आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रकार अभिनेत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुडगूस, पिपाणी यांसारखे अनेक सिनेमे; ठष्ट, ती फुलराणी, ओवी यांसारखी उत्तमोत्तम नाटकं, आणि सध्याच्या फुलपाखरू मालिकेतल्या योग शिक्षिकेच्या भूमिकांसारख्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी हिने मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट््समधून फाइन आर्ट््सचं शिक्षण घेतलंय. तिच्या चित्रकार ते अभिनेत्री या प्रवासाविषयी या गप्पा...


मुंबईतल्या जेजे कला महाविद्यालयाचे अनेक आजी-माजी विद्यार्थी चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यशास्त्र, चित्रपट, जाहिरात अशा क्षेत्रांमध्ये आज ‘सेलिब्रिटी’ म्हणून ओळखले जातात. त्यातलंच एक सुपरिचित नाव म्हणजे हेमांगी कवी. हेमांगीने ‘पेंटिंग’ हा विषय घेऊन बॅचलर ऑफ फाइन आर्ट््सचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिच्या महाविद्यालयातल्या प्रवेशाबद्दल सांगताना हेमांगी म्हणाली, ‘आमच्या घरी खरं तर कुणीच चित्रकलेच्या,अभिनयाच्याही क्षेत्राशी संबंधित नव्हतं. पण मला मात्र लहानपणापासून चित्रकला, हस्तकला, रांगोळी काढणं या सगळ्या गोष्टी भयंकर आवडायच्या. पुढे शाळेतही माझ्या चित्रकलेच्या शिक्षकांकडून खूप प्रोत्साहन मिळालं. मग मी एलिमेंटरी, इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या. सातवीतच मी ठरवलं होतं की, मला चित्रकलेचं शिक्षण घ्यायचं आहे आणि त्यातच करिअर करायचं आहे. जेजेमध्ये प्रवेश मिळावा या हेतूने मी फार मनापासून अभ्यास केला होता आणि दहावीत ७५ टक्के मिळवून तो मिळवला.’


हेमांगीचं पहिलं चित्र तिला अजून आठवतं. ‘एका चित्रकलेच्या स्पर्धेत मी भाग घेतला होता आणि गणपतीचं चित्र काढलं होतं. त्या चित्राला त्या स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं जे मला अजिबात अपेक्षित नव्हतं. पण नंतर परीक्षकांनी बक्षीस देण्यामागचं कारण सांगितलं की, त्या चित्रामध्ये मी गणपतीसोबत आजूबाजूला सजावट केली होती, उदबत्त्या लावल्या होत्या, भटजी काढले होते, इ. त्यामुळे परीक्षकांना माझी ही निरीक्षणं फार आवडली होती.’ 


जेजेमध्ये असतानाच खऱ्या अर्थाने हेमांगीच्या अभिनय क्षेत्रातल्या वाटचालीला सुरुवात झाली. क्रौर्य नावाच्या एकांकिकेत हेमांगीला अगदी छोटा एका विंगेतून दुसऱ्या विंगेत जाण्याचा प्रवेश होता. परंतु त्या नाटकासाठी दीड महिना तयारी केली. ती कामाची पद्धत हेमांगीला आवडली. ‘लहानपणी घरी आलेल्या लोकांची मी मिमिक्री करायचे. पण यालाच अभिनय म्हणतात हे माहीत नव्हतं. जेजेमध्ये या कलेशी माझी जवळून ओळख होत गेली. ‘क्रौर्य’नंतर ‘सेल्फ पोर्ट्रेट’ नावाची एकांकिका आम्ही केली. त्यामध्ये मी नर्तिकेची प्रमुख भूमिका करत होते. मला नाटकाची प्रक्रिया खूप आवडू लागली. ‘क्रौर्य’ करत असतानाच सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी त्यांच्या ‘शेम टू शेम’ या व्यावसायिक नाटकामध्ये भूमिका करण्यासाठी विचारलं आणि मग माझा या क्षेत्रातला प्रवास सुरू झाला.’ जेजेसारख्या ‘ड्रीम कॉलेज’मध्ये प्रवेश मिळूनही तू करिअर मात्र अभिनयात का केलंस, असं विचारताच हेमांगी म्हणाली, ‘अभिनयात मी ठरवून करिअर केलं नाही, पण कॉलेज संपल्यानंतर त्याच दरम्यान java, web designing या गोष्टी सुरू होत होत्या. त्यामुळे मी नोकरीसाठी मुलाखतीला गेले की, मला विचारलं जायचं तुला वेब डिझायनिंग येतं का? माझ्या लक्षात आलं की, आपल्याला हवे तसे स्ट्रोक्स एका क्लिकमधून निर्माण केले जाऊ शकतात आणि हाताचं महत्त्व कमी होत चाललंय. एके ठिकाणी वर्षभर मी नोकरी करत होते. तिथे क्लायंटकडून एका कामाचे दहा हजार रुपये घेतले जायचे आणि दिवसभर काम करून आम्हाला मात्र २०० किंवा ३०० रुपये मिळायचे. आमच्या कामावर असा अन्याय केला जात होता. त्यामुळे माझा या क्षेत्रातला रस कमी होत गेला आणि एकीकडे अभिनय क्षेत्रात वेगवेगळ्या संधी मिळत होत्याच, त्यामुळे आपसूकच अभिनय क्षेत्रात मी काम करत गेले.’ 


