आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भालचंद्र गुजर
योगायोगानं लेखनाकडे वळलेली मात्र तरीही शिस्त म्हणून नियमित लिहिणारी, २०० कादंबऱ्यांचा विक्रम नावावर असणारी, न्यूयॉर्क टाइम्स, टाइमच्या सर्वाधिक खपाच्या यादीत झळकलेली आणि जगातील तब्बल चौतीस भाषांत जिच्या साहित्याचं भाषांतर होण्याचं भाग्य लाभलं अशा नोरा रॉबर्ट्सच्या लेखनकर्तृत्वाचा हा आढावा...
१० ऑक्टोबर १९५० रोजी अमोरिकेच्या मेरीलँड राज्यातील सिल्व्हरसिंग गावी मध्यमवर्गीय कुटुंबात नोराचा जन्म झाला. पाच मुलांत ती सर्वात लहान आणि एकुलती एक मुलगी होती. त्यांची आर्थिक स्थिती जेमतेमच होती; पण घरातील सर्वांनाच वाचनाची आवड होती. शालेय शिक्षणानंतर तिने रोनाल्ड ब्रिक या वर्गमित्राशी आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला. पण दोन मुलं झाल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्या काळात नोरा रॉबर्ट कीडिसव्हिल या गावात शिवणकाम करून उपजीविका करीत होती. १९७९ मध्ये त्या परिसरात बर्फाचे वादळ आले होते. रहदारी विस्कळीत झाली होती. रस्त्यावर बर्फ साठल्यानं बाहेर पडणेही शक्य नव्हते. मुलांसह घरात अडकून पडल्याने वेळ घालवण्यासाठी नोराने लेखनास सुरुवात केली. तिला लेखनाचा पूर्वानुभव नव्हता. सुचलं तशी ती लिहीत गेली. पाहतापाहता या विस्कळीत लेखनाला कादंबरीचा रचनाबंध प्राप्त झाला. अर्थात या लेखनाला तिच्या व्यक्तिगत अनुभूतीचा आधार होता. तिचे लेखन सुमारच होते. ‘मेलडीज ऑफ लव्ह’ ही तिची पहिली कादंबरी. अनेक प्रकाशकांनी नाकारलेली ही कादंबरी आजही अप्रकाशितच आहे. पण त्यामुळे ती वेळ मिळेल तशी लिहीत गेली. पहिले पुस्तक प्रसिद्ध होण्याआधीच दीड वर्षात तिने सहा कादंबऱ्या लिहिल्या. अशा रीतीनं योगायोगानं ती लेखनाकडे वळली.
१९८१ मध्ये नव्यानेच प्रकाशनक्षेत्रात आलेल्या सिलुएटने नोराची आयरिशा थरोब्रेड ही पाहिली कादबरी प्रसिद्ध केली. ती गाजली नाही; पण तिच्या प्रसिद्धीमुळे नोराच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. १९८२ ते ८४ या काळात तिने लिहिलेल्या २३ कादंबऱ्या “सिलुएट’ने प्रसिद्ध केल्या; पण नोराला प्रसिद्धी मिळाली नाही. १९८५ मध्ये तिची “प्लेइंग दि ऑर्स’ ही मॅकग्रेगर कुटुंबाविषयीची कादंबरी प्रसिद्ध झाली. बेस्टसेलरही ठरली. आणि तिला लेखनयशाचा राजमार्ग सापडला.
वेगाने लेखन करणाऱ्या नोराची तुलना काही वेळा बाबरा कार्टलँंड या ब्रिटिश लेखिकेशी केली जाते, कारण तिने आपल्या लेखनकारकीर्दीत सुमारे ९०० कादंबऱ्या लिहिल्या. ज्या मुख्यत्वे प्रेमकथा होत्या. नोराने वास्तव जीवनात जशा दिसतात तशाच जिवंत अमेरिकन स्त्रियांच्या कथा लिहिल्या. कथानकातील घटनाप्रसंगांची विविधता, निवेदनाची गतिमान आणि चित्रदर्शी निवेदनशैली यांचा विचार करून कादंबऱ्या वाचनीय कशा होतील याकडे आवर्जून लक्ष दिले.
नोराच्या कादंबऱ्यांमध्ये कुटुंब हा महत्त्वपूर्ण घटक असल्यानं त्या आकर्षक, वाचनीय वाटतात. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या निर्मितीत कौटुंबिकता आढळते. कधी मोठ्या, विस्तारलेल्या कुटुंबाभोवती तिची कादंबरी फिरते तर कधी एकाच कुटुंबाला धरून त्याच्या अनेक पिढ्यांचा इतिहास ती साकारते. नोराच्या या लेखनविशेषाचे मूळ तिच्या कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्वात दिसते. पहिल्या पतीशी घटस्फोट घेतल्यावर तिने जसन व डॅनियल या दोन मुलांची जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारली. नंतर ब्रसवाइल्डरशी पुनर्विवाह केला. तिचा दुसरा पती व्यवसायाने सुतार होता.
लेखनक्षेत्रात उदंड यश मिळाल्यावरही तिने आपले कुटुंबीय आणि सर्वच नातेवाइकांशी जिव्हाळ्याचे संबंध राखले. साहित्यक्षेत्रात घवघवीत यश मिळवणाच्या नोराने शाळकरी जीवनात निबंधाखेरीज अन्य कुठलेच लिखाण केले नव्हते. असाधारण प्रतिभा लाभलेली नसूनही लेखनसातत्यामुळे तिने यश मिळवले. कॅथलिक शाळेतील शिक्षकाच्या शिस्तीमुळे मी दररोज न चुकता लेखन करते. कारण या लेखनामुळे मला पैसे मिळणार आहेत हे मी कधीच विसरत नाही, असे ती आपल्या लेखनसातत्याविषयी सांगते. वाचकप्रिय असलेल्या तिच्या ‘हाय नून’, ‘एंजल्स फॉल; मॅजिक मोमेंट्स’, ‘ट्रिन्यूट’ , ‘बल्यू स्मोक:, करोलिना मून’ या कादंबऱ्यांवरील चित्रपट यशस्वी ठरले. वयाच्या सत्तरीत असलेली नोरा आजमितीला जगातील एक श्रीमंत लेखिका म्हणून गणली जाते.
लेखकाचा संपर्क : ९४२०१३५६४१
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.