटतोय. माझी मुलगी मोठी झाली आहे. त्यामुळे मला तिच्यासाठी आता तितकासा वेळ द्यावा लागत नाही. गाण्यातही सिनेमा, मालिका, नाटक, अल्बम्स, कॅसेट्स यांच्यासाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली, साडेसहा वर्षं सह्याद्री अंताक्षरीसारख्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, ‘फोटोकॉपी'सारखा चित्रपट निर्माण करण्याचं शिवधनुष्यही पेललं. त्यामुळे आता एखादा ‘धर्मादाय दवाखाना' सुरू करण्याचा मानस आहे. किमान सकाळचे दोन तास माझ्या वैद्यकीय शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची इच्छा आहे.


  प्रत्येकाने शिक्षणाला महत्त्व दिलंच पाहिजे असं तुला वाटतं का?
  कुठलंही कलाक्षेत्र कठीण आहेच. कारण बऱ्याच गोष्टी नशिबावरसुद्धा अवलंबून असतात. योग्य वेळेला, योग्य ठिकाणी तुम्ही पोहोचणं गरजेचं असतं. हे क्षेत्र खूप अनिश्चित आहे. लताजी, ए. आर. रेहमान किंवा अलीकडच्या काळातल्या सुनिधी चौहान, श्रेया घोषाल यांच्यासारखे कलाकार लहान वयातच यशाच्या पायऱ्या चढू लागतात. पण बाकीच्यांनी मेहनत करत राहणं गरजेचं असतं. आज दिवसाला दहा नवे गायक या क्षेत्रात पदार्पण करतायत. पण क्षेत्र तितकंच आहे. त्यामुळे अशा वेळी तुमचं औपचारिक शिक्षण तुमचा आधार होतं. मला दरवर्षी काही नॉमिनेशन्स किंवा पुरस्कार मिळत आहेत. बारा वर्षांच्या करिअरमध्ये लोक तुमच्या कामाची नोंद घेत राहतील असं काम सातत्याने करत राहणं ही सोपी गोष्ट नाही. हे होणं जर थांबलं आणि जेव्हा थांबेल तेव्हा मी पूर्णपणे वैद्यकीय क्षेत्राकडे वळेन.


  - भक्ती आठवले-भावे, मुंबई
  bhaktiathavalebhave@gmail.com

 • Bhakti Athavale Bhave writes about singer Neha Rajpal
 • Bhakti Athavale Bhave writes about singer Neha Rajpal

Trending