जितक्या संगीत, नृत्य, अभिनय या कला सर्व सामान्यांच्या घरोघरी पोहोचल्या आहेत, तितकी पेंटिंगची आवड लोकांमध्ये रुजलेली नाही. चित्रकलेचे रसिक तयार करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न झाले पाहिजेत असं तुला वाटतं? ‘लहानपणापासून मुलांना चित्रकलेच्या प्रदर्शनांच्या भेटी घडवल्या पाहिजेत. म्हणजे लहानपणापासून मुलांना चित्रकलेविषयी आत्मीयता वाटेल आणि वाढेल. त्याचप्रमाणे शाळेतून अनिवार्य विषय म्हणून चित्रकला ठेवू नये असं मला वाटतं. कारण एखाद्या मुलाला चित्र काढता येत नसेल तर या विषयामुळे त्याचे अभ्यासातले एकूण मार्क कमी होतात आणि या विषयाबद्दल चीड निर्माण होते किंवा अतिशय नगण्य म्हणून या विषयाकडे पाहिलं जातं. तसंच एखाद्या मुलाला चित्र काढायला आवडत नसेल, पण बघायला आवडत असेल. पण त्यालाही नाइलाजाने जसं येईल तसं चित्र काढण्यावाचून पर्याय नसल्याने मुलं या कलेपासून दुरावतात,’ असं मत हेमांगीने व्यक्त केलं. 


चित्रकलेच्या शिक्षणाचा तुला अभिनय क्षेत्रात काही उपयोग होतो का, असं विचारताच हेमांगीने फार सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली, ‘सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मुळात रंगांचं ज्ञान असल्याने माझा मी उत्तम मेकअप करू शकते. दुसरा फायदा म्हणजे मी अभिनयातून जे पात्र रंगवणार असते, त्याची ‘इंटेन्सिटी’ काय आहे, ती कशी बदलत जाते हे समजणं सोपं होतं. म्हणजे आम्हांला चित्रकलेत ग्रे-स्केल शिकवतात. ही ग्रे स्केल वा करडा रंग कथानकातल्या पात्रालाही लागू होतात. उदा. ‘धुडगूस’ सिनेमातली माझ्या आजूबाजूची पात्रं किंवा ‘क्राइम पेट्रोल’मधलं माझं पात्र. सुरुवातीला ही पात्रं अतिशय सकारात्मक म्हणजेच पांढरीधोप असतात. मग काहीतरी अशी घटना घडते की, त्या पात्रामध्ये काळा रंग मिसळला जातो. मग हे पात्र करडं होतं. आणखी गडद होत होत ते काळ्याकडे जातं. अशा प्रकारे कथानकातली पात्रं समजून घेण्यासाठी या शिक्षणाचा उपयोग होतो.


आपल्या चित्रकलेतल्या कौशल्याने कॅन्व्हासवर पोर्ट्रेट रंगवणाऱ्या आणि अभिनयाच्या सामर्थ्याने विविध ‘पात्रं’ रंगवणाऱ्या या चित्रकार-अभिनेत्रीला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

- भक्ती आठवले-भावे, मुंबई
bhaktiathavalebhave@gmail.com

बातम्या आणखी आहेत...