Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Bhandara taxi accident kills 6 women including girl students near chulband river

शिरपुरात रिक्षाला उडवले, भंडाऱ्यात टॅक्सी नदीत कोसळली, 9 महिला ठार

प्रतिनिधी, | Update - Jun 19, 2019, 09:34 AM IST

साकोलीवरून प्रवासी घेऊन येणारी काळीपिवळी टॅक्सी अनियंत्रित होऊन चुलबंद नदीत कोसळली

  • Bhandara taxi accident kills 6 women including girl students near chulband river

    नागपूर - राज्यात भंडारा आणि धुळे जिल्ह्यात घडलेल्या अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ९ महिलांचे प्राण गेले आहेत, तर ८ जण गंभीररीत्या जखमी आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली-लाखांदूर मार्गावर कुंभली गावाजवळ भरधाव काळीपिवळी टॅक्सी चुलबंद नदीत कोसळल्याने ६ महाविद्यालयीन युवती ठार आणि ३ प्रवासी गंभीर जखमी झाले, तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात कंटेनरने रिक्षाला उडवल्याने ३ महिला ठार, तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.


    साकोलीवरून प्रवासी घेऊन येणारी काळीपिवळी टॅक्सी अनियंत्रित होऊन चुलबंद नदीत कोसळली. त्यात वाहनातील शिल्पा श्रीराम कावळे (२०), शारदा गजानन गोटेफोडे (५५), अश्विनी सुरेश राऊत (२०), गुनगुन दिनेश पालांदूरकर (१५), शीतल राऊत (१८), सुरेखा कुंभारे (१८) यांचा जागीच मृत्यू झाला. या वाहनात १४ प्रवासी होते. त्यापैकी रंजना अभिमन सतीमेश्राम( वय ५५), शुभम नंदलाल पातोडे (वय १८) आणि डिम्पल श्रीरंग कावळे (वय१८) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. चार प्रवासी किरकोळ जखमी असून अपघात झाल्यानंतर चालक पसार झाला. साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृतांमधील युवती या महाविद्यालयीन विद्यार्थिनी होत्या, अशी माहिती आहे.


    नेहमीची गाडी हुकल्याने बसले होते रिक्षात
    मुंबई-आग्रा महामार्गावर कंटेनरने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३ महिलांचा मृत्यू झाला, तर ५ जण गंभीर जखमी आहेत. सूतगिरणीत काम करणाऱ्या नेहमीची गाडी हुकल्याने काही कामगार रिक्षाने जात होते. शिरपूरजवळ गोल्ड रिफायनरीसमोर कंटेनरने रिक्षाला धडक दिली. यात रिक्षातील कल्पनाबाई कोळी (४१, रा. भरतसिंगनगर) जागीच ठार झाल्या, तर लक्ष्मीबाई मराठे (३५, शिरपूर), प्रमिलाबाई मराठे (६०, शिरपूर) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ज्योती कोळी (२०, भरतसिंगनगर), सुनील पावरा (३५, नेवाली), नरेंद्र मराठे (२५, शिरपूर), कविता अहिरे (३५, शिरपूर), सुदामसिंग राजपूत (७०, शिरपूर) हे गंभीर आहेत. जखमींना नागरिकांनी तत्काळ शिरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. लक्ष्मीबाई, सुनील, प्रमिलाबाई व सुदामसिंग गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे हलवण्यात आले; परंतु लक्ष्मीबाई व प्रमिलाबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trending